Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
सर्व
श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे
की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या,
तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना
लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· नवीन वर्षाचा पहिला दिवस पंतप्रधानांकडून देशाच्या अन्नदात्याला समर्पित;
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र
लाभार्थ्यांना अर्थसहाय्याच्या दहाव्या
हप्त्याचं आज वितरण
· मावळत्या वर्षाला
निरोप देऊन नववर्षाचं मध्यरात्री सर्वत्र जल्लोषात स्वागत
· कोविड लसीकरणासाठी १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या पात्र लाभार्थ्यांची आजपासून नोंदणी
· राज्यात ओमायक्रॉनचे
नवे चार तर कोविडचे नवे आठ हजार ६७ रुग्ण; मराठवाड्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू तर नव्या ६१ रुग्णांची
नोंद
· जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी
होऊन १२ जणांचा मृत्यू
· कापड उत्पादनांवरील जीएसटी दर वाढवण्याच्या निर्णयाला तुर्तास
स्थगिती
· १९ वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट
स्पर्धेत भारताला अजिंक्यपद
आणि
· बीड जिल्ह्यात आजपासून
'नो हेल्मेट नो पेट्रोल' धोरण
****
नवीन वर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला
समर्पित असणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचा दहावा हप्ता, आज त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात १० कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात २० हजार कोटी
रुपये जमा करण्यात येतील. या योजनेअंतर्गत देशातल्या पात्र शेतकरी कुटुंबांना
दरवर्षी ६ हजार रुपयांचं अर्थसहाय्य तीन समान हप्त्यात दिलं जातं. आतापर्यंत एक
लाख ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली
आहे.
याशिवाय ३५१ कृषी उत्पादक संघटनांना मिळून १४ कोटी रुपये अनुदानाचं वाटपही पंतप्रधान
करणार आहेत. सुमारे एक लाख २४ हजार शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा
मिळणार आहे.
****
मावळत्या वर्षाला
निरोप देऊन नववर्षाचं मध्यरात्री सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कोविड प्रतिबंधासाठी
शासनानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत, नववर्षाच्या स्वागताचा सोहळा
संगीत, मेजवानी आणि आतषबाजी करून साजरा करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाने राज्यासाठी तसंच
समाजासाठी अधिक निष्ठेनं आणि समर्पण भावनेनं कार्य करण्याचा संकल्प करावा, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना,
आरोग्यदायी संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. नववर्षाचं स्वागत करताना, कोरोना संकटाचं
भान राखावं. आपल्या वागण्यातून कोविड संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी
घ्यावी, असं आवाहनही, मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. नववर्षाचं स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यचं भान राखत संयमाने करावं, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.
नववर्षाच्या सुरवातीला राज्यातल्या देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची
दर्शनासाठी गर्दी होत असते. अशा ठिकाणी नागरिकांना सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
शिर्डी इथल्या
साईबाबा मंदिर प्रशासनानं संभाव्य गर्दीवर नियंत्रण
राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी जिल्हा
प्रशासनानं रात्री नऊ ते
सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेशही लागू केले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळाफुलांची नयनरम्य
आरास करण्यात आली आहे.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरता १५ ते १८
वर्ष वयोगटातल्या पात्र लाभार्थ्यांना आजपासून कोविन पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. या वयोगटासाठी येत्या
सोमवारी, म्हणजे तीन जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होईल.
आरोग्य कर्मचार्यांना आणि ६० वर्षांवरील नागरीकांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्याची मोहीम येत्या १०
जानेवारीपासून सुरु होणार आहे. पात्र लाभार्थ्यांना मात्रा घेण्याची आठवण करुन
देणारा एसएमएस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पाठवण्यात येणार आहे.
****
राज्यात काल
ओमायक्रॉनची बाधा झालेल्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये वसई-विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल इथल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४५४ झाली
आहे, त्यापैकी १५७ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे आठ हजार ६७ रुग्ण आढळले.
त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ७८ हजार ८२१ झाली आहे. काल आठ
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५२६ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक
हजार ७६६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत
६५ लाख नऊ हजार ९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ६१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला.
औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी १८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद
नऊ, परभणी सहा, नांदेड चार, तर जालना, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन नव्या
रुग्णांची नोंद झाली.
****
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराचा
संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व उपायोजना आखत आहे. या साठीची नवीन नियमावली
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केली. या नियमावलीचे पालन न केल्यास, दंडात्मक
कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.
****
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री
यशोमती ठाकूर यांना कोविडची लागण झाली आहे. ठाकूर यांनी स्वतः ट्विट संदेशाद्वारे ही
माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी
केलं आहे.
****
केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी काल औरंगाबाद
दौऱ्यावर दाखल झाल्या. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला.
****
जम्मू काश्मीरमधल्या प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर परिसरात आज चेंगराचेंगरी
होऊन बारा जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाले. भवन परिसरात झालेल्या
या दुर्घटनेनंतर मदतकार्य सुरू झालं असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
****
कापड उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कर - जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्के करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्ली इथं झालेल्या
वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह
सर्व राज्यांचे अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. कापड
उत्पादनांवरील जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचा
निर्णय या सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता, त्याची
अंमलबजावणी आजपासून होणार होती. अनेक राज्यांचे आक्षेप
लक्षात घेऊन कापड उत्पादनांवर १२ टक्के दराने जीएसटी लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात
आला आहे.
दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स -कॅट तसंच
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर - माविआचे अध्यक्ष ललित गांधी
यांनी, या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचं स्वागत केलं आहे. कपड्यांप्रमाणेच पादत्राणांवर
जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलणं आवश्यक असल्याचं
मत, कॅट चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण
खंडेलवाल तसंच ललित गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित सिद्धिविनायक सहकार
पॅनल विजयी झालं असून, महाविकास आघाडी प्रणित सहकार समृद्धी पॅनलचा पराभव झाला आहे. सिद्धिविनायक सहकार पॅनलला ११ तर सहकार समृद्धी पॅनलला आठ जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळवण्यात अपयश
आल्यानं राजन तेली यांनी सिंधुदूर्ग भाजप
जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेली यांचाही या
निवडणुकीत पराभव झाला आहे.
****
उत्तर प्रदेशातल्या कन्नौज इथले समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन
यांच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागानं काल
धाडी टाकल्या. जैन यांचं निवासस्थान, कार्यालय यासह उत्तर
प्रदेश आणि मुंबईतील जवळपास ५० मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या. अत्तर व्यावसायिक पीयूष जैन
यांच्या मालमत्तांवर वस्तू आणि सेवा कर विभागानं टाकलेल्या
छाप्यांमध्ये पुष्पराज जैन यांचं नाव समोर आलं आहे.
****
शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी गैरव्यवहार प्रकरणात, तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर
चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे याला, गुन्हे शाखा पोलिसांनी काल अटक केली. घोलप याने
२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी
कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावं आणि
हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स ॲपवर पाठवत होता. घोलपकडून ते अन्य साथीदाराला पाठवलं जात असल्याचं, तपासात समोर आलं आहे. न्यायालयानं घोलप तसंच
डोंगरे या दोघांना तीन जानेवारीपर्यंत पोलीस
कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याच प्रकरणात दिल्ली इथला एजंट आशुतोष शर्मा यालाही
पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत यंदा मकरसंक्रांतीचा
सण पर्यावरण स्नेही संक्रात म्हणून साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत,
आमचे वार्ताहर :
या सणामध्ये वाण म्हणून बहुतांशी वेळा प्लास्टिक पासून
बनवलेल्या व पर्यावरणास घातक ठरणाऱ्या विविध वस्तूंची देवाण-घेवाण केली जाते. त्याऐवजी
पर्यावरण पूरक अशा देशी बियाणे, आवळा कँडी सारखे खाद्यपदार्थ, समाजसुधारक महिलांच्या
पुस्तिका, स्वयंसहाय्यता बजत गटांनी बनवलेली विविध उत्पादने, गवती चहा,शेवगा पावडर
आदींचे आदान प्रदान करावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. या सर्व वस्तू उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत
उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या वस्तूंची खरेदी करून पर्यावरण संरक्षणाच्या कामात
सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.
अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवळे यांनी या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयही सक्रिय
सहभाग नोंदवणार असल्याचं सांगितलं. (देविदास
पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.)
****
कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक लढाईत लढलेल्या, हुतात्मा झालेल्या
वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे.
कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी
येणाऱ्या बांधवांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, शक्य
असल्यास आपापल्या घरूनच विजयस्तंभास अभिवादन करावं असं आवाहन
उपमुख्यमंत्री पवार यांनी जनतेला केलं आहे.
दरम्यान, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज
भीमा - कोरेगाव इथं सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान उपस्थित राहून
मानवंदना अर्पण करणार आहेत. त्यानंतर १२ वाजता
ते वढू-बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देवून
अभिवादन करणार आहेत.
****
१९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस
क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर नऊ गडी राखून मात करत विजेतेपद पटकावलं.
दुबईत झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे
श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकांत नऊ बाद १०६ धावा करू शकला. पावसानं
व्यत्यय आणल्यामुळे हा सामना ३८ षटकांचा खेळवला गेला. भारताला विजयासाठी डकवर्थ
लुईस नियमानुसार ३८ षटकांत एकशे दोन धावांचं लक्ष्य देण्यात आलं. भारतीय संघानं बावीसाव्या
षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं. भारताचं हे सलग तिसरं विजेतेपद
आहे.
****
बीड जिल्ह्यात आजपासून
'नो हेल्मेट नो पेट्रोल' धोरण राबवण्यात येणार आहे. हेल्मेट परिधान केल्याशिवाय
दुचाकीस्वारास पेट्रोल, डिझेल,
एल.पी.जी गॅस देण्यात येऊ नये, असे निर्देश, बीड जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंप धारकांना
देण्यात आले आहेत.
****
परभणी शहरातील शनिवार बाजार इथं फळं तसंच भाजीपाला विक्रेत्यांना
कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय आज शनिवारी
विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी याबाबतचे
आदेश काढले आहेत.
दरम्यान, कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता जिल्हा महसूल प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात
प्रतिबंधात्मक उपाययोजना आजपासून लागू केले
आहेत. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांनी याची कठोर अंमलबजावणी
करावी. आदेशाचं पालन न झाल्यास संबंधितांविरुध्द कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
राज्यातल्या शाळांपैकी त्रुटी पूर्तता केलेल्या
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अनुदानास पात्र घोषित कराव्यात अशी आग्रही मागणी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या कडे केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आमदार चव्हाण यांनी या
मागणीचं निवेदन सादर केलं. यासाठी १०४ कोटी रुपये निधीची गरज
असून, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार चव्हाण
यांनी या निवेदनात केली आहे.
****
No comments:
Post a Comment