Tuesday, 25 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.07.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ जूलै  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कर्ज परतफेडीच्या प्रकरणांमध्ये बँकांनी ग्राहकांना संवेदनशीलतेनं वागणूक द्यावी-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सूचना

·      अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळल्यास बडतर्फीची कारवाई- राज्याच्या गृहमंत्र्यांचा इशारा

·      पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीच्या सानुग्रह अनुदानात दुपटीने वाढ

·      ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदनदास देवी यांचं निधन

·      बार्शी इथं लिंगनिदान करून घरातच गर्भपात केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

·      मराठवाड्यात काल रस्ते अपघाताच्या चार घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू

आणि

·      वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित;भारताचा मालिकाविजय


सविस्तर बातम्या 

कर्ज परतफेडीच्या प्रकरणांमध्ये बँकांनी ग्राहकांना, संवेदनशीलतेनं आणि मानवी भावनांचा विचार करुन वागणूक द्यावी, अशा सूचना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या आहेत. त्या काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. काही खाजगी बँका तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या काही बँका कर्ज परतफेडीच्या प्रकरणात कडक कारवाई करत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं, त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी लोकसभेतून बँकांना या सूचना केल्या.

****

केंद्र सरकारनं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या जमा भविष्य निर्वाह निधी व्याजदरात पाच शतांश टक्क्यानं वाढ केली आहे. सन २०२१-२२ साली हा दर आठ पूर्णांक १० शतांश टक्के होता, तो आता आठ पूर्णांक १५ शतांश टक्के करण्यात आला आहे.

****

विरोधी पक्षांना मणिपूर प्रकरणी संसदेत चर्चा करायची नसल्याचा आरोप, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. ते काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. मणिपूर प्रकरणी सरकार चर्चा करण्यास तयार असून विरोधी पक्षांनी या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन जोशी यांनी केलं.

दरम्यान, विरोधी पक्षांनी काल संसद भवन परिसरात धरणे आंदोलन करत मणीपूर प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी केली. दरम्यान, आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना राज्यसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी सभापती जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केलं आहे.

****

अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. काल विधान परिषदेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत तारांकित प्रश्न विचारला, त्याला फडणवीस उत्तर देत होते. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी, रमी तसंच ड्रीम इलेव्हन यांसारख्या ऑनलाइन जुगारांवर बंदी घालण्याची, आणि याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रेटींवर कारवाईची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय देताना हे जुगार नसून ते खेळ आणि कौशल्य असल्याचं म्हटल्यामुळे, यावर कारवाई शक्य नाही, मात्र जागृती करणं गरजेचं असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.

****

निधीच्या बाबतीत अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला जात असून, सत्ताधारी आमदारांना झुकतं माप दिलं जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत सर्व आमदारांना निधीचं समान वाटप करावं अशी मागणी केली होती.

****

पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान दुपटीनं वाढवण्यात आलं आहे. आता पूरग्रस्तांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भातल्या पूरस्थितीसंदर्भात काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन केलं. ते म्हणाले,

 

Byte…

ज्या घरात पुरांचं पाणी शिरलं त्या सध्याच्या दरात पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई सुरु करावी आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाच हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आत्ताच सरकारने घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी तो आत्ता इथं सांगितला.

 

राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदतीची तरतूद नसली तरी, अधिकृत दुकानं आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मागील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे आज संपर्क साधून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहितीही पवार यांनी दिली.

****


पीक विमा योजनेत विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचं, कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. मराठवाड्यात पावसाअभावी २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्यानं, शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अन्वये मांडली, त्यावर मुंडे बोलत होते. २४ जुलै पर्यंत राज्यात एक कोटी चार लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

****

राज्यातल्या महानगरपालिकांची आर्थिक परिस्थिती तसंच विविध सेवाभावी संस्था, व्यावसायिक आणि इतरांच्या मागणीच्या अनुषंगानं, विविध प्रयोजनार्थ भाडेपट्टा आकारणी संदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी, काल विधानसभेत दिली. सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यात प्रत्येक तालुक्यामध्ये कामगार सेतू नोंदणी केंद्र, उभारण्यात येणार आहे. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात सदस्य कैलास घाडगे- पाटील, यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना खाडे यांनी ही माहिती दिली. कामगारांची अधिकृतपणे नोंदणी करण्यामध्ये अधिक सुलभता आणि पारदर्शकता यावी, कामगारांना हक्काच्या सर्व सोई-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत व्हावी, या हेतुनं हा निर्णय घेत असल्याचं, खाडे यांनी सांगितलं.

****

धार्मिक सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यास सरकारची मनाई नसल्याचं, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्र्यंबकेश्वर इथल्या शिवमंदिरात प्रवेश करण्यावरून धार्मिक तेढ निर्माण झाल्याप्रकरणी, शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता,त्याला फडणवीस उत्तर देत होते.

****

दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलले जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. कोणी काहीही म्हणत असलं, तरी असा कोणताही बदल होणार नाही. झालाच तर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

छत्तीसगड मधल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अडमा जोगा मडावी आणि टुगे कारू वड्डे अशी त्यांची नावं आहेत. केंद्र तसंच राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी अडमा मडावी यास साडेचार लाख रुपये तर, टुगे वड्डे यास चार लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

****

राज्य लोकसेवा आयोग - एम पी एस सी च्या पूर्व प्रशिक्षणासाठी, महाज्योती मार्फत घेण्यात येणारी परिक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. यापूर्वी १६ जुलै रोजी राज्यातल्या विविध जिल्ह्यात ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती, परंतू काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. चौकशी समितीला या प्रकरणात तथ्य आढळल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी परीक्षेत गैरप्रकार करताना विद्यार्थी आढळून आल्यास, अशा विद्यार्थ्यांवर जागेवर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला दिल्या आहेत. एमपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा होणाऱ्या प्रवेश परीक्षेची तारीख महाज्योतीच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. शंभराहून अधिक मराठी नाटकं, मराठी चित्रपट, तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. ३० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांत देखील त्यांनी काम केलं होतं. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात सावरकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री, मदनदास देवी यांचं काल बंगळुरू इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. मदनदास देवी यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवलं. जवळपास ७० वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी इथं लिंगनिदान करून घरातच गर्भपात केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल अनंत चौरे यांच्या सदनिकेत हा प्रकार होत असल्याचं उघडकीस आलं. मागील सहा महिन्यात या ठिकाणी ३२ गर्भपात केल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. यातील आठ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

****

मराठवाड्यात काल रस्ते अपघाताच्या चार घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण दगावले. जालना औरंगाबाद रस्त्यावर एका दुचाकीला चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जखमी झाला. करमाड जवळ झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याचं वृत्त आहे.

लातूर जिल्ह्यातही दुचाकी आणि चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वारासह चारचाकीतल्या एका बालकाचा मृत्यू झाला. देवणी तालुक्यात विळेगाव शिवारात हा अपघात झाला.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरच्या बोल्डा रोडवरील पुलावर भरधाव आयशरनं दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. कळमनुरी तालुक्यातल्या कडपदेव इथले हरिश्चंद्र जाधव हे पत्नीसह, दोन मुलांसह दुचाकीवरुन नांदेडकडे जात असताना हा अपघात झाला. जखमींवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान त्रिनिदाद इथला दुसरा कसोटी क्रिकेट सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे भारतानं दोन सामन्यांची मालिका एक - शून्य अशी जिंकली आहे. काल सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावातला खेळ दोन बाद ७६ धावांपासून पुढे सुरु करायचा होता, मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

****

मणिपूर प्रकरणात दोषींवर कारवाई करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी काल हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात माजी आमदार संतोष टारफे, यांच्यासह आदिवासी समाजातील नेतेमंडळी सहभागी झाली होते.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या कचरा वेचक घंटा गाड्या येत्या एक ऑगस्टपासून फक्त ओला - सुका असं वर्गीकरण केलेला कचराच घेणार आहेत. महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहर स्वच्छ करण्यासाठी, “हम होंगे कामयाब, हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जी श्रीकांत यांनी काल स्वत: ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. प्रबोधन केल्यानंतरही जे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देण्यास नकार देतील, त्यांचा एकत्रित असलेला कचरा परत करण्याचे निर्देश जी श्रीकांत यांनी दिले आहेत.

****

हिंगोली  इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांची बदली झाली, तरीही त्यांना कार्यमुक्त केलं नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं काल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलं. या महाविद्यालयातल्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांविरोधात महिला प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करावं, अन्यथा आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा मनविसेच्या आंदोलकांनी दिला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून तीन फेऱ्यांमध्ये मिशन इंद्रधनुष ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांनी शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकाचं लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केलं आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी काल जिल्हा समन्वय समितीची एक बैठकही घेण्यात आली. सर्व विभागानी ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद इथल्या डॉ. रश्मी बोरीकर लिखित हैद्राबाद मुक्तीसंग्राम : मराठवाड्यातील क्रांतिकारक महिला, या पुस्तकाचं प्रकाशन काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांच्या हस्ते झालं. मुक्तीसंग्रामाच्या क्रांतिलढ्यात मराठवाड्यातल्या महिलांनीही बाईपणा आणि धाडसाच्या बळावर पुरुषांच्या बरोबरीनं सहभाग घेतला, मात्र दुर्देवाने महिलांच्या कामगिरीचा इतिहास पाहिजे तसा लिहिला गेला नाही. मात्र डॉ. रश्मी बोरीकर यांनी या महिलांच्या क्रांतिकारी कामगिरीला जगापुढे आणलं, असं गायकवाड यावेळी म्हणाल्या.

****

शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी काल आषाढी वारी करून शेगाव इथं परतली. पालखी सोहळा रविवारी खामगाव शहरात पोहोचला होता. काल जिल्हाभरातले भक्त मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खामगाव ते शेगाव या १८ किलोमीटर मार्गावर प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं चहापान तसंच फराळाची मोफत सेवा देण्यात आली.

****

No comments: