Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२२ सायंकाळी
६.१०
****
· करदात्यांना अनुकूल आणि पारदर्शक कर प्रशासनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त.
· महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटकांसाठी विविध सोयी-सवलती जाहीर.
· स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा राज्यभरात
७५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प.
आणि
· लातूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड.
****
करदात्यांना अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अशा
कर प्रशासनाची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते आज
नागपुरात नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस-एनएडीटी इथं भारतीय महसूल सेवा-आयआरएस
अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत
होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष
कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. महोपात्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
करप्रणाली सुलभ करण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपतींनी ऐच्छिक कर अनुपालनाच्या
दिशेने ‘अपडेट रिटर्न’ सादर करण्यासारख्या आयकर विभागाच्या निर्णयाचं कौतुक केलं.
****
रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी मुंबईतल्या
वातानुकुलित उपनगरी रेल्वे गाडीच्या तिकीटदरात ५० टक्क्यांनी कपातीची घोषणा केली आहे.
गॉथिक वास्तुरचना यादीत असलेल्या आणि एकशे एकोणसत्तर वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या
नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी दानवे बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईतली रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या
सोयीसुविधांसाठी विमानतळांसारखी अद्ययावत केली जाणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री
दानवे यांनी सांगितलं.
****
मनी लाँड्रिग प्रकरणी कारागृहात असलेले राज्याचे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या १३ मे पर्यंत वाढ करण्यात
आली आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने देशमुख यांना आज २९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली
होती,त्यात आता १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
****
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामीन
अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होऊ शकली नाही, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार,
इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर
उद्या शनिवारी सुनावणी घेण्यात येईल असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितलं. गेल्या
२४ एप्रिलपासून राणा दांपत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.
****
केंद्र सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी
वाटेल तसे निर्णय घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली
आहे. ते आज पुण्यात बोलत होते. केंद्र सरकार महाराष्ट्र अस्थिर करण्याचा सातत्याने
प्रयत्न करत आहे, मात्र महाराष्ट्र याला बळी पडणार नाही असं पटोले यांनी स्पष्ट केलं
****
मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळ-एमटीडीसीने पर्यटकांसाठी विविध सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. ऐतिहासिक स्थळं,
समुद्रकिनारे, आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये ग्रूप बुकिंगला सवलत, शालेय
सहलींना सवलत, तसंच मोफत नाष्टा मिळणार आहे. याशिवाय पर्यटनस्थळांवर लग्नसोहळे, विवाहपूर्व
छायाचित्रण, तसंच स्वागत समारंभही आयोजित करता येणार असून याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद
मिळत असल्याचं, एमटीडीसीकडून सांगण्यात आलं आहे. या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक
उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक
यांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेसची शिबिरंही प्रस्तावित असून स्थानिक सहली,
ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ, इत्यादी
बाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासाठी एमटीडीसीच्या
संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू असल्याची माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक
दीपक हरणे यांनी दिली आहे.
****
नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयात
७५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षारोपण मोहिमेला परवा एक
मे रोजी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाने प्रारंभ
होईल. विद्यापीठ परिसरात यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते एकाच वेळी ७५० रोपं लावली
जाणार आहेत. ही झाडं विशिष्ट पध्दतीने लावली जाणार असून याद्वारे रुची उद्यान, गंध
उद्यान, श्रवण उद्यान, दृष्टी उद्यान आणि स्पर्श उद्यान तयार करण्यात येत आहेत. वृक्षांच्या
सानिध्यात मानवी शरिरातील पाचही ज्ञानेंद्रिय उल्हासित होतील अशी त्यामागे कल्पना असल्याचं
कुलगुरू कानिटकर यांनी सांगितलं. या झाडांची काळजी घेण्यासाठी विविध गट तयार करण्यात
आले आहेत, झाडांना नियमित पाणी, सावली मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं,
विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय
कृषि पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यामध्ये लिंबाळवाडी इथले नागनाथ पाटील, मोहनाळचे
दिनकर पाटील, महादेववाडीचे ओमकार मसकल्ले आणि
मुरुड बुद्रुक इथले मुरलीधर नागटिळक यांचा समावेश आहे. राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसंच कृषीउत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात
येणार आहे. येत्या २ मे रोजी नाशिक इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि
२०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
परवा एक मे रोजी औरंगाबाद इथं नियोजित सभेसाठी उद्या शनिवारी सकाळी पुण्याहून रवाना
होणार आहेत. या प्रवासादरम्यान ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन
अभिवादन करणार आहेत. मनसे नेते बाबू वागस्कर यांनी ही माहिती दिली. राज ठाकरे यांच्या
औरंगाबाद इथल्या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे.
****
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक झाली. पोलिस
अधिक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद - रेणीगुंठा ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी
आता तिरुपती रेल्वेस्थानकापर्यंत धावणार आहे. हा बदल सहा मे पासून करण्यात येणार आहे.
तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती
दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात सध्या १५ पूर्णांक
८१ शतांश दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उजनी धरणाच्या वर असलेल्या पुणे
जिल्ह्यातील टेमघर धरण कोरडे पडले असून पानशेत आणि वरसगाव या धरणातील पाण्याचीही वेगाने
घट सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment