Sunday, 22 May 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.05.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

‘आजादी का अमृत महोत्सव’च्या अंतर्गत केंद्रीय संस्कृती मंत्रालय आजपासून पुढल्या वर्षी २२ मे पर्यंत राजा राम मोहन राय यांची अडीचशेवी जयंती साजरी करणार आहे. कोलकाता इथं या जयंती उत्सवाचं आज उद्‌घाटन होणार असून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यात सहभागी होत आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ३७ हजार ३८१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी २८ लाख ६६ हजार ५२४ मात्रा देण्यात आल्या आहेत. 

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३०७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८२ हजार ४७६ झाली आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात सभा घेत आहेत. पक्षाचे राज्यभरातले कार्यकर्ते या सभेसाठी पुण्यात दाखल होत आहेत.

****

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळ नंदुरबार - डहाणू बसचा मोठा अपघात आज टळला. नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनानं हुलकावणी दिल्यानंतर बसचालकानं प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजुला मातीत उतरवत अपघात टाळला, यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

****

आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तातडीनं नियोजन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते काल जालना इथं बोलत होते.

****

केरळमध्ये येत्या पाच दिवसांत विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात मोसमी पाऊस येत्या बारा जून ते पंधरा जून या कालावधीत संपूर्ण राज्यभर कार्यरत होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments: