Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 02 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
लातूर
जिल्ह्यात उदगीर इथल्या नियोजित ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी जेष्ठ कथालेखक भारत सासणे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज उदगीर इथं
बैठक झाली. या बैठकीत सर्वांनुमते ही घोषणा करण्यात
आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे आणि इतर महामंडळाचे
पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
१९८०
नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये सासणे हे अग्रगण्य असे कथालेखक आहेत. त्यांच्या कथांतून ग्रामीण, नागरी तसंच आदिवासी समाज जीवनाच्या विविध स्तराचं दर्शन घडतं.
माणसाला केंद्रबिंदू मानणाऱ्या आणि मानवी
जीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत.
त्यांच्या अनेक पुस्तकांना मानाचे आणि प्रतिष्ठेचे विविध
पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचे उत्कृष्ट
वाङ्मय निर्मितीचेही पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना मिळाले
आहेत.
वैजापूरला २०१० मध्ये
झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचं आणि हिंगोली जिल्ह्यात
वसमत इथं झालेल्या ३५व्या मराठवाडा
साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही सासणे यांनी भुषवलं आहे.
****
देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाच्या २७ हजार ५५३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात आतापर्यंत
एक हजार ५२५ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार,
देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून एक लाख २२ हजार ८०१ झाली आहे. मृत्यूंची संख्या चार लाख ८१ हजार ७७० वर गेली
आहे. काल दिवसभरात नऊ हजार २४९ रुग्ण विषाणू
मुक्त झाले असून आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख ८४ हजार ५६१ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना
विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १४५ कोटी ४४ लाख १३ हजारांहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात २५
लाख ७५ हजार २२५ लसींचे डोस देण्यात आले आहेत.
देशात आतापर्यंत २३ राज्यांमध्ये ओमायक्रॉन प्रकाराच्या
विषाणूचे एक हजार ५२५ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक ४६० रुग्ण महाराष्ट्रात त्याखालोखाल दिल्लीमध्ये ३५१
तर गुजरातमध्ये १३६
रूग्ण आढळून आले आहेत.
****
मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत एक हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी
लोकायुक्तांना दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहीर कोटेचा
आणि काही नगरसेवकांनी हा आरोप केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळानं
राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी
घरं बांधण्यात येणार असून यामध्ये सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत एक हजार ८४४ कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले
आहेत.
****
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीनं ६ जानेवारी - पत्रकार दिनी देण्यात येणाऱ्या
विविध पुरस्कारांची अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी
काल घोषणा केली. मुंबईतल्या नागरी समस्यांवर गेल्या वर्षभरात
उत्कृष्ट वृत्तांत लिखाण करणाऱ्या देवेंद्र कोल्हटकर यांना अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारितेला उपयुक्त ठरणाऱ्या
विषयावर लिहीलेल्या पुस्तकासाठी ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर यांना जयहिंद प्रकाशन
पुरस्कार. कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू,
घरदुरुस्ती या विषयांवर पत्रकारितेसाठी दिला जाणारा कॉम्रेड तु. कृ.
सरमळकर पुरस्कार नितीन बिनेकर यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर,
समीर मणियार यांनाही वेगवेगळे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ६ जानेवारीला
मुंबईत न्यायमुर्ती मृदुला भाटकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
अमरावतीत खाजगी बाजारात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी काल
कापसाला विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
जिल्ह्यात कापसाला मिळालेला हा सर्वाधिक दर ठरला आहे.
मात्र
अती पावसानं कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट
झाल्याचं मुजरी गावचे शेतकरी सचिन बारवाव यांनी सांगितलं. यामुळे कापसाला भाव
जरी अधिक मिळाला असला तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फारसा लाभ झाला नसल्याचं
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment