Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· औरंगाबाद शहराचा एका तासात एक लाख १८ हजार वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम संपूर्ण
देशासाठी प्रेरणादायी-केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचे गौरवोद्गार.
· वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी
माफी मागावी-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी.
· शारदीय नवरात्रोत्सवाला आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावानं प्रारंभ.
आणि
· यंदाच्या पावसाळ्यात देशात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस.
****
औरंगाबाद शहरानं एका तासात एक लाख १८ हजार वृक्ष लावण्याचा केलेला विश्व विक्रम
संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार
चौबे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवानिमित्त औरंगाबाद शहरात १५ ऑगस्ट २०२२ रोजी एका तासात एक लाख १८ हजार वृक्ष
लावण्याचा विक्रम झाल्यानिमित्त, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेतर्फे या उपक्रमात
सहभागी सर्वांना आज चौबे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. औरंगाबाद शहरानं
पूर्वी १५५ मर्सिडीज कार खरेदीचा विक्रम केला होता त्याच धर्तीवर आता १५५ हेक्टर जागेवर
वृक्ष लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
मराठवाड्यात तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित असतानाही फक्त आठ टक्के वनक्षेत्र
असल्याबद्दल आणि वनविभागाच्या संथ कामाबद्दल अश्विनीकुमार चौबे यांनी नाराजी व्यक्त
केली. चौबे यांनी वनविभागाच्या कामाचा आढावा घेत, वृक्षारोपणाचं वार्षिक प्रमाण संथ
असल्याबद्दल संबंधितांची कानउघडणी केली. झाडे तोडण्यासंदर्भात वनविभागासाठी एक नवीन
धोरण येणार असल्याचं चौबे यांनी सांगितलं.
****
मुंबईतील आधिश बंगल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण
राणेंनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच या बंगल्यातील
अवैध बांधकाम दोन महिन्यात तोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या काळात जर राणेंनी
बांधकाम नियमानुसार न केल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुढील कारवाईची मुभा असेल,
असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****
वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना नेते माजी
मंत्री आदित्य ठाकरे यांनी तळेगाव इथं वेदांता फॉक्सकॉन विषयावरून केलेले आंदोलन हा
खोटारडेपणा होता. वेदांता फॉक्सकॉन कंपनीबाबत औद्योगिक विकास महामंडळाने दिलेल्या पत्रानुसार
या कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झालेला नव्हता, आणि कंपनीला महामंडळाकडून
जागेचं वाटप झालेलं नव्हतं. अशा स्थितीत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला ही
महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रार खोटारडेपणाची आहे. प्रत्यक्षात आघाडी सरकारने
कंपनीशी करार केला नाही आणि जमीनही दिलेली नाही, हे आता पुराव्यानिशी स्पष्ट झाल्याचं,
बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी खोटारडी आंदोलने बंद
करावीत. अन्यथा जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
****
काँग्रेसचे माजी नेते गुलाम
नबी आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाचं नाव लोकशाही आझाद पक्ष असं ठेवलं आहे. आज त्यांनी
याबाबतची घोषणा केली. गेल्या २६ ऑगस्टला आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यानंतर
त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे.
****
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला
उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला जाणार आहेत. टोकियोच्या
निप्पोन बुदोकान परिसरात शिंजो आबे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या ८ जुलैला प्रचारादरम्यान आबे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती.
****
राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या
साधना जोगळेकर यांचं आज पहाटे नागपूर इथं निधन झालं. त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या
पार्थिव देहावर नागपूर इथं आज सायंकाळी अंत्यसंस्कार होत आहेत.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावानं
प्रारंभ झाला. यंदाच्या या उत्सवातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास, समृद्धीसाठी
व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील
नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने आरोग्य विभागामार्फत
राबवण्यात येणारं “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे विशेष अभियान यशस्वी करण्याचं
आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
देवीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी नांदेड जिल्ह्यातलं
माहूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातलं आद्यपीठ तुळजापूर इथं आज विधीवत घटस्थापना करण्यात
आली. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होऊन पहाटे देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात
आली.
नांदेड जिल्ह्यात माहूर इथं भाविकांच्या उपस्थितीत रेणुका
देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. विजयादशमीपर्यंत इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
अंबाजोगाई इथं आज सकाळी ९ वाजता
घटस्थापना आणि महापूजा होऊन योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. सकाळी सहा ते रात्री ११
वाजेपर्यंत भाविकांना देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे. महोत्सवाच्या कालावधीत
दररोज विविध कार्यक्रम होणार आहे.
उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाशिक जिल्ह्यातल्या
वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या अलंकारांची सकाळी मिरवणूक काढण्यात आली. विश्वस्त
मंडळाच्या वतीने महापूजा झाल्यावर, महाआरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. नूतनीकरणामुळे
सुमारे दोन महिन्यांपासून देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद होतं.
औरंगाबाद इथं कर्णपुरा देवीच्या नवरात्र उत्सवाला विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती आणि घटस्थापना
करून प्रारंभ झाला. या ठिकाणी भरणारी यात्रा पंचक्रोशीतल्या आबालवृद्धांचं आकर्षण आहे.
****
गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील
फूलशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिपावसानं फुलांचं उत्पादन कमी झालं तसंच
फुलं सडून गेली. जवळपास ५० ते ६० टक्के उत्पादन कमी झाल्याचं उटवद इथले फुल उत्पादक
शेतकरी विलास मुळे यांनी सांगितलं. २०० रुपये किलो दराने विकली जाणारी फुलं ऐन नवरात्रात
१०० रुपये किलो दराने विकली जात आहेत, बाजारात प्लास्टिकच्या फुलांना मोठ्या प्रमाणात
मागणी येत असल्यानंही फुलांच्या विक्रीवर परिणाम होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
यंदाच्या पावसाळ्यात देशात सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त
पावसाची नोंद झाली. देशातल्या १९ राज्यात सरासरी इतका तर १० राज्यात सरासरीपेक्षा जास्त
पाऊस झाला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २४ टक्के अतिरीक्त पाऊस झाल्याची माहिती हवामान
विभागानं दिली आहे.
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने व्यक्त केली आहे. औरंगाबाद शहर परिसरात
आज दुपारीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या
****
औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत
अरण्यम पद्धतीने कातपूर इथं वृक्ष लागवड अभियानाचं उदघाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून झालं. यावेळी बोलताना चव्हाण यांनी, जायकवाडी पक्षी
अभयारण्य परिसर आणि जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरात अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचे
संवर्धन, पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असल्याचं, मत व्यक्त केलं.
****
No comments:
Post a Comment