Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 03 March 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३
मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
अंगणवाडी
सेविकांच्या मानधनात सुमारे २० टक्के वाढ करणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री
मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कुणाल पाटील यांनी
विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. आशिष शेलार यांनीही, याबाबत सरकारनं ठोस उत्तर
देण्याची मागणी केली. मे महिन्यापूर्वी सेविकांची रिक्त पदं पूर्णपणे भरली जाणार आहेत.
सर्व अंगणवाड्यांसाठी दीडशे कोटी रुपये निधीतून नवीन मोबाईल खरेदी केली जाणार आहे. अंगणवाड्यांच्या
भाड्याच्या मुद्यावरही सरकार योग्य निर्णय घेणार असून, लाईट बिलासंदर्भातही थेट विभागाला देयक अदा
करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं, मंत्र्यांनी सांगितलं. कंटेनर अंगणवाडीचं आज
प्रायोगिक स्तरावर उद्घाटन होत असून, तीन महिन्यात दोनशे कंटेनर अंगणवाड्या सुरू केल्या
जाणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
मिनी
अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन करून, त्यांचं पूर्ण अंगणवाडीत रुपांतर करण्याचा निर्णयही
सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
धनंजय
मुंडे, बाळासाहेब थोरात, आदिती तटकरे यांनीही
यासंदर्भात प्रश्न विचारले. अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये तसंच
मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देण्यासंदर्भात, आणि मोबाईल ॲपमधली माहिती मराठीतून
भरण्याची व्यवस्था करावी, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.
या ॲपमध्ये नावाशिवाय इतर सर्व माहिती मराठीतून भरण्यासाठी व्यवस्था आहे, नावही मराठीत
भरण्याची व्यवस्था केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.
मात्र
या प्रश्नांवर मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग
केला. आशिष शेलार यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर कडाडून टीका करत, गेल्या सरकारच्या
कार्यकाळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय निर्णय घेण्यात आले, असा प्रश्न विचारला.
सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शेलार यांनी सरकारचं अभिनंदन
केलं.
***
सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक ताळेबंद
कसा बसावयाचा याचा अभ्यास सुरू असून, अधिवेशन संपल्यानंतर मान्यताप्राप्त कर्मचारी
संघटनांनी याबाबत सुचवलेल्या पर्यायांबाबत बैठक घेणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
***
आरोग्य विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ९८३ रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करणार असल्याचं, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितलं. संग्राम थोपटे यांनी आरोग्य खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान
ते बोलत होते. आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करणार असल्याचंही
सावंत यांनी सांगितलं.
राज्यात पतसंस्थांमधल्या कर्ज वितरण
प्रकरणी येत असलेल्या अडचणी आणि ठेवी सुरक्षित करण्यासाठी विम्याची व्यवस्था, आदींसाठी येत्या पंधरा दिवसात एक विशेष तज्ज्ञ समिती
नेमण्याची, तसंच अधिवेशन काळात यावर
निर्णय घेऊ, अशी घोषणा, सहकार मंत्री अतुल
सावे यांनी आज विधानसभेत केली. प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात
लक्षवेधी उपस्थित केली होती.
***
कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण
आणि विविध शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता, माजी
पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीने काल नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीस भेट दिली. सर्व बाजूंचा अभ्यास
करून राज्य शासनास येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचं पवार
यांनी सांगितलं.
***
औरंगाबाद
महानगरपालिकेचं अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असं नामकरण करण्यात आलं
आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त तथा प्रशासक
डॉ. अभिजित चौधरी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
***
बॉर्डर
- गावसकर मालिकेतल्या इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी
क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात
विजयासाठी असलेलं ७६ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं आज सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एका गड्याच्या मोबदल्यात साध्य केलं. या
डावात आठ गडी बाद करणारा लायन प्लेयर ऑफ
द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर
आहे. मालिकेतला शेवटचा सामना येत्या नऊ तारखेपासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे.
***
हिंगोली
जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे
शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये नऊ लाख
६५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळला असून, याप्रकरणी एका
रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment