Thursday, 28 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.07.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 July 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भातवापरलेल्या अपशब्दाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहात केली. भाजप सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस पक्षानं माफी मागावी, अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा या वक्तव्याला पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्याला वेगळं वळण दिलं जात असल्याचं सांगून, काँग्रेस पक्ष सदस्यांनी मात्र यावर आक्षेप घेत इतर विरोधी पक्ष सदस्यांसोबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं.

राज्यसभेत कामकाजादरम्यान गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, संदीप पाठक आणि अपक्ष खासदार अजित कुमार भुयां यांना या आठवड्यातल्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, संसदेबाहेरही भाजप नेत्यांनी हातात फलक झळकावर अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं भद्रा मारोती आणि वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदीरात श्रावण महिन्यात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत, दौलताबाद टी पाँईट पासून ते वेरुळ पर्यंत, आणि फुलंब्री पासून ते खुलताबाद पर्यंत, जड वाहतूक बंद असेल. सर्व प्रकारच्या जड वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत आज काढण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ७० गटांचा, तर पंचायत समितीच्या १४० गणांचा यात समावेश आहे. उद्या आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसंच आरक्षणाबाबात जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी उद्यापासून दोन ऑगस्ट पर्यंत आहे.

****


औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी गुरुकुलात संगीतशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच एकल संगीत सादरीकरण केलं. डॉ. अनिल ब्योहार, डॉ. आरती राव यांच्या मार्गदर्शनात हे विद्यार्थी अध्ययन करत असल्याचं, महागामी कडून सांगण्यात आलं आहे.

****

नांदेड-तिरुपती आणि औरंगाबाद-तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. नांदेड - तिरुपती ही गाडी येत्या ३० जुलैला नांदेडहून तर परतीच्या प्रवासात ३१ जुलैला तिरुपतीहून सुटेल. औरंगाबाद तिरुपती दरम्यान विशेष गाडी सात, १४ आणि २१ ऑगस्टला औरंगाबादहून, तर आठ, १५ आणि २२ ऑगस्टला तिरुपतीहून सुटणार आहे.

****

रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधल्या भिगवण-वाशिंबे रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नांदेड ते पनवेल ही गाडी येत्या चार ते आठ ऑगस्ट या काळात नांदेडपासून कुर्डूवाडीपर्यंतच  धावणार आहे. कुर्डूवाडी ते पनवेल हा टप्पा सध्या रद्द करण्यात आला आहे. तर, पनवेल ते नांदेड ही गाडी येत्या पाच ते नऊ ऑगस्ट या काळात पनवेलऐवजी कुर्डूवाडीपासून नांदेडसाठी सुटणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल.

****

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आजपासून बर्मिंगहॅम इथं सुरु होत आहेत. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेअकरा वाजता सुरू होईल. भारताच्या २१५ खेळाडूंचा संघ या स्पर्धेच्या १६ प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे.  पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत.

४४ व्या बुध्दीबळ ऑलिंपियाड स्पर्धेला देखील आजपासून चेन्नई इथं सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.

****

इटली इथं सुरू असलेल्या १७ वर्षाखालील ग्रीक-रोमन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात भारताच्या सुरज वशिष्टनं सुवर्णपदक पटकावलं आहे. ३२ वर्षानंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं आहे.

****

हवामान

मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ३१ जुलैपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments: