Saturday, 21 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.05.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      ज्ञानवापी प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

·      एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देण्याचे रिजर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश

·      अनाथ बालकांना दत्तक घेण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाचं प्रतिपालकत्व पोर्टल

·      ओबीसी आरक्षण प्रकरणी चालढकल केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल-खासदार डॉ.प्रीतम मुंडे

·      केसर आंबा आणि मोसंबीच्या निर्यातीसाठी सरकार प्रयत्नरत-फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

·      हिंगोलीत तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष यशस्वी

·      चंद्रपूर जिल्ह्यात टँकर आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू

आणि

·      मराठवाड्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस; तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा

 

 

सविस्तर बातम्या

वाराणसी इथलं ज्ञानवापी मशीद प्रकरण वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या चित्रीकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीशांनी कशाप्रकारे काम करावं याचे आदेश आपण देणार नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू करण्यास न्यायालयानं आठ आठवड्यांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे च्या अंतरिम आदेशाचं पालन करावं, तसंच जोपर्यंत जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी काही निर्णयापर्यंत येत नाही, तोपर्यंत शिवलिंगाची सुरक्षा आणि नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येता कामा नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.

****

काँग्रेस नेते माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी काल पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. ३४ वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सिद्धू यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा इथं गुरनाम सिंग या ६५ वर्षीय वृध्दासोबत झालेल्या हाणामारीत गुरनाम यांचा मृत्यू झाला होता.

****

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि मुलगी मिसा भारती यांच्याविरोधात रेल्वेभरती घोटाळा प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं गुन्हे दाखल केले आहेत. लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित १७ ठिकाणी सीबीआयनं छापे मारले. २००४ ते २००९ या कालावधीत लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही परीक्षेशिवाय २७६ जणांना रेल्वेत भरती करुन घेतलं, त्याबदल्यात त्यांच्याकडून जमीन आणि भूखंड घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

****

एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देण्याचे निर्देश भारतीय रिजर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. फसवणुकीला आळा घालण्यासाठी गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना एटीएममधून कार्ड-शिवाय पैसे काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या काही बँकांद्वारेच ही सुविधा दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एका परिपत्रकाद्वारे बँकेनं हा आदेश दिला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कसह युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस जोडण्याचा सल्ला देण्यात आल्याचंही बँकेनं म्हटलं आहे.

दरम्यान, रिजर्व्ह बँकेनं २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३०७ कोटी रुपये अधिशेष केंद्रसरकारला द्यायला मंजुरी दिली आहे.

****

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड लसीकरण मोहिमेची गती कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली असून, मोहिमेला गती देण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भातल्या बैठकीत, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं सूचित केलं आहे. पुढील महिन्यापासून घरोघरी जावून या अभियानाबाबत जागरूकता निर्माण करावी, असं त्यांनी सांगितलं आहे. कोविड लसीच्या मात्रा वाया जाऊ न देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३११ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८२ हजार १६९ झाली आहे. काल या संसर्गाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २७० रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३२ हजार ५५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ७६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संस्कारांवर काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते काल पुण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या तेराव्या पदवीप्रदान सोहळ्यात बोलत होते. या पदवीप्रदान समारंभात पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली, त्यात २६ सुवर्णपदकं आणि १२ पीएचडीचा समावेश आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा नियोजित अयोध्या दौरा रद्द केला आहे. येत्या पाच जून ला ते अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. ठाकरे यांनी ट्विट संदेशात हा दौरा तूर्तास स्थगित केल्याची माहिती दिली असून, यासंदर्भात २२ मे ला पुणे इथल्या नियोजित सभेत सविस्तर भाष्य करणार असल्याचं म्हटलं आहे.

****

महिला आणि बालविकास विभागानं अनाथ बालकांना दत्तक घेण्यासाठी प्रतिपालकत्व पोर्टल तयार केलं आहे. आतापर्यंत या पोर्टलवर दहापेक्षा अधिक पालकांनी नोंदणी केली असून याबाबत विभागामार्फत पुढील प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली. अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतिपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करत पोर्टलला  सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आनंड वाटत असल्याचं त्या म्हणाल्या.

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. २१ मे १९९१ रोजी तमिळनाडू राज्यात श्रीपेरुम्बुदूर इथं आत्मघातकी मानवी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला.

काल मुंबईत मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं त्यानंतर मंत्रालयाच्या प्रांगणात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने शपथ घेण्यात आली.

****

राज्याचा महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी अपयशी ठरलं असून, या प्रश्नाबाबत चालढकल केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिला आहे. त्या काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ओबीसीना आरक्षण मिळावं, अशी महाविकास आघाडी सरकारची इच्छाशक्तीच नाही, म्हणूनच सुरवातीपासूनच या सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण टिकू नये याकरता कृती केल्याचा आरोप डॉ मुंडे यांनी यावेळी केला. मध्यप्रदेश सरकारप्रमाणे सर्व चाचण्या पूर्ण करून, आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं खासदार मुंडे यांनी नमूद केलं.

****

मराठवाड्यातल्या भौगोलिक मानांकन प्राप्त केसर आंबा आणि मोसंबी यांची निर्यात करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचं, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे. कृषी पणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं औरंगाबादच्या जाधववाडी इथं चार दिवसीय आंबा महोत्सवाचं उद्धाटन भुमरे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरात केसर आंब्याच्या विक्रीसाठी १२ ठिकाणी आंबा विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. केसर आंबा आणि मोसंबी निर्यातीसाठी आवश्यक प्री कुलींग, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस या सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असून, यांच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, काल पहिल्या दिवशी या आंबा महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

****

हिंगोली जिल्ह्यात काल एकाच दिवशी तीन बालविवाह रोखण्यात आले. कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा इथं दोन बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर  जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी विधीज्ञ अनुराधा पंडित आणि त्यांच्या पथकाने विवाहस्थळी जाऊन कारवाई केली. एका लग्नात मुलगी तर दुसऱ्या लग्नात मुलगा अल्पवयीन असल्याचं आढळून आलं. तिसरा बालविवाह देववांडी इथं होणार होता, तोही रोखण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

हिंगोली ते सेनगाव राज्य रस्त्यावर सरकळी पाटीजवळ काल सकाळी कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात कारचा चालक ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हिंगोली इथून सेनगावकडे जात असताना टेम्पोनं कारला धडक दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर इथं काल पहाटे टँकर आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक मध्ये समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. 

****

जालना जिल्ह्यात गाळपाअभावी शिल्लक उसाच्या निषेधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आलं. शिल्लक उसाला तातडीने तोड देण्यात यावी, एकरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावं, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात परळी, वडवणी इथं काल पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही लातूरसह चाकूर, औसा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाऊस झाला. परभणी शहर परिसरातही काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी साचल्यानं, वाहनचालकांची तारांबळ उडाली. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथंही सुमारे तासभर पाऊस झाला.

नांदेड शहरात काल रात्री सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. या पावसामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

या पावसामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणच्या तापमानात लक्षणीय घट झाली त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

****

हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा आणि अत्याचार प्रतिबंधाच्या अनुषंगानं कायदेविषयक जनजागृतीसाठी राबवण्यात येणारं ‘जननी अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यासाठी महिला आयोगाच्या वतीनं प्रयत्न करण्यात येईल, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी म्हटलं आहे. हिंगोली इथं पोलिस विभाग, आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या बेंबळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातल्या कृषी पर्यवेक्षक अलका सांगळे यांना दोन हजार रुपये लाच घेतांना उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजेनमधून घेतलेल्या तुषार आणि ठिबक सिंचनच्या अनुदानाचा अहवाल शासनाकडे ऑनलाईन पाठवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडीअंती दोन हजार रुपये घेतांना त्यांना पकडण्यात आलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं शहरातल्या ४६ वसाहतींची जातीवाचक नावं बदलली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुलमंडीजवळचा कुंभारवाडा आता तुळशीबाग या नावाने तर रंगारगल्ली यापुढे हिंगलाजनगर या नावाने ओळखली जाईल.

****

नांदेड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गांडुळ खताचे १९९ प्रकल्प उभारण्यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार  आहे. यासाठी संबंधितांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. ३१ मे पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...