आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
जपानच्या टोकियो मध्ये क्वाड
नेत्यांची शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन,
जपानचे पंतप्रधान फ्युमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे
पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक होत आहे. परस्पर
सहयोगासोबतच इंडो पॅसिफिक भाग मुक्त, स्वतंत्र आणि समावेशक होण्याला क्वाड समितीमुळे
प्रोत्साहन मिळत असून, खूपच कमी अवधीमध्ये क्वाडनं जगात आपलं स्थान निर्माण केलं आहे,
असं पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या प्रारंभिक भाषणात म्हटलं. पंतप्रधान आज क्वाडच्या
नेत्यांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकाही करणार आहेत.
****
भारत आणि अमेरिकेदरम्यान
काल टोकियो इथं गुंतवणूक प्रोत्साहन करार करण्यात आला. भारताचे परराष्ट्र सचिव विनय
क्वात्रा आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास वित्त महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
स्कॉट नैथन यांनी या करारावर सह्या केल्या. या करारामुळे देशातल्या आर्थिक गुंतवणूक
वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
****
दावोस इथं सुरू असलेल्या
जागतिक आर्थिक परिषदेत विविध देशातल्या तेवीस कंपन्यांनी महाराष्ट्राबरोबर सुमारे तीस
हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे सुमारे सहासष्ट हजार जणांना
रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. काल झालेल्या
या विविध गुंतवणूक करारांमधली पंचावन्न टक्क्यांहून
जास्त गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान या देशांमधून येणार आहे.
****
कौशल्य विकासातल्या उल्लेखनीय
कामाबद्दल सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा जिल्हा कौशल्य विकास योजना पुरस्कार जाहीर
झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पुरस्कार विजेत्यांमधे
सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, ठाणे या जिल्ह्यांचाही समावेश आहे.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेत
काल झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानची १-१ अशी बरोबरी झाली. भारताचा दुसरा सामना
आज जपानबरोबर होणार आहे.
****
भारतीय रोलबॉल संघटना आणि
राज्य रोलबॉल संघटनेच्या वतीनं पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित
राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात राजस्थान तर मुलींच्या गटात उत्तर प्रदेश
संघानं जेतेपद पटकावलं.
****
No comments:
Post a Comment