Friday, 29 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या इतर मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी राज्य सरकारनं पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे करावी, अशी शिफारस ओबीसी समन्वय मंत्रिमंडळ उपसमितीनं केली आहे. या समितीने काल आपला अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर सादर केला.

****

कोरोना साथीचा धोका अद्यापही पूर्णपणे गेलेला नसल्यानं चीनसाठी प्रवासी व्हिसा देणं योग्य ठरणार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनने स्वतःच गेल्या नोव्हेंबर २०२० पासून भारतीयांना बहुतांश प्रकारचे व्हिसा देणं बंद केल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ता अरिन्दम बागची यांनी सांगितलं.

****

आयएनएस विक्रांत बचाव निधी फसवणूक प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत, मुंबई उच्च न्यायालयानं, १४ जूनपर्यंत वाढवली आहे. आयएनएस विक्रांत या नौदलाच्या नौकेची भंगारात विक्री होण्यापासून वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रावर आहे.

****

ग्रामीण भागातल्या महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना येत्या आर्थिक वर्षात, पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पतपुरवठा करुन बँकांनी इतिहास घडवावा, असं आवाहन, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केलं आहे. काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स बैठकीत ते बोलत होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात, पतपुरवठ्याचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा, या बैठकीत सन्मान करण्यात आला.

****

बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरीटचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून, दोन जण फरार आहेत.

****

राज्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल सर्वाधिक ४५ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं ४३, तर जालना, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात काल ४२ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. विदर्भात २ मे पर्यंत उष्णतेची लाट असेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.

****

No comments: