Sunday, 22 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.05.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला. ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘समान नागरी कायदा’ आणावा, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी त्यांनी केली. औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येतं. तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या, उसाचा प्रश्र्न याकडे त्यांनी यावेळी कक्ष वेधलं. मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. राज्यात सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्द्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं. `एमआयएम`ला मोठं करण्याचं राजकारण करण्यात आलं, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.

****

देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ३७ हजार ३८१ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी २८ लाख ६६ हजार ५२४ मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या दोन हजार २२६ रूग्णांची नोंद झाली. या संसर्गाच्या ६५ रुग्णांचा काल उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार २०२ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

****

आज जैवविविधता दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे. जैवविविधता हे महत्त्वाचं संसाधन असून यावर आपलं भविष्य अवलंबून असल्याचं राष्ट्रपतींनी या संदर्भातल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. जैवविविधता जपण्यासाठी आणि खंडित झालेल्या परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक रितीनं प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी केलं.

****

केरळमध्ये येत्या पाच दिवसांत विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात मोसमी पाऊस येत्या बारा जून ते पंधरा जून या कालावधीत संपूर्ण राज्यभर कार्यरत होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळ नंदुरबार - डहाणू बसचा भीषण अपघात आज टळला. नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनानं हुलकावणी दिल्यानंतर बसचालकानं प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजुला मातीत उतरवत अपघात टाळला, यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

****

उच्चतम गुणवत्ता यामुळं सांगलीच्या हळदीनं सांगलीचं नाव सातासमुद्रापार नेलं आहे. सांगली जिल्ह्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी 'पिंक सिटी'च्या धर्तीवर आता 'यलो सांगली सिटी' ची संकल्पना साकारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला आहे. सांगली महापालिकेच्या इमारतींपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थॉमस आणि उबेर चषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघातील खेळाडुंची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. ‘आपण हे करू शकतो’ ही खेळाडुंची भावना देशाची एक नवी शक्ती म्हणून नावारुपाला आली असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सरकार खेळाडुंना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पतंप्रधानांनी दिली. पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खेळाडुंनी यावेळी त्यांचे आभार मानले. यावेळी खेळाडुंनी आपले अनुभव सांगितले. 

****

थायलंड इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला उपांत्यंफेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दोन वेळा ऑलिंपिक विजेत्या चीनच्या चेन यू फेईकडून सिंधूचा १७-२१, १६-२१, असा सरळ सेटमध्ये पराभव झाला.

****

भ्रमणध्वनीसाठी मनोरा उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याची बतावणी करणाऱ्या व्यक्ती, यंत्रणा आणि कंपन्यांपासून जनतेनं सावध राहण्याची सूचना दूरसंचार विभागानं केली आहे.

****

No comments: