Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या
काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३
९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·राज्यातल्या
सुमारे ४५ हजार हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्याचा
राज्य सरकारचा निर्णय
·आमदारांच्या
स्थानिक विकास निधीत एक कोटी रुपयांनी वाढ; आता प्रत्येकी चार कोटी रुपये विकास निधी
·राज्यात दोन हजार ३८३ नवे कोविडग्रस्त;
मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यु तर नव्या ९३ बाधितांची नोंद
·आज
विजयादशमी; नवरात्रोत्सवाची सांगता
·बँक
कर्मचाऱ्यांचा पुढच्या आठवड्यातला प्रस्तावित संप मागे
आणि
·औरंगाबाद
जिल्ह्याला अतिवृष्टी तसंच पुरानं झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५५५ कोटी रुपये
मदत
****
राज्यातले
सुमारे ४५ हजार हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना पदोन्नती
देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल यासंदर्भातल्या
प्रस्तावाला मान्यता दिली. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातल्या अंमलदारास कमी
कालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी कमी मिळून, अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.
प्रत्येक पोलीस ठाण्याकरता मोठ्या संख्येने गुन्हे कामकाजाच्या तपासासाठी अंमलदार मिळणार
असून गुन्ह्यांच्या तपासात तसंच दोष सिद्धीच्या कामांत लक्षणीय वेग येणार आहे.
****
राज्यातल्या
आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक
आमदाराला आपापल्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी, प्रत्येकी चार कोटी रुपयांचा विकास
निधी उपलब्ध होणार आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू असणार आहे. याबाबतचा
शासन निर्णय नियोजन विभागानं काल जारी केला. विधानसभेतल्या २८८ आणि विधान परिषदेतल्या
६२ अशा एकूण ३५० आमदारांना, ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे
राज्यभरातल्या सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येकवर्षी एकूण १४०० कोटी रुपयांचा स्थानिक
विकास निधी मिळणार आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये आर्थिक
मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, या संदर्भातल्या दाव्यांच्या निराकरणासाठी
महापालिका आणि जिल्हास्तरीय अशा दोन समित्या नेमल्या जाणार आहेत. या दोन्ही समित्यांमध्ये
प्रत्येकी पाच सदस्य असतील. महापालिकेचे उपायुक्त हे महापालिका स्तरावरच्या समितीचे
अध्यक्ष असतील, तर जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असणार आहेत. दावा
दाखल झाल्यापासून ३० दिवसांच्या आत तो निकाली काढणं हे समित्यांना बंधनकारक असणार आहे.
****
गाव
तिथं `म्हाडा` या संकल्पनेची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
म्हाडाच्या सुमारे नऊ हजार घरांची सोडत काल ठाणे इथं काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत
होते. यासंबधीचा कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात
महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करून जाहीर
करावी, असे निर्देश, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान
क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात, उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या
समितीनं सुचवलेल्या शिफारशींच्या अनुषंगानं, काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत
होते. या मार्गदर्शक तत्वांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर मुख्य सचिव, गृह यांच्या
अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
****
राज्यात काल दोन हजार ३८३ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ८६ हजार, २८० झाली आहे. काल ३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ७०५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ३४३ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख १३ हजार ४१८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३८ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या २९ हजार ५६०
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ९३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या दोन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल ३६ नवे रुग्ण आढळले, बीड
जिल्ह्यात २१, औरंगाबाद १६, लातूर ११, जालना दहा, हिंगोली
चार, नांदेड तीन, तर परभणी जिल्ह्यात दोन रुग्ण
आढळले.
****
प्रसारण पद्धतींमध्ये कालबाह्य झालेली अनालॉग पद्धत काढून प्रसार भारती नव्या तंत्रज्ञानाचा
वापर करत आहे. याचाच एक भाग म्हणून `डीडी फ्री डिश`च्या माध्यमातून प्रेक्षक आता दिडशेहून
अधिक दूरचित्रवाणी वाहिन्या मोफत पाहू शकतात. ही दूरदर्शनची `डायरेक्ट टू होम फ्री
एयर` सेवा आहे. यामध्ये सर्व दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, विविध खाजगी आणि शैक्षणिक
टीव्ही वाहिन्यांचा समावेश असेल. यासंबंधी अधिक चौकशीकरता ०११- २५ ८० ६२ ०० या क्रमांकावर
संपर्क करावा.
****
विजयादशमीचा
सण आज साजरा होत आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला
जातो. शस्त्रपूजन, सरस्वती पूजनासह पारंपारिक पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान,
काल महानवमीला ठिकठिकाणच्या देवीमंदिरांमध्ये घटोत्थापना होऊन नवरात्रोत्सवाची सांगता
झाली.
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचा ‘शस्त्र पूजनाचा’ कार्यक्रम यंदा कोविड पार्श्वभूमीवर प्रमुख पाहुण्यांशिवाय
होणार आहे. यानिमित्तानं सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाचं आज सकाळी साडेसात
वाजता समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे.
****
भारत
बौद्धमय करण्याचं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊया,
असं आवाहन, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबईत काल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियानं धम्मचक्र
प्रवर्तन दिनाच्या पासष्टाव्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत
होते. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतराचं भान बाळगत अभिवादनाची व्यवस्था
करण्यात आली आहे.
****
केंद्र
सरकारनं पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर आकारण्यात येणारं मूलभूत सीमा
शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह त्यावर लावण्यात येणारा कृषी अधिभार देखील
रद्द केला जाणार आहे. हा निर्णय येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे
आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेत या तेलाची आवक वाढेल आणि तेलाच्या किमती
स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
****
पेट्रोल
आणि डिझेलच्या दरात काल पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलचे दर ३५ पैशांनी वाढले. या दरवाढीनंतर
मुंबईत पेट्रोलची किंमत ११० रुपये ७५ पैसे प्रतिलीटर, तर डिझेलची किंमत १०१ रुपये ४०
पैसे प्रतिलिटर झाली आहे.
****
बँक
कर्मचाऱ्यांनी पुढच्या आठवड्यातला प्रस्तावित संप मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉ. भागवत कराड यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं कराड यांनी सामाजिक
संपर्क माध्यमावरील एका संदेशाद्वारे सांगितलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचारी
संघटनेच्या प्रतिनिधींनी काल कराड यांची भेट घेतली. त्यांच्या समस्यांवर सर्वमतानं
तोडगा काढण्यात आल्याचंही कराड यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
लोकशाही
अधिक सुदृढ होण्यासाठी तृतीयपंथी, देह व्यवसाय करण्याऱ्या स्त्रिया आणि दिव्यांगांचे
मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे, याकरता विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम
एक ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या कालावधीत १३ आणि १४
नोव्हेबर, आणि २७ आणि २८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत, विशेष शिबिरांचं आयोजन करून या
वंचित घटकांची मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत
देशपांडे यांनी, राज्यातल्या सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरानं झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५५५ कोटी रुपयांची
आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यामध्ये
जिरायतीसाठी १० हजार रुपये, बागायतीसाठी १५ हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार
रूपये प्रति हेक्टर अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत असून,
लवकरच बाधित क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं
चव्हाण यांनी सांगितलं.
बीड
जिल्ह्याला ६३४ कोटी रुपये मदत मिळणार आहे.
****
औरंगाबाद
शहरात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक `मिशन कवच कुंडल` अभियानाअंतर्गत, २९ हजार
८४९ नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यापैकी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ११
हजार ५७०, आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १८ हजार २७९ आहे. दरम्यान, आज
विजयादशमी निम्मित सुट्टी असल्यानं लसीकरण बंद राहणार असल्याचं औरंगाबाद महानगरपालिकेच्या
आरोग्य विभागानं कळवलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या `कवच कुंडल` मोहिमेमध्ये उस्मानाबाद इथं राज्य
ग्रामीण जीवन उन्नती अभियानानं सक्रिय सहभाग घेतला असून, या अंतर्गत मिशन कवचकुंडल
आद्या या मोहिमेचा प्रारंभ काल करण्यात आला. स्वयंसहाय्यता गटातल्या महिलांच्या कुटुंबांचं
शंभर टक्के लसीकरण व्हावं हा उद्देश समोर ठेवून, ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गटातल्या
प्रत्येक महिलेनं आपलं कुटुंब कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्य
कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी या निमित्त केलं.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात येहळेगांव तुकाराम इथं घरोघरी जाऊन कोविड लसीकरण करण्यात
आलं. १०० टक्के लसीकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह आरोग्यपथकानं जनजागृती केल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आज
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आणि प्रारंभीची वाटचाल. या विषयावर मुंबईच्या लायन्स
जुहू नंदलाल जालान महिला महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमिला गायकवाड या
व्याख्यान देणार आहेत. राष्ट्रीय सभेमुळे भारताच्या राजकीय जीवनात नवीन युग सुरु झालं
असल्याचं मत प्राध्यापक डॉ. रमिला गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या..
‘‘काँग्रेसमध्ये
फूट पडून मवाळ आणि जहाल असे काँग्रेसचे दोन गट तयार झाले. राष्ट्रीय ऐक्याची भावना
दृढ करण्यासाठी परदेशी मालावर बहीष्कार, स्वदेशी मालाचा पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षणाचा
स्वीकार आणि वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, जहाल गटानं केली. संपूर्ण देशामध्ये नवी
जाणीव निर्माण होऊन स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल अधिक वेगाने सुरु झाली. काँग्रेसमधील
या फुटीचे दूरगामी परिणाम राष्ट्रीय चळवळीवर झाले. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली
कृतीशील गट काँग्रेसबाहेर निघाला, मात्र स्वातंत्र्य चळवळीच्या वाटचालीत राष्ट्रीय
सभेने दिलेले योगदान हे विशेष उल्लेखनीय ठरले.’’
हे व्याख्यान आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होणार आहे
****
लातूर शहर महापालिका
हद्दवाढ प्रस्तावाला नगरविकास विभागाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भात ३० दिवसांच्या
मुदतीत हरकमी मागवण्यासाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment