Saturday, 29 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यभरात वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून दिलं जाणार  आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल धुळे इथं प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मराठीतून शिक्षण घेणं ऐच्छिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केल. अभियांत्रिकी, औषध निर्माण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं भाषांतर करण्याच्या सूचना, नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या तीन विद्यापीठांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या प्राचीन मूर्तींच्या चोरी प्रकरणाचा तपास लागून काही मूर्ती सापडल्यामुळे जांब गावात समर्थ गावात समर्थ भक्तांनी काल घरोघरी दिवे लावून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. या चोरी प्रकरणी जालना पोलिसांनी दोन जणांना बार्शी इथून ताब्यात घेतलं आहे. चोरलेल्या अकरा मूर्तींपैकी पाच मूर्ती या दोघांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४ वा भाग असेल.

दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते उद्या गुजरातमध्ये वडोदरा इथं सी २९५ एमव्ही विमान बांधणी कंपनीची पायाभरणी होणार आहे. ही कंपनी वायूदलासाठी विमान तयार करेल.

****

एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहागंज इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळ्याजवळ हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून केरळ ला जाण्याकरता नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान नोव्हेंबर ते जानेवारी  दरम्यान विशेष गाडीच्या ३६ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. चार नोव्हेंबर पासून दर शुक्रवारी ही गाडी नांदेड इथून दुपारी सुटेल आणि एर्नाकुलमला शनिवारी रात्री पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर शनिवारी रात्री निघून नांदेड इथं सोमवारी सकाळी पोहोचेल.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.

****

No comments: