Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा
मेळावा घेण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाला उच्च न्यायालयाची परवानगी.
· बहुप्रतिक्षित आष्टी ते अहमदनगर
रेल्वेमार्गाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण.
· बारामतीचा विकास पक्षपाती
पद्धतीनं सुरु असल्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची टीका.
आणि
· भाजप आणि शिवसेनेचा शिंदे
गट यापुढे सर्व निवडणुका एकत्रित लढवणार-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची
घोषणा.
****
मुंबई
उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास
परवानगी दिली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने, मुंबई महानगरपालिकेने
आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं निरीक्षणही नोंदवलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे
आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली
होती, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या निर्णयाचं राज्यभरात शिवसेनेकडून
जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी
ते अहमदनगर या ६५ किलोमीटर रेल्वेमार्गाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झालं. मराठवाड्यातला हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प
पूर्णत्वास जाऊ शकला, त्याबद्दल मध्य रेल्वेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी
आभार मानले.
या मार्गावरच्या पहिल्या
प्रवासी रेल्वेला केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ‘आष्टी ते अहमदनगर हा रेल्वेमार्ग’ पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या ‘प्रगती’ योजनेअंतर्गत असलेल्या अहमदनगर-बीड-परळी
या २६१ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज प्रकल्पाचा एक भाग आहे. यात केंद्र सरकार आणि राज्य
सरकारचा प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे. आजच्या या लोकार्पण सोहळ्याला बीडच्या
खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी
उपस्थित होते.
६५
किलोमीटर अंतराच्या या मार्गावर सहा स्थानकं आहेत. आठवड्यातून रविवार वगळता दररोज सहा
दिवस ही रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या या रेल्वेमार्गाच्या
लोकार्पण सोहळ्याला पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
बारामती
मतदार संघाचा विकास पक्षपाती पद्धतीनं सुरु असून भाजपाला समर्थन देणाऱ्या इथल्या नागरिकांना
याचा अनुभव येत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
बारामती
लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या सीतारामन यांनी आज पुरंदर तालुक्याला भेट
दिली. विकासाचा लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा हे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या संकल्पनेतल्या आकांक्षी जिल्हा योजनेचं उद्दिष्ट आहे, घराणेशाहीचं समर्थन
करणाऱ्या आणि भिन्न विचारधारेच्या नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा
राष्ट्रवादी बाणा यातून दिसून येत नाही, असं त्या म्हणाल्या. सीतारामन यांनी जेजुरी
इथल्या खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तसंच पुरंदरमधल्या पंचायत प्रतिनिधींशी स्थानिक
प्रश्नांवर संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मोरगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला
भेट देऊन आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९३ वावा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
आज
सांकेतिक भाषा दिवस आहे. सर्वांना जोडणारी सांकेतिक भाषा ही यावर्षीची सांकेतिक भाषा
दिवसाची संकल्पना आहे. मूकबधीर दिव्यांगांपर्यंत सर्व माहिती पोहचवणं आणि सर्वसामान्य
नागरिकांमध्ये सांकेतिक भाषेप्रती संवेदनशीलपणा निर्माण करणं हे या दिवसाच्या आयोजनाचं
उद्दीष्ट आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशातील ३ हजार २०० संघटना आणि संस्था
हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्रित आल्या असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट यापुढे सर्व निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचं भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी
बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान ४५ आणि विधानसभा निवडणुकीत
किमान २०० जागांवर विजय मिळवू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नुकत्याच
झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी २९४ सरपंच भारतीय जनता पार्टीचे तर मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४१ सरपंच निवडून आले आहेत. अशा प्रकारे
६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजपा - शिवसेना युतीचे आहेत. आपल्याकडे त्यांची नाव तसंच पक्षातील
पदांसहीत पूर्ण माहिती आहे. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष वेगळे दावे करत आहेत त्यांनी
सविस्तर यादी जाहीर करण्याचं आव्हान बावनकुळे यांनी दिलं.
मराठवाडा
वॉटरग्रीड आणि समुद्रात जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवणं, या
कामांवर शिंदे - फडणवीस सरकारने भर दिला आहे, याबद्दल त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं.
भाजपाच्या
राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाराजीबद्दल कपोलकल्पित बातम्या प्रसिद्ध केल्या
जात आहेत, मात्र त्या खंबीरपणे पक्षाचं काम करत असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.
****
‘आई-वडील,
ज्येष्ठ नागरिक आणि पालक देखभाल तसंच कल्याण कायदा २००७’ मधील तरतुदींबाबत ज्येष्ठ
नागरिकांमध्ये जागरूकता होण्याची आवश्यकता औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे
यांनी व्यक्त केली आहे. यशवंतराव चव्हाण केंद्राच्या औरंगाबाद जिल्हा केंद्राच्या वतीनं
आज औरंगाबाद इथं ज्येष्ठ नागरिक कायदा जनजागृती कार्यशाळेत मोरे बोलत होते. ज्येष्ठ
नागरिकांना त्यांची मुलं सांभाळत नसल्यास त्यांची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या
कडे असलेल्या प्राधिकरणाकडे करण्याची तरतूद आहे, तसंच या माध्यमातून त्यांना सांभाळण्याचा
मासिक भत्ता देखील मिळवण्याची तरतूद आहे, या सर्व प्रक्रियेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ
घ्यायला हवा, तसंच अन्य ज्येष्ठ नागरिकांना त्याबद्दलची माहिती द्यायला हवी असं मोरे
यांनी सांगितलं.
****
धुळे
शहरात शासकीय दूध डेअरी परिसरात गावठीकट्टा बाळगणाऱ्या एका इसमाला शहर पोलिसांनी आज
ताब्यात घेतलं. राजू वर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या कडून गावठी पिस्तुलासह
पाच जिवंत काडतुसं असा एकूण २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती
पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली.
****
परभणी
जिल्ह्यात दसरा सणानिमित्त ५ ऑक्टोबर या दिवशी मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द
कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत.
****
औरंगाबाद
शहरात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दरानं तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत
वीजजोडणी घेण्याचं आवाहन महावितरण कार्यालयानं केलं आहे. उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई
आणि वीज सुरक्षेतील त्रुटींमुळं होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
तसंच महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज देयकाप्रमाणेच वीजपुरवठा केला
जाईल असंही महावितरण कडून सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment