Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 27 October 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· समाजातल्या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासाकरता राज्यशासन प्रयत्नशील- मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे
· अतिवृष्टीबाधित शेतीच्या पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द
· महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमांना येत्या १ नोव्हेंबरपासून
सुरवात होणार
· काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची
कार्यकारी समिती बरखास्त करत सुकाणू समितीची केली स्थापना
· येत्या शनिवारपासून जालन्याहून तिरुपतीला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सुरु
करण्याची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची घोषणा
· पालघर जिल्ह्यात तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा
मृत्यू
· पुण्यातल्या शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
आणि
· ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी टि्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा
नेदरलंडसोबत सामना
सविस्तर बातम्या
समाजातल्या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासाकरता राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातून
जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले...
Byte ….
शेतकरी कष्टकरी कामगार वृचित शोषित अश्या सगळ्यांचा
सर्वांगणि विकासाचा आमचा ध्यास आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकजुटीनं प्रयत्न करतोय.
हे आपलं सरकारआहे. सर्वसामान्याचं सरकारआहे. सगळयांसाठी असणारं सरकार आहे. असं आटलं
पाहिजे . आणि सांगताना यला अत्यंत आनंद होतोय. आमची वाटचालदेखील गेल्या तीन चार महिनयांमध्ये
अशीच सुरू आहे. आपलीधे आपण कधीच डगमगले नाही त्यामुळेच काही चांगल्या योजना राबवण्यासाठी
प्रयत्न सुरू केला आणि त्या यशस्वी देखील होतायत यांच समाधान देखील आहे. अंमलबजावणीत अडचणी असतील पण आमचा
हेतू सुसपष्ट आणि निसंदेह आणि चांगला असाच आहे. लोकांच्या भल्यासाठी आहे.
आपल्या सरकारनं घेतलेल्या कल्याणकारी निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली. एमएमआरडीएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला
सरकारनं मंजुरी दिली. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा नवा इकोनोमीकल कॉरिडॉर विकसित करणं,
मुबंईत मेट्रोचं जाळं विकसित करणं, २० हजार पोलिस तसंच विविध विभागात ७५ हजार पद भरती,
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत पाच पटीनं वाढ
आदी निर्णयांचा त्यांनी आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषात न बसणारी
मदतही सरकारनं केली असून, पोलिसांच्या घराच्या
किमती ५० लाख रुपयांवरून १५ लाख रुपयांपर्यंत खाली आणल्या आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची
अट राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्पुरती रद्द केली आहे. विखे
पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तांत्रिक अडचणीमुळे
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असल्याचं निदर्शनास आणून देत, शेतकऱ्यांनी,
ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी
ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी स्थानिक पातळीवर
तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. या प्रक्रियेत
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमांना येत्या १ नोव्हेंबरपासून
सुरवात होणार आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस
इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तसंच न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधल्या
टेक्नॉलॉजी डोमेनमधल्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. येत्या १ नोंव्हेबरला मुंबईत आयोजित
कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते, या अभ्यासक्रमांचा प्रारंभ केला
जाईल असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची
कार्यकारी समिती बरखास्त करून सुकाणू समिती स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष स्वतः
खरगे हे आहेत तर समितीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, ए.के.
अॅन्टोनी, पी. चिंदबरम, दिग्विजय सिंह, यांच्यासह ४७ सदस्य आहेत.
दरम्यान, खरगे यांनी काल काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. काँग्रेसच्या
माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह
अन्य नेते यावेळी उपस्थित होते. भारतात भूक, प्रदूषण वाढत आहे, रुपया घसरत आहे, मात्र
सरकार झोपलं असल्याचं टीका खरगे यांनी यावेळी केली.
****
केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागानं २०२२-२३ साठीचे आयकर विवरण पत्र भरण्याची
मुदत वाढवली असून आता ७ नोव्हेंबर पर्यंत आयकर
विवरण पत्र भरता येणार आहेत. ज्या वर्गासाठी ३१ ऑक्टोबर ही आयकर विवरणपत्र सादर करण्याची
अंतिम तारीख होती, त्यांच्यासाठी ही ७ दिवसांची मुदतवाढ असेल.
****
गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय न्यायालयानं फेटाळलेल्या जामीन अर्जाच्या विरोधात
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात
येत्या ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाच्या
प्रकरणात उच्च न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. याच धर्तीवर देशमुख यांनी
सीबीआयनं त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतही जामीन मिळवण्यासाठी
विशेष सीबीआय न्यायालयाकडे अर्ज केला होता, हा अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च
न्यायालयात या विरोधात अपील दाखल केलं आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा इथं नियंत्रणरेषा ओलांडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न
करणाऱ्या दहशतवाद्याला भारतीय सैन्यानं ठार केलं आहे. दहशतवाद्यांची एक टोळी मंगळवारी
सीमा सशस्त्र दलाची नजर चुकवून नियंत्रण रेषा ओलंडण्याचा प्रयत्न करत होती. या टोळीतल्या
दोन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात यश मिळालं, त्यापैकी एकजण सुरक्षा दलाने केलेल्या
गोळीबारात ठार झाला तर दुसरा दहशतवादी फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम
सुरू झाली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके ४७ रायफल जप्त करण्यात आली आहे.
****
जालना ते छपरा या साप्ताहिक रेल्वे गाडीला कालपासून प्रारंभ झाला. जालना रेल्वे
स्थानकावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी या विशेष गाडीला हिरवा झेंडा
दाखवून रवाना केलं. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राज्यमंत्री दानवे यांनी येत्या शनिवारपासून जालन्याहून तिरुपतीला
जाण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सुरु होणार असल्याचं जाहीर केलं. जालना ते छपरा रेल्वेला
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर तिच्या फेऱ्या वाढवण्यात येतील, असं सांगितलं.
दर बुधवारी ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरुन रात्री साडे अकरा वाजता सुटेल, ती शुक्रवारी
पहाटे साडे पाच वाजता खंडवा, प्रयागराज आणि वाराणसी मार्गे छपरा इथं पोहोचेल. परतीच्या
प्रवासात ही गाडी छपरा रेल्वे स्थानकावरुन दर शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटेल,
असं दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला.
विक्रम संवत २०७९ कालपासून सुरु झालं. व्यापारी वर्गाच्या नव्या वर्षाचा हा पहिला दिवस
साडेतीन मुहूर्तपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. उत्तर भारतीय समाजात या दिवशी गोवर्धन
पूजा करण्याचा प्रघात आहे. भगवान विष्णूंना विविध नैवेद्य अर्पण करण्याचा अन्नकूट सोहळाही
काल पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला.
दिवाळीच्या पाडव्याला पत्नीनं पतीला तसंच मुलींनी वडिलांना औक्षण करण्याचा प्रघात
आहे. बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीज हा सणही काल सर्वत्र साजरा झाला. सायंकाळच्या सुमारास
घरोघरी हा औक्षणाचा सुखद सोहळा साजरा झाल्याचं दिसून आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथून काल श्री संत गोरोबा काकांची पालखी कार्तिकी
एकादशीसाठी टाळ मृदंग आणि ज्ञानोबा -तुकोबाच्या
हरी नामाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तुळजापुर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह
पाटील, मंदिर प्रशासक सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस. पी पाईकराव आणि निरीक्षक
एस. सी. बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ४ नोव्हेंबर रोजीच्या कार्तिकी एकादशीच्या
मुख्य सोहळ्यानंतर पंढरपूरमधला पाच दिवसांचा मुक्काम संपवून ही पालखी ८ नोव्हेंबरला तेरच्या
दिशेनं परत निघणार आहे .
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर मध्ये श्री तुळजाभवानी मातेला काल विविध
ऐतिहासिक अलंकार घालण्यात आले तर मंदिर समिती आणि संस्कार भारतीच्या वतीनं काल दीपावली
पाडव्याच्या निमित्तानं तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. काल श्री तुळजाभवानी
मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते.
****
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड
या कंपनीत काल भीषण स्फोट झाला. यात कंपनीतल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर १०
कामगार जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची दखल घेतली असून जखमींना सर्वोतोपरी
मदत देण्याबाबत निर्देश दिले आहेत.
****
पुण्यातल्या शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं काल हृदयविकाराच्या
झटक्यानं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. निम्हण हे १९९९ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या
तिकिटावर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतरही दोन वेळा ते आमदार
म्हणून निवडून आले. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर
ते तिसऱ्या वेळेस काँग्रेसच्या तिकीटावर शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून येत आमदार झाले
होते. मात्र २०१४मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला होता. निम्हण यांच्या
पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
नाशिक इथले हुतात्मा सैनिक संतोष गायकवाड यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक
तालुक्यात लहवित या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गायकवाड यांचं
सिक्कीम इथं कर्तव्यावर असताना परवा दिवाळीच्या दिवशी निधन झालं. ते दहा महिन्यांनी
सेवानिवृत्त होणार होते.
****
क्रिकेट :
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी टि्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा
नेदरलंडसोबत सामना होणार आहे. दुपारी १२ वाजेपासून या सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणीवरुन
ऐकता येईल.
दरम्यान काल पहिल्या गटात इंग्लंड आणि आर्यलंड यांच्यात झालेल्या सामन्यात,
डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडनं इंग्लंडवर ५ धावांनी विजय मिळवला. आर्यलंडनं १९ षटकं
आणि दोन चेंडूत सर्वबाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरवातच अडखळत
झाली. पावसानं व्यत्यय आणल्यामुळे खेळ थांबावावा लागला तेव्हा इंग्लंडच्या १४ षटकं
आणि ३ चेंडूत ५ बाद १०५ धावा झाल्या होत्या. पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी डकवर्थ लुईस
नियमानुसार आयर्लंड संघाला विजयी घोषित केलं.
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड संघात कालचा नियोजित सामना पावसामुळे रद्द करण्यात
आला.
****
फ्रेंच ओपन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज
आणि चिराग शेट्टी या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला केला आहे. त्यांनी फ्रान्सच्या
ख्रिस्तो पापोव्ह आणि तोमा पापोव्ह या जोडीचा १९-२१, २१-९, २१-१३ असा पराभव केला.
महिला एकेरीत सायना नेहवाल हिचं, महिला दुहेरीत त्रिसा आणि गायत्री जोडीचं तर
मिश्र दुहेरीत ईशान भटनागर आणि तनिषा क्रास्तो जोडीचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
****
राज्यातील सत्तांतराच्या वेळी आपण पैसे घेतल्याच्या केलेल्या आरोपांबाबत येत्या
१ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा माजी
मंत्री आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. ते काल अमरावतीत वार्ताहरांशी बोलत होते. अमरावतीचे
आमदार रवी राणा यांनी आमदार कडू यांच्याविरोधात सत्तातांराच्या काळात पैसे घेतल्याचा
आरोप केला होता. या दोन्ही आमदारांमधील वाद विकोपाला पोहोचला आहे. याप्रकरणी कडू यांनी
पोलिस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
****
बारव जीर्णोद्धार अभियानांतर्गत काल राज्यभरात अनेक बारवांवर दीपोत्सव साजरा
करण्यात आला. परभणी जिल्ह्याच्या सेलु तालुक्यात हातनूर इथल्या बारवेच्या जीर्णोद्धारापासून
गेल्या वर्षी या अभियानाला सुरवात झाली होती. काल हातनूरच्या या बारवेवरही ग्रामस्थांनी
शेकडो दीप प्रज्वलित केले. दरम्यान, औरंगाबाद नजिक शेंदूरवादा इथं येत्या सात नोव्हेंबरला
दीपोत्सव होणार आहे.
****
वाशिम जिल्ह्यात उंबर्डा इथं काल गोवर्धन पूजेनिमित्त गोधनाची वाजतगाजत मिरवणूक
काढण्याची परंपरा आजही कायम आहे. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली
होती.
****
सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेच्या वतीनं काल नंदुरबार जिल्ह्यात दुधाळे इथं
बळीराजा पूजन करण्यात आलं. यावेळी पारंपारीक आदिवासी नृत्यासह बळीराजाची मिरवणूक काढण्यात
आली. तर कार्यक्रम स्थळी पाच शेतकऱ्यांचं विविवत पुजन देखील करण्यात आलं.
दरम्यान, नंदुरबार इथं दरवर्षी बलिप्रतिपदेला गवळी समाजामार्फत म्हशी आणि रेडे
मालक आपल्या पशुंना सजवून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढतात. कालही ही सगर मिरवणूक
काढण्यात आली.
****
No comments:
Post a Comment