Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२४ मे २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात
गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न
· राज्यातील १४ महापालिका निवडणुकांसाठी ३१ मे रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्याचे
राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
· राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता नाही- आरोग्य मंत्री राजेश टोपे
· इतर मागासवर्ग आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाची राज्यात ठिकठिकाणी
निदर्शनं
· राज्यात कोविड संसर्गाचे २०८ नवे रुग्ण
· औरंगाबाद शहराला पाणी मिळेपर्यंत सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही- विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
· उस्मानाबाद जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २१ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या
३० योजनांना मंजुरी
आणि
· नांदेड जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यु
****
सविस्तर बातम्या
दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत विविध कंपन्यांना महाराष्ट्रात
गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगमंत्री सुभाष
देसाई यांनी काल टेट्रापॅक आणि ज्युबिलंट फूड्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दाओसमध्ये
भेट घेतली. टेट्रापॅक महाराष्ट्र गुंतवणूक करायला उत्सुक आहे तर ज्युबिलंट फूड्सनं
गुंतवणूक वाढवण्याची तयारी दाखवल्याची माहिती त्यांनी या बैठकीनंतर ट्विटरवर दिली.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लॅस्टिकच्या समस्येवर कठोर उपाययोजनेसाठी
आयोजित चर्चासत्रात जागतिक स्तरावर धोरणात्मक बदल आणि व्यावसायिक भागीदारी या विषयावर
मार्गदर्शन केलं. याशिवाय त्यांनी जागतिक आर्थिक मंचाचे तंत्रज्ञान प्रमुख ऑलिव्हर
श्वाब यांची भेट घेऊन पर्यावरण बदल आणि मानवावर होणारे त्याचे परिणाम कमी करण्यासाठीच्या
पर्यायांवर चर्चा केली. ठाकरे यांनी काल नेदरलँडच्या पर्यावरण मंत्री विवियान हेईजेन
यांचीही भेट घेऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर नेदरलँडच्या मुंबईतल्या दुतावासाच्या
मदतीनं काम करण्यावर कटीबद्धता व्यक्त केली.
****
मुंबई, पुणे तसंच ठाण्यासह १४ महापालिकांमध्ये निवडणुकांसाठी ३१ मे रोजी इतर
मागास वर्ग -ओबीसी आरक्षण वगळून प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक
आयोगानं दिले आहेत. मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे,
उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महापालिकांचा
यात समावेश करण्यात आला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे महिलांसाठी अनुसूचित
जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण गटातील महिला या तीन प्रवर्गासाठी
आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
****
राज्यात कोविडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते.
Byte…
आपण बघतो आहोत खूप मोठ्या
पद्धतीनं लोक गर्दी करतायत. कार्यक्रम मोठे होतायत. राजकीय मेळावे मोठे होतायत. आणि
या सगळ्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने लोक एकमेकांमध्ये गर्दी करून असतायत. परंतू जी
संख्या अपेक्षित वाढ वाटत होती तशी होत नाही. आणि त्यामुळे काळजी करण्याचा अजिबात विषय
वाटत नाही चौथ्या लाटेचा सुतराम शक्यता मला वाटत नाही.
राज्यात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या एक हजार ९५० असून, हा फार मोठा आकडा
नसल्याचं टोपे म्हणाले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुस्टर डोस देण्यात येत असून,
अँटीबॉडीज टेस्ट करुन लोकांनी बुस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.
शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक भागातल्या पक्ष संघटनेला वेळ देतोय, कार्यकर्त्यांशी
चर्चा करतोय, त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देत असल्याचं ते
म्हणाले.
****
राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची
बिलं महावितरण कंपनीनं लागू केली आहेत. ज्या ग्राहकांना एक रकमी भरणा शक्य नाही, अशा
ग्राहकांनी ही रक्कम सहा हप्त्यांत भरावी, अथवा तेही शक्य नसल्यास प्रीपेड मीटरची मागणी
करावी, असं महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी
सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक पत्रक जारी केलं. सुरक्षा ठेव रक्कम आता दोन
महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली असल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
****
इतर मागासवर्ग -ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी काल भारतीय जनता पक्षानं राज्यात
ठिकठिकाणी निदर्शनं केली. नाशिक मध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. गडचिरोलीत खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात
एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आलं तर सोलापूरमध्ये ओबीसी मोर्चाच्या वतीनं लाक्षणिक
उपोषण करण्यात आलं. नंदुरबार आणि धुळ्यातही एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या
यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा
मानहानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे. सामनामध्ये प्रसिद्ध केलेल्या शौचालय घोटाळ्याच्या
बातमीच्या संदर्भात हा दावा दाखल केला आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय राऊत यांनी हे
आरोप केल्याचं त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले २०८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८३ हजार १० झाली आहे. काल या संसर्गाने कोणाचाही
मृत्यू झाला नाही. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख
४७ हजार ८५६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १३३ रुग्ण कोविडमुक्त
झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३३ हजार १७६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ९७८
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहराला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना झोपू देणार
नाही, अशी असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिला. औरंगाबाद
शहराच्या पाणी प्रश्नावर भारतीय जनता पक्षानं काल 'जल आक्रोश' मोर्चा काढला, या मोर्चाला
संबोधित करताना ते बोलत होते.
Byte…
जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही. भारतीय जनता पार्टी झोपणार नाही आणि झोपू देणार नाही. एक एक नेत्याला जाब विचारल्या शिवाय आम्ही राहणार नाही. हा संघर्ष असाच पुढे चालू राहिल. आणि आताही या सरकारची कुंभकर्णी झोप उघडली नाही तर या सरकारला कोणीही वाचवू शकणार नाही.
यावेळी बोलतांना फडणवीस यांनी गेल्या २५ वर्षात शिवसेनेनं औरंगाबादच्या पाण्याचा
सत्यानाश केल्याचा आरोप केला. या काळात महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचं त्यांनी
सांगितलं. २०५५ पर्यंत शहराचा विस्तार लक्षात घेऊन एक हजार ६८० कोटी रुपये निधीची योजना
आपण मुख्यमंत्री असतांना मंजूर केली. मात्र, सरकार बदल्यानं आघाडी सरकारनं या निविदांमध्ये
भ्रष्टाचार केल्यामुळे आणि वेळेवर काम सुरु न केल्यानं पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण
झाल्याचं फडणीस म्हणाले….
Byte…
आज जर वेळेवर टेंडर दिलं असतं.योग्य दरात दिलं असतं. ते टेंडर मॅनेज केलं नसतं तर कदाचित ४० किलोमीटर पैकी २५ किलोमीटर लाईन कंम्लीट झाली असती.आणि पुढच्या दिड दोन वर्षामध्ये पाणी मिळालं असतं. पण यांच्या अडीच वर्षामध्ये अर्धा किलोमीटर लाईन देखिल हे तयार करु शकले नाहीत.आणि सरकारनं एक नवा पैसा दिला नाही. केंद्र सरकारचा जो पैसा आहे तोच पैसा बील भागवण्यासाठी हे देतात. स्वत:च्या खिशातला एक पैसा नाही.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्याचं
आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मोर्चात केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि
रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नांसाठी भाजपा आणि
शिवसेना हे दोन्ही पक्ष कारणीभूत असून, आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून
मोर्चा काढणं आणि पाणी पट्टी कमी करणं ही त्यांची नाटकं सुरु असल्याची टीका, औरंगाबादचे
खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या तीस वर्षात
यांनी औरंगाबादचं नामकरण, हिंदू - मुस्लिम दंगली हेच प्रश्न उपस्थित करुन सत्ता उपभोगली.
यादरम्यान जर पाण्यासारख्या गंभीर विषयाबाबत त्यांनी तत्काळ निर्णय घेवून कामं केली
असती तर आता ही वेळ पहावयास मिळाली नसती, असं खासदार जलील म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २१ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या
३० योजनांना काल जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत
मंजुरी देण्यात आली. याच बैठकीत जिल्ह्यातील “क” वर्गवारीतील ३९ सोलार पंपावर आधारित दोन कोटी ६३ लाख ३७ हजार रुपये खर्चाच्या
दुहेरी पंप योजनांनादेखील मंजुरी देण्यात आली.
****
महाबीज या राज्य सरकारच्या मालकीच्या बियाणे उत्पादक कंपनीनं सोयाबीन बियाणांच्या
किमंतीत केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील
कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी
कृषिमंत्री दादाजी भुसे यांना दिलं आहे. महाबीज कंपनीनं सोयाबिन बियाण्याच्या दरात
जवळपास ३० टक्के दरवाढ केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ तरुणांचा काल पाण्यात बुडून मृत्यु
झाला. कंधार शहराजवळ असलेल्या मन्याड नदीत
पोहायला गेलेला १६ वर्षीय सौरभ सतीश लोखंडे आणि १५ वर्षीय ओम राजू काजळेकर हे दोन मित्र
नदी पात्रातल्या गाळात फसून मरण पावले, अन्य घटनेत मुखेड तालुक्यातील -मुतग्याळ इथला २५ वर्षीय तरूण संतोष रामराव तेलंग, डोंगरगाव
इथे मन्याड नदीवर स्नान करायला गेला असता पाय घसरून खोल पाण्यात बुडून मरण पावला तर
तिसऱ्या घटनेत, विष्णुपूरी जलाशयात पोहायला गेलेला संतोष कदम हा तरूण पाण्यात बुडून
मरण पावला.
****
श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजेला तब्बल दोन वर्षांनंतर बुधवारपासून सुरूवात
होत आहे. मंदिराच्या पुजारी वर्गाच्या मागणीवरून मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतला आहे.
दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत ही पुजा सुरू राहणार असून अभिषेक पुजा असलेल्या ७५० भाविकांना
गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी भाविकांना संस्थानच्या संकेत स्थळावर ऑनलाईन
पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर कालपासून पर्यटकांसाठी
खुली करण्यात आली आहे. काही समाज कंटकांच्या
धमकीनं पुरातत्व विभागांनं गेल्या पाच दिवसांपासून ही कबर बंद केली होती. प्रशासनानं
काल पोलिस बंदोबस्त कायम ठेवत सर्वांना जाण्याची मुभा दिली आहे.
****
नांदेड इथले ज्येष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेल्या 'गांधी समजून घेताना'
या पुस्तकाला, पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंतराव चव्हाण सह्याद्री
साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते
राळेगणसिद्धी इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजाला गांधी विचारांची आज खरी
गरज असल्याचं मत अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील तलाठी युवराज पवार आणि कोतवाल प्रभाकर
रूपनर यांना पंचवीस हजार रूपयांची लाच घेताना काल लाचलुचपत विभागानं अटक केली. तक्रारदाराच्या
शेतीचा फेर फार मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी आरोपीनं दहा हजार रुपये लाच रक्कम स्विकारली
होती. त्यानंतर पुन्हा याच कामासाठी तलाठी पवार आणि कोतवाल रुपनर यांनी तीस हजार रूपयांची
लाच मागीतली होती.
.****
No comments:
Post a Comment