Friday, 27 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 May 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      सामाजिक कार्यात महाराष्ट्राने अग्रणी भूमिका बजावली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन.

·      कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट.

·      ऊस गाळप न झाल्यानं जालना जिल्ह्यातल्या शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न.

आणि

·      महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात कर्ज वाटप महामेळाव्यात ६०८ बचत गटांना सात कोटी ९८ लाख रुपयांचं कर्ज वाटप.

****

सामाजिक कार्यात महाराष्ट्राने अग्रणी भूमिका बजावली, तसंच महाराष्ट्र ही संताची भूमी असून, संतांनी देशाला सकारात्मक आणि अध्यात्मिक विचार दिले, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. दगडूशेठ दांम्पत्यानं गणपती आणि दत्तात्रय या देवतांच्या पुजेच्या माध्यमातून देशसेवेत महत्वाची भुमिका पार पाडल्याचं त्यांनी नमूद केलं. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राज्यपाल भगतसिं कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप परदेशी यावेळी उपस्थित होते. मंदिराच्या लक्ष्मीदत्त या कॉफिटेबल बुकचं प्रकाशन यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. कोरोना काळात ट्रस्टनं केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ प्राजक्ता काळे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते, लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं.

****

मुंबईत गिरगाव इथल्या बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून 'मराठी नाट्य विश्व' ही नाट्यगृह आणि मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचं संग्रहालय व्हावं, अशी आपली इच्छा होती, ती लवकरच मराठी नाट्य विश्व इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. थ्रीडी, फोरडी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटकं रेकॉर्ड व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी नाट्य विश्वाच्या इमारतीची संकल्पना चित्रफित देखील यावेळी सादर करण्यात आली.

****

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सहा जणांना अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीनं क्लिनचीट दिली आहे. तर १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सबळ पुराव्यांअभावी सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नसल्याचं एनसीबीचे विभागीय संचालक संजय सिंह यांनी सांगितलं. गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर ला एनसीबीकडून कॉर्डिलिया क्रूझवर मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती.

****

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यातल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि  संशोधन संस्था- आय आय एस ई आर ला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेचे  उच्चपदस्थ अधिकारी आणि सर्व विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली. त्यानंतर प्रधान यांनी परम ब्रम्ह महासंगणक कक्षाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते डेटा सायन्स विभागाची कोनशिला बसवण्यात आली. यानंतर नॅशनल फॅसिलिटी फॉर जिन फंक्शन इन हेल्थ ऍण्ड डीसीस इमारतीचं उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झालं. इंद्राणी बालन विज्ञान केंद्र आणि पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेला देखील त्यांनी भेट दिली.

****

महाबीजने सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत दोन हजार रुपयांनी वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसणार असल्यानं राज्य शासनाने सोयाबीन उत्पादकांना प्रती एकर दोन हजार रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या राज्यातल्या कांदा आणि संत्री उत्पादक शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणीही, डॉ. बोंडे यांनी यावेळी केली. 

****

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या भोगाव इथल्या सुभाष सराटे आणि मीरा सराटे या दाम्पत्यानं आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. साखर कारखान्याकडे विनंती करुन देखील शेतातला ऊस तोडून नेत नसल्यानं या दाम्पत्यानं विषारी द्रव पिण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानं अनर्थ टळला. दरम्यान, जिल्ह्यातल्या चार साखर कारखान्याच्या क्षेत्रात साडेसहा लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात कर्ज वाटप महामेळाव्यात आज  ६०८ बचत गटांना सात कोटी ९८ लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं. बचत गटातील महिला आणि मुलींचं शिक्षण, महिला रोजगार निर्मिती, बालविवाह रोखणं, गावातल्या अनिष्ट प्रथा बंद करणं यासाठी एकत्र येण्याची गरज उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. महिला बचत गटाला व्यवसायासाठी कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचं ते म्हणाले. या अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झालेल्या महिलांनी आता इतर महिलांना मदत करण्याची गरज जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली.

****

राज्य शासनानं इतर मागास प्रवर्ग - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरता मध्य प्रदेश प्रमाणे सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करावा, अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. माळी महासंघानं यासंदर्भात सुरु केलेली जनसंपर्क यात्रा औरंगाबाद इथं दाखल झाली आहे. राज्य सरकारनं गठित केलेल्या समर्पित आयोगानं ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका स्तरावर इम्पेरिल डाटा गोळा करून ओबीसींची लोकसंख्या निश्चित करावी आणि या लोकसंखेच्या आधारावर अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, असं ठाकरे म्हणाले.

****

अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करुन जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात औरंगाबाद इथले राज्य सरकारी कर्मचारी आज सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. प्रशासकीय सर्व विभागातली रिक्त पदं वैधानिक पद्धतीनं कायम स्वरुपी भरावी, कंत्राटी आणि रोजंदारीवर दीर्घकाळ काम करणाऱ्यांना समान काम समान वेतन देऊन त्यांची सेवा नियमित करावी दी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आलं.

****

मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्सिटिट्यूट - मार्टी ची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी मार्टी कृति समितीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्यात समाजकल्याणच्या धर्तीवर अल्पसंख्याक विभागाच्या योजना एकाच छताखाली राबवून अल्पसंख्याक भवन अणि कार्यालय स्थापन करावं, उच्च श्रेणी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अल्पसंख्याक मुस्लिम प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्याचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचा कालावधी ऑगस्ट शेवटी संपत आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकांसदर्भात विद्यापीठ विकास मंचच्या डॉ. योगिता तौर होके पाटील, डॉ. हरिदास विधाते, प्राध्यापक संजय गायकवाड यांच्या शिष्टमंडळानं आज कुलगुरु प्रमोद येवले यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक २०२२ ची अधिकृत घोषणा करावी आणि लवकरात लवकर पदवीधर नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

****

मध्य रेल्वे विभागात नॉन इंटरलॉकिंग काम करण्यात येणार असल्यानं मुंबई - जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ३० आणि ३१ मे हे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं हि माहिती दिली आहे.

दरम्यान, नांदेड-संत्रागाच्ची-नांदेड रेल्वेगाडीच्या ३० मे ते २२ जून दरम्यान चार फेऱ्या पूर्णतः रद्द करण्यात आल्याची माहितीही दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातल्या खारतळेगाव इथं एक बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाला यश आलं. बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर ग्राम बाल समितीची बैठक घेऊन सदर मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, सं हमीपत्र मुलीच्या पालकांकडून भरून घेण्यात आलं.

****

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात कंटेनर आणि कारच्या भीषण अपघातात कार मधल्या चोघांचा मृत्यू झाला. मृत सर्व जण एकाच कुटुंबातले असून ते लग्नकार्यासाठी जात असतांना हा अपघात झाला.

****

मोसमी पावसाचं आगमन येत्या दोन- तीन दिवसांत केरळमध्ये होण्याच्या दृष्टीने वातावरण अनुकूल आहे, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. याशिवाय अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या काही भागात नैऋत्य मान्सूनची आगेकूच होण्याचीही शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...