आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
पुण्यातल्या
कसबा पेठ आणि चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु
आहे. कसबा पेठ मधून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर, तर चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप
आघाडीवर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
त्रिपुरा,
मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी देखील आज मतमोजणी होत आहे. त्रिपुरामध्ये
भाजप - आयपीएफटी युती २९ जागांवर आघाडीवर आहे, मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टी १९
जागांवर, तर नागालँडमध्ये भाजप - एनडीपीपी युती ३९ जागांवर आघाडीवर आहे.
***
राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची लेखी परीक्षा आजपासून सुरु झाली. राज्यसभरातल्या
५ हजार ३३ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.
***
लार्सन अँड टुब्रो लिमिटेडसोबत तीन हजार १०८ कोटी
रुपये खर्चून तीन कॅडेट प्रशिक्षण नौका खरेदी करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली
आहे. काल संरक्षण मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे ही माहिती
दिली. या स्वदेशी बनावटीच्या आधुनिक नौका २०२६ च्या
नोव्हेंबर पासून सरकारी ताफ्यात दाखल होतील.
***
भारताच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र मंत्र्यांच्या जी -
20 परिषदेला काल नवी दिल्लीत सुरु झाली. औपचारिक बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री
डॉ. एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रांमध्ये
आज सुरुवात होत आहे.
***
आर्थिक गैरव्यवहार करून देशातून पळून गेलेल्या
गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून त्यांच्याकडून चोरलेल्या मालमत्तेची वसुली
करण्यासाठी जी-२० समुदायाच्या भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या बैठकीत विचार विनिमय
केला जाईल, असं केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग
यांनी म्हटलं आहे. ही बैठक काल गुरुग्राम इथं सुरु झाली.
***
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून भारतीय हवाई दलासाठी सहा हजार ८२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 70 HTT-40
प्रशिक्षण विमानांच्या खरेदीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सहा वर्षांच्या
कालावधीत या विमानाचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती संरक्षण
मंत्रालयानं दिली आहे. हे विमान नव्यानं
समाविष्ट केलेल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय हवाई दलाच्या मुलभूत प्रशिक्षण विमानांची
कमतरता पूर्ण करेल, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं.
//************//
No comments:
Post a Comment