Tuesday, 25 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 October 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन आणि फटाक्यांची आतषबाजी करत दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी 

·      स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचं देशवासियांना आवाहन

·      भूविकास बँकेची राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी फसवी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची टीका

·      भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड

·      मराठवाड्यात आज सर्व जिल्ह्यात खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार

·      प्रधानमंत्री पीक वीमा योजनेच्या दोन लाख तीन हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध

·      उद्यापासून जालना - छपरा - जालना नवीन साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाता निर्णय

आणि

·      ऑस्ट्रेलियातील टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशचा नेदरलंडवर विजय, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वे संघातला सामना पावसामुळे रद्द

 

सविस्तर बातम्या

दीपावलीतला महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा उत्सव काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. काल सायंकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आलं. त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. व्यापारी आस्थापनांनी सायंकाळी चोपड्यांचं पूजन केलं. लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीमुळे बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची बस तसंच रेल्वेस्थानकावरही मोठी गर्दी दिसून आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कारगिल इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. सीमेवर येऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणं ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असून, सर्व सैनिक सीमेवरील कवच असल्याचं ते म्हणाले. देशभक्ती ही देवाच्या भक्तिप्रमाणेच असते, असं नमूद करत पंतप्रधानांनी, सशस्त्र दलांचं कौतुक केलं. भारतासाठी युद्ध हा कधीही पहिला पर्याय नव्हता, युद्ध हा आपल्यासाठी सदैव शेवटचा पर्याय आहे, तसे आपल्यावर संस्कार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. आपल्या सेनेकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे, कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहात असेल तर आपले सैनिक जशास तसे उत्तर देण्यास समर्थ असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

****

देशवासियांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद इथल्या बाजारपेठेत फेरफटका मारून दिवाळीनिमित्त स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत करण्यासाठी व्होकल फॉर लोकल अंतर्गत सर्व देशवासियांना स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनी या अभियानात सामील व्हावं आणि देशाला स्वावलंबी करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन कराड यांनी यावेळी केलं.

****

राज्य शासनानं दिवाळीचं औचित्य साधून विविध लोकोपयोगी घोषणा केल्या आहेत. कोविड काळात समर्पण भावनेनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, बीएसटीचे कर्मचारी आणि शिक्षक यांच्या सन्मानार्थ विशेष दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

****

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ- सिडकोनं दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या नागरिकांकरता, सात हजार ८४९ सदनिकांची महा गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत उलवे नोडमधलं बामणडोंगरी, खारकोपर पूर्व २ ए, खारकोपर पूर्व २ बी आणि खारकोपर पूर्व पी ३ या परिसरात ही घरं उपलबंध करून दिली जाणार आहेत. यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू होईल. लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर इच्छुकांना आपल्या अर्जाची नोंदणी आणि शुल्क भरता येईल. या योजनेसाठी पुढच्या वर्षी १९ जानेवारी २०२३ रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. इच्छुक नागरिकांनी या सोडतीचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

गेल्या २५- ३० वर्षांपासून कार्यरत नसलेल्या भूविकास बँकेची राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर आणि सासवड भागात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. गेल्या १० वर्षांत कुणाला भूविकास बॅंकेचं कर्ज मिळालेलं नाही, त्यापूर्वी कधीतरी घेतलेल्या कर्जाची वसुली आता होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन सरकारने कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं, असं पवार म्हणाले. देशाची आणि राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे, अशी दोन्ही सरकारं ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीही करीत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. मात्र भूजल पातळी दोन वर्षांसाठी वाढणार आहे, ही बाब लक्षात घेऊन आजच नियोजन करण्याची गरज असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पिकांबाबत शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन, तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सिताराम गड खर्डा इथं आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यावेळी उपस्थित होते. बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याची, तसंच पीक विम्यासाठी ऑफलाईन पंचनामे करण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. सुनक यांना दीडशेपेक्षा जास्त खासदारांचं समर्थन मिळाल्यानं, त्यांची या पदावर निवड करण्यात आली. सुनक यांनी ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून यापूर्वी जबाबदारी सांभाळली आहे. लिझ ट्रस यांनी अवध्या ४५ दिवसांत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानं, हे पद रिक्त झालं होतं. सुनक हे येत्या शुक्रवारी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सुनक हे ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

****

राज्यात सर्व शहरांमधून आज सायंकाळी सुर्यास्तावेळी खंडग्रास सुर्यग्रहण अनुभवता येणार आहे. दिवाळी निमित्त पृथ्वीवर दीपोस्तवाची रोषणाई सोबतच आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार असल्याची माहिती, एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. या सूर्यग्रहणाला साधारण सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. ग्रहण मध्य संध्याकाळी पाच वाजून ४२ मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकणार आहे. पश्चिम आकाशात सुर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. नंतर ग्रहण सुटण्याआधीच संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त होतांनाचं सूंदर दृष्य दिसणार असल्याचं औंधकर यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना गट आणि शिक्षक परिषदच्या वतीनं, औरंगाबाद इथल्या तिरुपती शिक्षण संस्थेचं अध्यक्ष किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात अआली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाड्यातले सर्व जिल्हे आणि तालुक्यात नोंदणी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह आमदार पाटील काल उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या ढिगांसह हे आंदोलन केलं जात आहे. २०२० च्या पीक विम्याची पाचशे ३१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी, २०२१ च्या मंजूर पिक विम्याचे उर्वरित ५० टक्के प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ३८८ कोटी रुपये तत्काळ जमा करावे, अतिवृष्टी ग्रस्तांना २४८ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल चटणी भाकर खाऊन अनोखं आंदोलन केलं. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना मदत न दिल्यामुळे, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही, तहसील कार्यालयासमोर चटणी भाकरी खात लक्षवेधी आंदोलन केलं.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात काल भेंडोळी उत्सव पार पडला. या उत्सवानिमित्त मातेच्या मंदिरातून पेटवलेल्या भेंडोळीचं दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप २०२० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने दोन लाख तीन हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध केली असून, प्रति हेक्‍टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचं देखील कबूल केलं आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयानं २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे या कार्यवाहीस विलंब झाला. काल २०१ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला असून, लवकरच तो शेतकर्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

****

मराठवाडा विभागाचा उत्तर भारतातल्या महत्त्वाच्या शहरांशी संपर्क वाढवण्यासाठी, रेल्वे मंत्रालयानं जालना - छपरा - जालना अशी साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातल्या जनतेला उत्तर भारतातल्या महत्त्वाच्या प्रयागराज, वाराणसी, गाझीपूर आणि छपरा या शहरांना थेट जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्या २६ ऑक्टोबर रोजी जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रात्री साडे नऊ वाजता या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतील. दर बुधवारी ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरुन रात्री साडे अकरा वाजता सुटेल, ती शुक्रवारी पहाडे साडे पाच वाजता छपरा इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी छपरा रेल्वे स्थानकावरुन दर शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटेल, असं दक्षिण मध्य रेल्वे ‍विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बांग्लादेशानं नेदरलंडचा नऊ धावांनी पराभव केला. नेदरलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बांग्लादेशचा संघ २० षटकांत १४४ धावा करू शकला. प्रत्युत्तरादाखल १४५ धावांचा पाठलाग करणारा नेदरलंडचा संघ निर्धारीत २० षटकांमध्ये ९ बाद १३५ धावाच करू शकला. नेदरलंडचा परवा गुरुवारी भारतासोबत सामना होणार आहे.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वे संघातला कालचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. हा सामना प्रथम नऊ षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला, त्यानुसार झिम्बॉब्वे संघाने नऊ षटकांत चार बाद ८० धावा केल्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका संघाला सात षटकांत ६४ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने तीन षटकांत एकही गडी न गमावता, ५१ धावा केल्या होत्या. अखेर पाऊस न थांबल्यामुळे सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एकेक गूण देण्यात आला.

****

यंदाची दिवाळी एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलत होते. अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाचा श्रोत्यांनी आनंद घेतला. याच कार्यक्रमात ग्रीन लातूर टीमच्या वतीनं उपस्थितांना फुलांची रोपटी वितरित करण्यात आली तसंच आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं नागनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगास काल अलंकार पूजा करण्यात आली. काल पहाटे ५ वाजता महादेवाला अभ्यंग स्नान घालण्यात आलं. दुपारी चार वाजता सोने-चांदी रत्नजडित अलंकाराने शिवलिंग सजवण्यात आलं. दिवाळीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर इथल्या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वंचित घटकातील गरजू, अनाथ लोकांसोबत दीपावली साजरी करण्यात आली. सुमारे अडीचशे कुटुंबांना यावेळी दिवाळी फराळ, अभ्यंगस्नान किट तसंच साड्यांचं वाटप करण्यात आलं. गेल्या सात वर्षांपासून आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी शहरातल्या नागरिकांकडून वर्तमानपत्रांच्या रद्दीचं संकलन करून ती रद्दी विकली जाते, त्यातून जमा झालेल्या निधीमधून या पद्धतीनं दिवाळी साजरी केली जाते.

****

हिंगोली जिल्ह्यात एका ५३ वर्षीय शेतमजूर महिलेचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यात बोथी इथं काल ही घटना घडली. निर्मलाबाई डुकरे असं या महिलेचं नाव असून, काल सकाळी त्या सोयाबीन काढण्याच्या कामासाठी बोथी शिवारात रोजंदारीने कामावर गेल्या होत्या. अकरा वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या एका रानडुकराने या महिलेवर हल्ला  केला. या हल्ल्यात छातीला तसंच डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन पोलिसांनी बियाणे पळवणाऱ्या टोळीला जेरबंद केलं. अजित सीड्सच्या फारोळा इथल्या प्लांट मधून अफरातफर करुन सहा लाख रुपयांचे बियाणे चोरल्याचं निदर्शनास आल्यानंतर बिडकीन पोलिसांनी २४ तासाच्या आता या टोळीला पकडलं.

****

अमरावतीनजीक मालखेड- टिमटाला दरम्यान कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून मुंबई आणि नागपूरकडे जाणाऱ्या काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांची वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं उघडीप दिली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे धरणाच्या विसर्गात घट करण्यात आली असून, धरणाचे दहा दरवाजे आता दोन फुटावरुन दीड फूट उंचीवर स्थिर करण्यात आले आहेत. धरणातून आता २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

 

 

 

No comments: