Saturday, 21 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १५ लाख ३२ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी १२ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या दोन हजार ३२३ रूग्णांची नोंद झाली. या संसर्गाच्या २५ रुग्णांचा काल उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ३४६ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

****

भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरातल्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिलं असून गेल्या आर्थिक वर्षात भारतामध्ये त्र्याऐंशी अब्जांहून अधिक अमेरिकी डॉलरची; थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी परदेशी गुंतवणूक असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. वर्ष २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात देशात झालेल्या परदेशी

गुंतवणुकीमध्ये पंच्च्याऐंशी टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या चार आर्थिक वर्षात भारतात ३०१ अब्जांपेक्षा जास्त अमेरिकी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. तर आर्थिक वर्ष २००३-०४ पासून आतापर्यंत देशात झालेल्या परदेशी गुंतवणुकीनं वीस पट वृद्धी नोंदवल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात झालेल्या परदेशी गुंतवणुकीमधला ३८ टक्के वाटा कर्नाटक राज्याचा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि नवी दिल्लीचा क्रमांक आहे.

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ३१ वी पुण्यतिथी. यानिमित्त दहशतवाद विरोधी दिन पाळण्यात येत आहे. दहशतवादाचे संपूर्ण जगावर प्रतिकुल परिणाम होत असून, दहशतवाद हा मानवतेसाठी आणि वैश्विक शांततेसाठी घातक असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांनी एका संदेशात म्हटलं आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी लोकांनी संकल्प करावा, असं आवाहन नायडू यांनी आपल्या संदेशात केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमातील संदेशाद्वारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांना दिल्लीच्या वीरभूमी इथं श्रद्धांजली वाहिली. प्रियंका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही राजीव गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केलं.

****

पुणे इथल्या लाल महालात लावणी चित्रित केल्या प्रकरणी तिघांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांचा यात समावेश असून रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पवित्र वास्तूचं पावित्र्य भंग केलं म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोळा एप्रिल रोजी हे चित्रीकरण करण्यात आलं होतं. संभाजी ब्रिगेडनं या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं दादर ते तेलंगणातल्या काझीपेठ दरम्यान उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वेच्या बावीस फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाडीची पहिली फेरी येत्या २५ तारखेला काझीपेठ इथून सुरू होणार आहे. ही गाडी नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे दादर इथं पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी दादरहून निघून त्याच मार्गे काझीपेठला पोहोचेल.

****

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचं या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आलं असून, सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५१४ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यातल्या अधिक जीर्ण झालेल्या ६१ इमारतींची विज आणि पाणी जोडणी खंडीत करण्यात येईल, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी १०७ गावांतील संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापना मार्फत आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या १०७ बाधित गावातील पूर आराखडे तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बँकॉक इथं सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची चा २१ - १५, २० - २२, २१ - १३ असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीनच्या चेन यू फेई हिच्यासोबत होणार आहे.

****

No comments: