Wednesday, 27 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.07.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, भारतीय बनावटीचं  २८ हजार ७३२ कोटी रुपये किमतीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळाली आहे. नियंत्रण रेषेवर आणि प्रत्यक्ष युद्ध सदृश परिस्थितीत असलेल्या आपल्या सैन्याचं छुप्या शत्रूपासून संरक्षण करण्याच्या वाढत्या गरजेचा विचार करून, या परिषदेनं जवानांसाठी अत्याधुनिक बुलेट प्रूफ जाकीट खरेदी करण्याचेही प्रस्ताव मान्य केले आहेत.

****

राज्यातल्या नऊ लाख ६४ हजार नियोक्त्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेचे ४ हजार ७११ लाभार्थी अमरावती मधील आहेत, असं केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

****

खाद्य पदार्थांवर आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कर तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात आलं.

****

नांदेड तहसील कार्यालयातल्या महसूल सहायकास काल पाच हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. संदीपकुमार नांदेडकर असं त्याचं नाव असून, त्याने एका ७३ वर्षीय व्यक्तीला एका कामासंदर्भात लाच मागितली होती, त्यानंतर या विभागाच्या पथकाने सापळा रचून नांदेडकर याला रंगेहाथ अटक केली.

****

हिंगोली इथं काल एका युवकाकडून दोन पिस्तुल आणि १० जीवंत काडतुसं जप्त करण्यात आली. यशपालसिंग ऊर्फ करतारसिंग काजलसिंग जुनी नावाचा हा तरुण, बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या निमखेडी गावचा रहिवासी आहे.

****

आजादी का अमृत महोत्सवांतर्गत औरंगाबाद इथं 'उज्ज्वल भारत - उज्ज्वल भविष्य - पॉवर @२०४७' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर लाडगावच्या आदिती लॉन्स इथं, आणि सिल्लोड तालुक्यात भराडी इथं हा कार्यक्रम होणार आहे.

//********//

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...