Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२३ सायंकाळी
६.१०
****
· विरोधी
पक्ष नेते, विरोधकांना देशद्रोही म्हटलं नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
· भारतीय
जनता पक्षाकडून विधानसभा, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध हक्कभंगाचा
प्रस्ताव.
· चिंचवड
विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांच्याकडे मोठी आघाडी.
आणि
· इंदूर
कसोटी क्रिकेट सामन्यात भारताविरुद्ध विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर ७६ धावांचं आव्हान.
****
विधानपरिषदेत
आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हकक्कभंगाची सूचना दाखल केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे
यांनी आज विधान परिषदेत, विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नसल्याचं
सांगितलं. ते म्हणाले –
नवाब मलिक हा देशद्रोही आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल
आहेत. दाऊद बरोबर ज्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. त्याला मी देशद्रोही म्हटलेलं
आहे. पुन्हा मी देशद्रोही म्हणेल. पण यामध्ये अजितदादांना देशद्रोही म्हटलेलं नाही.
त्या देशद्रोह्याला पाठिशी आपण घालतात. त्याचा राजीनामा मागत नाही म्हणून बरं झालं
आपण आम्हाला महाराष्ट्रदोही म्हणालात तर आपल्या बरोबर आमचं चहा पिणं टळलं बरं झालं
याच्यामध्ये माझं काय चूक आहे.
मुख्यमंत्र्यांनी
सभागृहाला किंवा विरोधकांना देशद्रोही म्हटलेलं नसल्याचं स्पष्ट केल्यानं हा हक्कभंग
प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवायचा की नाही याबद्दल निर्णय देण्यात येईल असं उपसभापती
नीलम गोर्हे यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधी
पक्षनेत्यांकडून सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणणं हा सरकारचा अपमान असल्याचं सांगत,
भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत, विधानसभेचे विरोधी
पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात
हक्कभंग प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेत्यांकडून अशा प्रकारचं वक्तव्य अशोभनीय असल्याचं
दरेकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडताना सांगितलं.
****
राज्यसभा
खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारतीय
जनता पक्षाचे राम शिंदे यांनी राऊत यांच्या विरोधात आज विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
मांडला. यासंदर्भात चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं असून हा हक्कभंग प्रस्ताव
हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येईल तसंच यासंदर्भात सात दिवसात राऊत यांच्याकडून लिखित
खुलासा मागवण्यात येईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. संसदेच्या
खासदारावर हक्कभंग दाखल झाल्यास अध्यक्ष किंवा सभापतींकडे पाठवण्याची प्रथा असल्याचं
त्यांनी यावेळी सदनात सांगितलं.
****
चिंचवड
विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
त्यांनी पस्तीसाव्या फेरीनंतर आघाडी कायम ठेवली आहे. जगताप यांना १ लाख ३१ हजार ४६४
मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे यांना
९६ हजार १७५ मते तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४३ हजार १७० मते मिळाली आहेत.
जगताप यांचं एकूण मताधिक्य ३९ हजार २८९ मतांचं आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या
पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे
नेते अजित पवार या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले –
माझी
परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. दोन्ही पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या.
आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेच्या
मनामध्ये एकदा एखादा निश्चय त्यांनी केला की या कुठल्याही गोष्टीला अर्थ राहत नाही.
जनतेच्या मनामध्ये आत्ता ज्या प्रकार हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, ते जनतेला आवडलेलं
नाही. निश्चितपणे याला आत्ताचे सत्ताधारी पक्ष विचार करतील अन् त्यांना विचार केल्याशिवाय
गत्यंतर नाही.
धंगेकर
यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट आणि नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा
विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
****
न्यायालयाच्या
निकालानुसार येत्या तीन महिन्यांत राज्यात उपजिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदं पदोन्नतीनं
भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भारतीय जनात पक्षाचे गोपीचंद पडळकर
यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
राष्ट्रीय
स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, असं सांस्कृतिक
कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या
तासात, यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला
उत्तर देतांना बोलत होते. या अनुदानासाठी २ वर्षांच्या आतल्याच चित्रपटाने अर्ज करावा
तसंच यापुढे प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटीपेक्षा जास्त अनुदान देण्याचा निर्णय
घेण्यात येईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली
जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथक
नेमून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यात मद्यनिर्मिती,
विक्री, वाहतूक अनुषंगानं लक्षवेधी उपस्थित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनानंतर
या विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं देसाई म्हणाले.
****
विधानपरिषदेत
काँग्रेसच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची तर काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी
आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी
प्रवीण दरेकर, मुख्य प्रतोदपदी भाई गिरकर आणि प्रतोदपदी प्रसाद लाड यांची निवड करण्यात
आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे यांची निवड
करण्यात आल्याचं उपसभापती नीलम गोर्हे यांनी आज सभागृहात जाहीर केलं.
****
राज्याच्या
सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या
घटनापीठात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. या संदर्भातली पुढील सुनावणी आता १४
मार्च रोजी होणार आहे.
****
सर्वोच्च
न्यायालयानं, निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रिया बदलण्याचे निर्देश देण्याचा निकाल,
हा लोकशाहीला जिवंत ठेवणारा असल्याचं सांगत या निकालाचं स्वागत करत असल्याचं उद्धव
ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. शिवसेना पक्षाबद्दलचे
निर्णय देतांना, आयोगानं दबावाखाली निर्णय दिला असून निवडणूक आयुक्तांकडून अन्याय झाला
असल्याचं ते यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्नही त्यांनी
यावेळी उपस्थित केला.
****
ठाकरे
गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्यानं स्थापन
हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं, असं मत राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी केलेलं विधान विशिष्ट
गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती मात्र, राऊत यांच्या विधानाचा विग्रह न करता
ऐकल्यास, विधानाचा अर्थ स्पष्ट होतो असंही त्यांनी या संदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावरुन
नमूद केलं आहे. हक्कभंगाची मागणी करणाऱ्या सदस्यांचाच हक्कभंग समितीत समावेश असणं हे,
तक्रारदारालाच न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासारखं असून यामुळे न्यायाची अपेक्षा
कशी करता येईल असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
****
भारतानं
इंदूर इथं सुरू तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ७६ धावांचं
माफक आव्हान ठेवलं आहे. चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर चषक मालिकेमध्ये आज
दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारानं यामध्ये
सर्वाधिक ५९ धावा केल्या. नेथन लायन यानं ६४ धावांमध्ये आठ गडी बाद केले. तत्पूर्वी,
सकाळच्या सत्रात कालच्या चार बाद १५६ धावांवरुन पुढं खेळताना ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला
डाव १९७ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजानं चार तर रविचंद्र अश्विन आणि उमेश यादवनं
प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रारंभीच्या दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवून भारतानं
या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे.
****
परभणी
जिल्ह्यात सेलू - ढेंगळी पिंपळगाव - मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळाचं काम करण्यासाठी
परवा शनिवारी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार
आहेत.
****
No comments:
Post a Comment