Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ९६ कोटी ८२ लाखांहून अधिक
लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात काल ३२ लाख ३६ हजारांहून अधिक नागरिकांनी
लस घेतली. काल दिवसभरात देशात १८ हजार ९८७ कोविड बाधित रुग्ण
आढळले तर १९ लाख ८०८ रुग्ण विषाणू मुक्त झाले. देशभरात आतापर्यंत
३ कोटी ३३ लाख ६२ हजार ७०९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या देशात २ लाख ७ हजार
६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून ९८ कोटी ८८ लाखांहून
अधिक लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या ८ कोटी ८९ लाखांहून अधिक लसी उपलब्ध आहेत.
****
काही विशेष स्थितीत महिलांच्या गर्भपातासाठी गर्भपात
कालमर्यादा २० आठवड्यांहून २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. या मध्ये बलात्कार, अत्याचार झालेल्या महिला, अल्पवयीन मुली तसंच नातेवाईक
किंवा आप्तांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिला तसंच गर्भावस्थेदरम्यान वैवाहिक स्थिती
बदलली आहे अशा महिलांचा समावेश असेल. अशा महिलांची प्रकृती, अर्भकाची शारिरिक अवस्था तसंच मुल जन्माला येणार असेल तर त्यात काही विकृती
आहे का याबाबतची खात्री केल्यानंतर गर्भपात करायचा की नाही यासंदर्भातील निर्णय संबंधित
वैद्यकीय तज्ञ घेतील असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृतीत सुधारणा
व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. डॉक्टर
मनमोहन सिंग यांना ताप आणि अशक्तपणामुळे काल दिल्लीतल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी दवाखान्यात जाऊन डॉक्टर
सिंग यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली.
****
जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या त्राल नगरमध्ये
जैश ए मोहम्मद चा प्रमुख स्थानिक कमांडर शमीम सोफी उर्फ शम सोफी सैनिकांशी झालेल्या
चकमकीत काल मारला गेला. या परिसरात आतंकवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मिर
पोलिसांनी नाकाबंदी करत शोध मोहीम सुरु
केली. त्यानंतर काल झालेल्या चकमकीत पोलीसांनी शमीम सोफीला ठार केलं.
****
इंग्लंडच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध भारत सरकारनं
हटवले आहेत. इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त चाचणी तसंच अलगीकरणात राहण्याच्या
नियमांशी संबंधित निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. ब्रिटन सरकारनं भारतीय नागरिकांसाठी हे निर्बंध हटवल्यानंतर भारत
सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
****
“पूर्ण लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत राज्य
शासनानं नुकतीच सुधारणा केली आहे. आता १८ वर्षाखालील व्यक्ती तसचं वैद्यकीय कारणामुळे
लस घेऊ न शकणाऱ्या व्यक्तींचाही या व्याख्येत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लसीच्या
दोन्ही मात्रा घेऊन झालेल्या तसंच दुसरी लस घेऊन १४ दिवस झालेल्या व्यक्तींसोबतच;
वैद्यकीय कारणांमुळे लस घेणं शक्य नसल्याचं मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून
प्रमाणपत्र मिळवलेल्या व्यक्ती आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही आता पूर्ण
लसीकरण झालेल्या व्यक्ती समजण्यात येणार आहे. या वयोगटासाठी लस उपलब्ध झाल्यानंतरही
६० दिवसांसाठी ही सुधारणा अमलात राहील, असं आदेशात नमूद करण्यात
आलं आहे.
****
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. येत्या २३ नोव्हेंबर
रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानं मार्च २०२० मध्ये बँकेची निवडणूक
होणं अपेक्षित होतं. मात्र कोविड संकटामुळे अनेकदा निवडणूक
पुढे ढकलण्यात आली. कोरोना संकट कमी झाल्यामुळे या बँकेची निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय
सरकारनं घेतला.
****
जिल्ह्यामध्ये येणारे ई-मेल उघडताना अत्यंत सावधानता बाळगा असं आवाहन बुलढाणा पोलिसांच्या
वतीनं नागरिकांना करण्यात येत आहे. राजेश शिवाजीराव नागवडे या नावानं असे ई-मेल अनेकांना
येत असून असे ई मेल उघडून पाहू नयेत असं बुलडाणा सायबर पोलीसांनी सांगितलं आहे. हॅकर्सनी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचा पूर्वीचा
ई-मेल आयडी हॅक केल्यानं , धोका असणारे हे ई मेल उघडू नयेत असं सायबर पोलीसांनी
म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment