Wednesday, 26 July 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकारविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल;मणीपूर मुद्यावरून संसदेचं कामकाज आजही बाधित.

·      पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.

·      कारगिल विजय दिनानिमित्त आज देशभरातून हुतात्मा सैनिकांना अभिवादन.

आणि

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्याला मंजूरी.

****

मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन लोकसभेत केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी हा एका ओळीचा प्रस्ताव सादर केला असून, तो स्वीकारल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. या प्रस्तावावर चर्चेचा दिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने ठरवला जाईल, असं बिर्ला यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्षांनी सरकारच्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात अविश्वास प्रस्ताव आणला आहे, याबद्दल जनता विरोधकांना धडा शिकवेल, असं जोशी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यासंदर्भात बोलताना, सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं.

****

मणिपूर मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच या मुद्यावर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरु केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करुनही गदारोळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं, दुपारनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरू होता, या गदारोळातच वन संरक्षण सुधारणा विधेयक संमत झालं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं

राज्यसभेत आज कामकाज सुरु झाल्यावर, मणिपूर मुद्यासंदर्भात काही प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं. सरकार यासंदर्भात चर्चेसाठी तयार असल्याचं ते म्हणाले. मात्र विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केला. त्यावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं. दुपारी दोन वाजेनंतर विरोधी पक्षाच्या गदारोळातच कामकाज पुन्हा सुरू झालं, याच गदारोळात अनुसूचित जमाती घटना दुरुस्ती विधेयक सदनानं मंजूर केलं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

****

देशात मागील महिन्यापर्यंत १३० कोटी २० लाखांपेक्षा जास्त लोकांकडं सक्रिय आधारकार्ड असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. देशभरात ६३ हजारांपेक्षा जास्त आधारकेंद्र असल्याचं ते यावेळी म्हणाले. याबाबत पोस्ट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडे ५ वर्षांपेक्षा कमी वयांच्या मुलांची माहिती २८ हजार मोबाईल आणि टॅब्लेट मध्ये उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले.

****

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचवणं आणि त्यांचे पुनर्वसन करणं हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, चौकटीबाहेर जाऊन काम करावं लागलं, तरी त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा, अशी सूचना पवार यांनी दिली. अतिवृष्टी, पूरस्थिती तसंच अवर्षण परिस्थितीचा त्यांनी आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

 

राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. काँग्रेसचे नाना पटोले यांनी कंत्राटी  पोलीस भरती बाबत मुद्दा उपस्थित केला होता त्याला फडणवीस उत्तर देत होते.

****

निरोगी आयुष्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांनी केलं आहे. त्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दि आर्ट ऑफ लिव्हिंग कडून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. आर्ट ऑफ लिव्हिंग हे समाजात सर्वात चांगल्या पद्धतीनं योग शिकवणारं विद्यालय आहे याचा फायदा समाजातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संखेनं उपस्थित होते.

****

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच दर्डा यांच्या जेएलडी यवतमाळ या कंपनीला न्यायालयाने ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला असल्याचं, वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

****

कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिवसा निमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.    

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कारगील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांचा पराक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटसंदेशात म्हटलं आहे.  

द्रास इथल्या कारगिल युद्धस्मारकात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांच्या उपस्थितीत वीर सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सरकार कटीबद्ध असून त्यासाठी कोणतंही पाऊल उचलण्याची सरकारची तयारी असल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं.

दिल्लीत राष्ट्रीय युद्धस्मारकावर संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून वीर सैनिकांना अभिवादन करण्यात आलं.

औरंगाबाद इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कारगिल दिनानिमित हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आगामी पंचवार्षिक बृहत आराखड्याला आज अधिसभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या चार जिल्हयात मिळून सुमारे ६६० नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित असून ८० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी १९४, जालना १५२, बीड १७४ तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १४० अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आहे. विद्यापीठाचा मुख्य परिसर तसंच उस्मानाबाद उपपरिसर या ठिकाणी मिळून जवळपास ४० अभ्यासक्रम यामध्ये प्रस्तावित आहेत. गेल्या चार वर्षात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी प्रशासकीय शिस्त आणली, याबद्दल अधिसभा सदस्यांनी एकमताने अभिनंदनाचा ठराव संमत केला.

****

पंढरपूरहून तुळजापूरकडे निघालेल्या भाविकांच्या मिनीबसचा आज सकाळी पंढरपूर शहरात अपघात झाला. या अपघातात दहा ते पंधरा भाविक जखमी झाले असून त्यांना पंढरपूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

राज्यातील सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ साठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश आहे. खरीप हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी ३१ जुलै पर्यंत शेतकरी बांधवानी यात सहभागी होण्याचं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

****

रासायनिक खत खरेदी करताना खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करत असल्यास नजिकच्या कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केल आहे. शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतलीत वापर करावा, तसंच कमी खर्चात खतांचं नियोजन होईल याची काळजी घ्यावी, असंही बऱ्हाटे यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच खताचा आग्रह न धरता पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा असं आवाहन बऱ्हाटे यांनी केलं आहे.

****

No comments: