Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे
की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या,
तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना
लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोविड रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभू्मीवर राज्य सरकारनं फिरती रुग्णालयं
विकसित करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
** राज्यात टाळेबंदी नाही, भीतीचं वातावरण निर्माण न करण्याचं आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांचं आवाहन
** राज्यात ओमायक्रॉनच्या
सहा नव्या रुग्णांची नोंद
**
राज्यात कोविडचे नवे नऊ हजार १७० रुग्ण, मराठवाड्यात एका महिलेचा मृत्यू तर
१०३ बाधित
** प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता वितरित
** राज्य परीवहन महामंडळाच्या निलंबित कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू होता येणार
नाही - व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने
आणि
** नाविन्यता आणि संशोधनासाठी शरद पवार यांचा एमजीएम विद्यापीठाला
दोन कोटी रुपयांचा निधी
****
कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी फिरती रुग्णालयं
विकसित करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण
यांनी राज्यांचे मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य सुविधांची
व्याप्ती वाढवण्यासाठी फिरत्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. संरक्षण
संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ, तसंच खासगी क्षेत्र, प्राधिकरण आणि अशासकीय संघटनांच्या
सहकार्यातून ही व्यवस्था उभी केली जाऊ शकते, या पर्यायांचा विचार केल्यास, फिरती रुग्णालयं
उभारण्याच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्यक्त केला
आहे.
****
राज्यात सध्या टाळेबंदी लावण्यात येणार नसून, याबाबत कोणीही अफवा पसरवू नये, आणि
भीतीचं वातावरण निर्माण करु नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते
काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात गेल्या दोन दिवसात कोविडच्या
रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोविडच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढू नये
यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. तूर्तास टाळेबंदीचा विचार नाही, मात्र, निर्बंध
कडक करणार असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
ते म्हणाले...
पॉझिटीव्हीटी रेट, बेड ऑक्यूपन्सी आणि ऑक्सीजन कंझ्मशन म्हणजे
आम्ही जसं मागच्या नोटीफिकेशनमध्ये सांगितलं की, लॉकडाऊन लॉकडाऊन कोणी म्हणत असेल
तरी सुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आता नाहीच. त्यामुळे लॉकडाऊनची भिती घालवू नये्. माननीय
मुख्यमंत्री महोदयांच्या प्रदीर्घ दोन तासाच्या झालेल्या आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या
मिटींगमध्ये कुठेही लॉकडाऊनच्या विषयी चर्चा नाही. जरुर निर्बंध वाढवले पाहिजे आणि
लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याचवेळेस केली ज्यावेळेस सातशे मेट्रीक टन ऑक्सीजनचं कंझ्मशन
ज्यादिवशी होईल त्यादिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होवून जाईल.
****
राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या सहा नव्या रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या चार तर पिंपरी चिंचवड इथल्या दोन रुग्णांचा समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४६० झाली आहे,
त्यापैकी १८० रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे नऊ हजार १७० रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ८७ हजार ९९१ झाली आहे. काल सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५३३
झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२
शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ४४५ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६५ लाख १० हजार
५४१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३२ हजार २२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १०३
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर औरंगाबाद जिल्ह्यात
उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल २६ रुग्ण आढळले.
लातूर २४, उस्मानाबाद २१, बीड १२, परभणी १०, तर नांदेड तसंच जालना जिल्ह्यात प्रत्येकी
पाच नव्या रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात
काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतील निवासी डॉक्टरांनी
कालपासून संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या पदधिकाऱ्यांनी काल घाटी
परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं. अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग
- ओपीडी, आणि इतर विभाग बंद राहणार असल्याचं आंदोलक डॉक्टरांनी सांगितलं. गेल्या मार्च
महिन्यात अपेक्षित असलेली, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा -नीट- पीजी
समुपदेशन २०२१ला अजूनही सुरूवात झालेली नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय
आरक्षणाच्या न्यायालयीन वादात ही प्रवेश प्रक्रीया रखडली आहे. त्यामुळे कोविडच्या तिसऱ्या
लाटेच्या अनुषंगानं राज्य शासनानं वैद्यकीय पदवी - एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
सेवेत रुजू करुन घ्यावं, अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन
हजार रुपयांचा दहावा हप्ता काल वितरित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट
लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून १० कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा
निधी वर्ग केला. या हप्त्यासाठी २० हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली.
या योजनेत आजवर १ लाख ८० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आला
आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी गुणवत्तापूर्ण बियाणं आणि खतं विकत घेणं शक्य झाल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
****
शौर्यदिनानिमित्त काल
कोरेगाव भीमा इथल्या जयस्तंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं, पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळत अभिवादन केलं. या ऐतिहासिक
जयस्तंभला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी
पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही काल जयस्तंभाला अभिवादन केलं. या ऐतिहासिक स्तंभाजवळची शंभर
एकर जमीन संपादित करून इथं राष्ट्रीय स्मारक उभारलं जावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. राज्य आणि केंद्र सरकारनं संयुक्तपणे हे स्मारक
उभारावं, याकरता केंद्र सरकारच्या
वतीनं ५० ते १०० कोटी रुपयांचा निधी
मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू, असं
ते म्हणाले.
****
राज्य परीवहन महामंडळाच्या निलंबित कर्मचाऱ्यांवर पुढची कारवाई सुरू करण्यात आल्यानं,
त्यांना आता कामावर रुजू होता येणार नाही, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय
संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासून
कर्मचारी संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही ते कामावर रुजू झाले
नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आगारप्रमुखच रुजू करून घेत नसल्याचा आरोप कर्मचारी
करत आहेत. औरंगाबाद विभागातल्या निलंबित कर्मचाऱ्यानं याबाबत अधिक माहिती देतांना,
मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे सांगत आगारप्रमुखांनी रुजू करून घेण्यास
नकार दिल्याचं सांगितलं. एसटीच्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ११ हजार आठ कर्मचाऱ्यांना
आतापर्यंत निलंबित करण्यात आलं असून, ७८३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. दोन
हजार ४७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
****
दर्जेदार शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचं आणि संकटग्रस्तांना मदत करण्याचं मोलाचे काम औरंगाबाद इथली महात्मा गांधी मिशन - एमजीएम
ही संस्था आपुलकीने करत असल्याचे
गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले आहेत.
एमजीएमचा ३९ वा वर्धापन दिन आणि एमजीएम विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन
समारंभ काल झाला, या कार्यक्रमात पवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं मुख्य प्रशासकीय इमारतीच्या
कोनशीलेचं अनावरण केलं, तर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फित कापून इमारतीचं उदघाटन
केलं. यावेळी बोलतांना पवार यांनी एमजीएम विद्यापीठाला दोन कोटी रुपयांचा निधी जाहीर
केला. यापैकी १ कोटी रुपये प्राध्यापकांमधली नाविन्यता आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी
तर १ कोटी रुपये खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपन्नतेसाठी नाविन्यपूर्ण
उपक्रमांकरता वापरले जावे. या निधीच्या व्याजाच्या रकमेतून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना
आर्थिक मदत करावी, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
***
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी तसंच लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी
म्हटलं आहे. औरंगाबाद शहरातल्या कोतवालपुरा इथं काल ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचा
शुभारंभ डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात
आला. यावेळी स्थानिक नागरिकांनी डॉ. कराड यांची गुळतुला केली.
****
लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात
येत आहे. कोरोना विषयक नियमांचं पालन करत शहरातल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये या समाधान
शिबिराचं उद्घाटन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या
हस्ते काल करण्यात आलं. तहसील आपल्या दारी अंतर्गत प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन या
योजनेचा लाभ देण्यात येत आहे
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यात ग्रामस्तरावर
ग्रामपंचायतींमधील विविध प्रकारचे लेखे अद्ययावत करण्यासाठी तसंच ग्रामपंचायत प्रशासन
सुधारण्यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, या मोहिमेत ग्रामसभा, मासिक सभा,
महिला सभा, अशा विविध कार्यांशी निगडित ३३ प्रकारचे लेखे अद्ययावत केले जातील.
****
औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियो - इकोनॉमिक
रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन संस्थेचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार जालना जिल्ह्याच्या
परतूर तालुक्यातल्या लिखित पिंप्री इथल्या संत तुकाराम गुरुकुल संस्थेला जाहीर झाला
आहे. उद्या सोमवारी दुपारी साडेचार वाजता संस्थेच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा
होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेला कालपासून देवस्वारीनं सुरुवात
झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद
पदाधिकाऱ्यांनी शासकिय महापुजा केली. मागील दोन वर्ष रद्द झालेल्या या यात्रेला
राज्यातल्या अनेक भागातून भाविक दाखल झाले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या
यात्रेत यंदा कोणतेही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी घेतला आहे.
****
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं शेतकऱ्यांना थकीत कर्ज परतफेड करण्यासाठी आकर्षक
व्याज सवलत असलेली “महाग्रामीण बळीराजा तारणहार योजने”ची घोषणा बँकेचे अध्यक्ष मिलिंद
घारड यांनी केली आहे.
// ****************//
No comments:
Post a Comment