Monday, 23 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.05.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 May 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मे २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारची ही पेट्रोलच्या दरात दोन रुपये आठ पैसे तर डिझेलच्या दरात एक रुपया चव्वेचाळीस पैसे प्रती लिटर कपात

·      इतर मागास प्रवर्ग आरक्षणासाठी स्थापित विशेष आयोगाला औरंगाबाद विभागातल्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांची निवेदनं सादर

·      केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातल्या वादामुळे मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांचा आरोप

·      औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता असल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची टीका

·      राज्यात कोविड संसर्गाचे ३२६ नवे रुग्ण

·      औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज भारतीय जनता पक्षाचा ‘जलआक्रोश मोर्चा

·      सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जण तर जालना शहरात टँकरनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन कामगार महिला जागीच ठार

आणि

·      दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

****

सविस्तर बातम्या

केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनं काल पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर `व्हॅट`मध्ये कपात केली आहे. पेट्रोलवर दोन रुपये आठ पैसे तसंच डिझेलवर एक रुपया चव्वेचाळीस पैसे प्रती लिटर कपात करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे अडीच हजार कोटी रुपये भार पडणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं कर कमी केल्यामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी तर डिझेलच्या दर ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाला आहे.

****

इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासाठी स्थापन विशेष आयोगानं काल औरंगाबाद विभागातल्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांशी चर्चा केली तसंच लेखी निवेदनं स्वीकारली. आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात ही निवेदनं स्वीकारण्यात आली.

दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी या बैठकीत आयोगाच्या सदस्यांची नावं असलेली यादी फाडून निषेध केला. ओबीसी आयोगाची समिती ही बोगस पद्धतीनं नियुक्त केली असून त्यामध्ये मराठा समाजाचा एकही प्रतिनिधी मुद्दाम घेण्यात आला नसल्याचा आरोप रमेश केरे यांनी यावेळी केला. ओबीसींची जनगणना गाव, तांडा, वाड्या, वस्त्यांवर जाऊन करावी, मराठा समाजाला इतर मागास वर्ग - ओबीसीतून  आरक्षण देण्यात यावं या मागणीसह अन्य मागण्या येत्या नऊ ऑगस्ट पर्यंत मान्य न झाल्यास मुख्यमंत्री हटावची हाक देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा केरे पाटील यांनी यावेळी दिला.

****

ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ दिखावा असून, दोन तासांच्या भेटींमधून आयोग नेमका कोणती माहिती गोळा करणार, अशी विचारणा भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. या आयोगानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन माहिती गोळा करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत मोठा कालावधी वाया घालवल्याचा आरोपही विखे पाटील यांनी यावेळी केला.

****

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या वादामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला असून  विकासाचा अनुशेष दूर होण्याऐवजी तो वाढत चालला असल्याची टीका मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केली आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ काब्दे यांचा काल हिंगोली इथं सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कामं व्हायला हवीत अशी अपेक्षा काब्दे यांनी व्यक्त केली, मराठवाड्याला योग्य न्याय मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

****

औरंगाबादच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याची ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली आहे. औरंगाबाद इथल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत मराठवाडा ऑटो क्लस्टर अंतर्गत उद्योजकांच्या कायम स्वरुपी उत्पादन प्रदर्शन केंद्राचं उद्‌घाटन काल कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रामुळं मराठवाडा विभागातील उत्पादन क्षमता सिद्ध होईल, असं ते म्हणाले. या माध्यमातून लघुउद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसंच भावी उद्योजक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होईल, असा विश्वास डॉ कराड यांनी यावेळी व्यक्त केला.

****

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते काल पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीनगर नामकरण करून, हा मुद्दा निकाली काढावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी देशात समान नागरी कायदा तसंच लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. नियोजित अयोध्या दौरा रद्द झाल्याच्या अनुषंगाने बोलताना ठाकरे यांनी, नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा केला. पायाच्या दुखण्यासाठी येत्या एक जून रोजी नियोजित शस्त्रक्रिया आणि अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता, यामुळे हा दौरा थांबवल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. औरंगजेब कबरीला एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांची भेट, औरंगाबाद सह अनेक शहरांचा विस्कळीत पाणी पुरवठा, शिल्लक उसामुळे शेतकरी आत्महत्या, भोंगे आणि हनुमान चालिसा, यासह अनेक विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३२६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८२ हजार ८०२ झाली आहे. काल या संसर्गाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २५१ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३३ हजार ४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ९०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८९ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार २६ मे पर्यंत `माय जी ओ व्ही ओपन फोरम`वर किंवा `नमो ॲप` वर नोंदवता येतील. तसंच १८०० ११ ७८०० या क्रमांकावर आपला संदेश ध्वनिमुद्रीत करुनही पाठवता येणार आहे.

****


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नागपूर इथं संरक्षण मंत्रालयातल्या विविध विभागांच्या कार्याचा आढावा घेत अधिकारी-मान्यवरांशी संवाद साधला. संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सिंह यांना यावेळी लष्करी संरचना आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांतर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती विमानतळावरच्या बैठकीमध्ये देण्यात आली. संरक्षण मंत्र्यांना यावेळी संरक्षण विभागाअंतर्गत सैन्य दल, वायूदल तसंच संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या सर्व संबंधितांनी संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्यावर लक्ष केंद्रित करताना बाहेरच्या देशांमधल्या तंत्रज्ञानाच्या गतीशी साधर्म्य बाळगण्याचं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं. एअर मार्शल शशीकर चौधरी तसंच अन्य मान्यवर, लष्करी तसंच सनदी अधिकाऱ्यांनी त्यांचं नागपूरमधील आगमनावेळी स्वागत केलं. 

****

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी काल देशभरात २२५ ठिकाणी एकाच वेळी 'क्रीडा भारती' च्या माध्यमातून दुचाकी वाहन फेरी काढण्यात आली. औरंगाबादेत झालेल्या या रॅलीमध्ये २५० प्रशिक्षक आणि खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केलं. क्रीडा भारती औरंगाबादचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या दुचाकी फेरीची सुरुवात शहरातल्या भारत माता मंदिर इथून झाली. वेरूळ इथल्या शहाजी राजे जन्मस्थळ असलेल्या मालोजीराजे भोसले गढी इथं या वाहन फेरीचा समारोप झाला.

****

औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्यावतीनं  महानगरपालिका कार्यालयावर ‘जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता पैठण गेट इथून या मोर्चाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाण्याचा खंड वाढवण्यात आला आहे तेव्हापासूनची पाणी पट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेनं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात फलक लावले आहेत. पाणी पट्टी निम्मी केली असल्याचं नमूद करत केंद्र सरकारनं घरगुती गॅसची किंमत कमी करावी, अशी मागणीही शिवसेनेनं या फलकांद्वारे केली आहे.    

****

राज्य घटना हा बोलण्याचा नव्हे तर जगण्याचा विषय असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं मार्गदीप समुहाच्या “आम्ही भारताचे लोक या पहिल्या विचार संमेलनाचं काल त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झालं, त्यावेळी नरके बोलत होते. मार्गदीप समुहाच्या सदस्यांना मार्गदीप रत्न पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं. `राज्य घटनेचे लाभार्थी आणि त्यांचे सामाजिक दायित्व` या विषयावर माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचं तर `राज्यघटना आणि सामाजिक लोकशाही` या विषयावर प्रा. प्रल्हाद लुलेकर यांचं यावेळी व्याख्यान झालं.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर मोहोळ महामार्गावर स्कॉर्पिओ आणि मारुती सेलेरिओ या दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये मोहोळ इथल्या डॉक्टर दाम्पत्याचा आणि दोन मुलांचा समावेश आहे.

****

जालना इथं पाण्याच्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन कामगार महिला जागीच ठार झाल्या, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त तिघेही औद्योगिक वसाहतीमधल्या एका कंपनीतून सुटी झाल्यानंतर  घराकडे जात असताना ही दुर्घटना घडल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

****

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारताचा संघ काल जाहीर झाला. केएल राहुलच्या नेतृत्वातल्या या संघात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांचा समावेश आहे. येत्या ९ जूनपासून ही मालिका सुरू होणार असून, पहिला सामना दिल्लीत होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या कसोटी मालिकेतल्या पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघही काल जाहीर झाला. रोहित शर्मा या संघाचं नेतृत्व करेल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या मालिकेतला पाचवा सामना कोविड प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला होता. १ ते ५ जुलै दरम्यान बर्मिंगहॅम इथं हा सामना होणार आहे. या कसोटी मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.

****

No comments: