Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिने मुदतवाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात चार टक्के वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता.
· राज्यातल्या सर्व नाट्यगृहांच्या आधुनिकीकरणासाठी टाईप प्लान तयार करण्याची सूचना.
· अमेरिकेतल्या मेसाच्युसेट्स विद्यापीठात हिंगोली जिल्ह्यातल्या आकाश पोपळघट या
विद्यार्थ्याची निवड.
आणि
· भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरवात.
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र
सरकारने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी ही योजना राबवली
जाईल. यासाठी ४४ हजार ७६२ कोटी रुपये खर्च केला जाईल. देशभरातल्या सुमारे ८० कोटी जनतेसाठी
लाभदायक असलेली या योजनेवर एप्रिल २०२० पासून आतापर्यंत सुमारे तीन लाख ४५ हजार कोटी
रुपये खर्च झाल्याची माहिती अनुरागसिंह ठाकूर यांनी दिली.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अहमदाबाद आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या
पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. यासाठी सुमारे दहा हजार कोटी
रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षांत या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास
होणं अपेक्षित असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. देशभरातल्या १९९
रेल्वे स्थानकांची विकास कामं सुरू आहेत, यामुळे रोजगाराच्या ३५ हजार ७४४ संधी उपलब्ध
होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने
मान्यता दिली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होईल, यासाठी
सरकारी तिजोरीवर १२ हजार ८५२ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
****
महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा विश्वास
राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त
केला आहे. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचा
शुभारंभ आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन डॉ सावंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असताना महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे
दुर्लक्ष होतं. त्यांच्या आरोग्याच्या काळजीतून हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या
माध्यमातून राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची
माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
****
राज्यातील नाट्यगृहांचं आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण करताना सर्व नाट्यगृहांसाठी
टाईप प्लान-नमुना नकाशा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी दिल्या. राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली
आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लान तयार
करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. नाट्यगृहांसाठी आवश्यक निधी तसंच याबाबतचा
नियोजन आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या. राज्यातल्या
८३ नाट्यगृहांचं आधुनिकीकरण करताना नावीन्यपूर्ण नियोजन करुन काम करणं गरजेचं असल्याचं
मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी बीड जिल्ह्यात जलशक्ती अभियानांतर्गत
राबवण्यात येत असलेल्या कामांचा आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह
या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलसंवर्धन
आणि जलपुनर्भरणाची ३८५ कामं पूर्ण करण्यात आली असून, ३५६ कामं सुरू असल्याची माहिती
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. १४३ पारंपारिक जलसाठ्यांचं पुनरूज्जीवनाचे काम पूर्ण
झाले असून, ४३ जलसाठ्यांचं पुनरूज्जीवन सुरू असल्याचं शर्मा यांनी यावेळी सांगितलं.
शंभर गावांमध्ये जलपुनर्भरणाची कामे सुरू असून पुढील टप्प्यात ५०० गावांमध्ये जलपुनर्भरणाची
कामं सुरू होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्हा उद्योग केंद्र, राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाचा
सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एक जिल्हा
एक उत्पादन व्यवसाय वृद्धी कार्यशाळा, निर्यात प्रोत्साहन मेळावा घेण्यात आला. याबाबत
अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
उस्मानाबादचा राज्यात द्राक्ष निर्यातीत तिसरा क्रमांक आला असून
त्यात आणखी प्रयत्न झाल्यास नाशिकच्या खालोखाल उस्मानाबादची द्राक्ष निर्यात होऊ शकतात.
तसेच मराठवाड्यात सर्व जिल्ह्यासाठी केशर आंबाला भौगोलिक मानांकन मिळाले असल्यामुळे
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही केशर आंब्याच्या उत्पादनावर आणि दर्जावर लक्ष
केंद्रित केल्यास त्याची ही निर्यात वाढू शकते. उस्मानाबादच्या खव्याला ही भरपूर मागणी
आहे, त्यामुळे त्याच्या ही निर्यात इकडे जिल्ह्यातील खवा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी
लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद चे महाव्यवस्थापक
पी डी हणबर यांनी केले. तर कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद यांनी यावेळी उस्मानाबाद
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष, आंबा, कांदा निर्यात नोंदणी करून घेणे गरजेचे
असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगितले.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत
लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र या योजनेच्या
अंमलबजावणीमध्ये परतफेडीची अट शिथिल करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार
सतीश चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी आज मुंबईत सहकार मंत्री अतुल
सावे यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केलं. परतफेडीसाठी सरसकट तीन महिने मुदतवाढ देण्याची
मागणी चव्हाण यांनी केली आहे. सावे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चव्हाण
यांनी सांगितलं.
****
अमेरिकेतल्या मेसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठात एरोस्पेस
तसंच भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या आकाश पोपळघट या
विद्यार्थ्याची निवड झाली आहे. जगभरातून फक्त ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या या
विद्यापीठात यंदा निवड झालेला आकाश हा भारतातला एकमेव विद्यार्थी आहे. शेतकरी कुटुंबातल्या
आकाशच्या मदतीसाठी अनेक पतसंस्थांनी हात पुढे केला असून, परदेशातील शिक्षणासाठी मिळणाऱ्या
शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आकाश पात्र ठरला आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरवात होत
आहे. मालिकेतला पहिला सामना आज तिरुवनंतपूरम इथं संध्याकाळी ७ वाजेपासून सुरू होणार
आहे. दुसरा सामना २ ऑक्टोबरला गुवाहाटी इथं, तर तिसरा सामना ४ ऑक्टोबरला इंदूर इथं
होणार आहे.
****
गुजरात इथं सुरू असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र महिला
रग्बी संघानं आज झालेल्या सलामीच्या सामन्यात दिल्लीचा १९-१० ने पराभव केला. या सामन्यात
कोल्हापूरच्या कल्याणीने दोन ट्राय, पायलने एक ट्राय, कर्णधार भारुचा हिनं दोन कन्व्हेन्स
ट्राय मिळवत संघाला विजय मिळवून दिला.
****
No comments:
Post a Comment