Tuesday, 1 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.08.2023, रोजीचे सकाळी : 07.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर

·      राज्य सरकारच्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रम प्रस्तावाला, केंद्र सरकारची मंजुरी

·      पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन दिवसांची मुदतवाढ

·      समृद्धी महामार्गावर निर्माणाधीन पुलावरून क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू

·      जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत पोलिसाच्या गोळीबारात चार जण ठार

·      आदर्श नागरी सहकारी पंतसंस्थेतल्या ठेवी परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा-पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे निर्देश

आणि

·      जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये काल आणखी तीन सुवर्णपदकांची कमाई

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीनं १९८३ मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी उल्लेखनीय आणि असाधारण योगदान असणाऱ्या व्यक्तिंना, दरवर्षी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीला हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग, यांच्यासह एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन यासारख्या दिग्गजांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदी आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन आणि पूजा करून करणार आहेत. पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून होईल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यातून उर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधलेल्या सहा हजार चारशेहून अधिक घरांचं, तर पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या एक हजार २८० हून अधिक घरांचं तसंच पुणे महापालिकेनं बांधलेल्या दोन हजार ६५० हून अधिक घरांचं, हस्तांतरण पंतप्रधानांच्या हस्ते या दौऱ्यात केलं जाणार आहे.

****

राज्य सरकारने जागतिक बँकेकडे मित्रामार्फत सादर केलेल्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रस्तावाला, केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सुमारे दोन हजार ११२ कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. यासाठी एक हजार ४७८ कोटी रुपये अर्थसहाय्य जागतिक बँक देणार असून, उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मंजुरीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये क्षमता ओळखून त्यानुसार गुंतवणूक, त्यासाठी अंमलबजावणी आणि देखरेख प्रणाली विकसित करणं आणि त्यातून जिल्ह्यांमध्ये शाश्वत विकासाच्या संधी निर्माण करणं, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.

****

राज्य शासनाच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. एक रुपयात पीक विमा अर्ज भरून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, ती आता तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, यादृष्टीनं ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून या योजनेत सहभाग घेतला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असं आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

****

मणीपूर हिंसाचाराच्या मुद्यावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन देण्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही वारंवार बाधित झालं. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळातच सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत अल्प चर्चेनंतर मंजूर झालं. चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून मिळणारं प्रमाणपत्र, कायमस्वरुपी वैध ठरवण्याची तरतूद, या विधेयकात आहे. सध्या हे प्रमाणपत्र १० वर्षंसाठी वैध असतं. चित्रपटांच्या अनधिकृत चित्रण आणि प्रदर्शनाला या विधेयकामुळे प्रतिबंध केला जाईल. अनधिकृत चित्रण किंवा ध्वनीमुद्रण हा गुन्हा ठरवला असून, त्यासाठी तीन महिने ते तीन वर्षापर्यंत तुरुंगवास, तसंच तीन लाख रुपये किंवा एकूण उत्पादन खर्चाच्या पाच टक्के रक्कम, इतका दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात केली आहे. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे.

****

दरम्यान, कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली. सदनाचे नेते पियुष गोयल, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, द्रविड मुन्नेत्र कळघमचे तिरुची शिवा, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय, सीपीआयचे बिनॉय विश्वम, राष्ट्रीय जनता दलाचे प्राध्यापक मनोज झा यांची बैठकीला उपस्थिती होती.

****

देशभरातील २९ कोटी असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केली आहे. केंद्रिय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी काल लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. सन २०२१ मध्ये असंघटीत कामगारांची ही माहिती संकलीत केली असून ती आधारशी संलग्न आहे. पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना आणि ई-श्रम नोंदणीकृत सदस्यांची संख्या एक लाख ७७ हजार ७७७ असल्याची माहिती तेली यांनी दिली.

****

मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. मनोहर भिडे सातत्यानं राष्ट्रपुरुषांसंबंधी आक्षेपार्ह विधानं करत आहेत, ही वक्तव्यं समाजात धार्मिक तेढ आणि दुही निर्माण करणारी आहेत, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं चाकणकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी सर्वोच्च न्यान्यालयानं पुढे ढकलली आहे. आजारपणाच्या कारणावरून मलिक यांनी मागितलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं १३ जुलैला फेटाळला होता, त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिक हे मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, असं मलिक यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे

****

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात सरलांबे इथं मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ठाण्याचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ही माहिती दिली. अद्याप काही कामगार क्रेनखाली अडकले असण्याची शक्यता असून, बचावकार्य सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पश्चिम रेल्वेच्या जयपूर - मुंबई या जलदगती रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसाने केलेल्या गोळीबारात, रेल्वे पोलिस दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही रेल्वे पालघर स्थानकाजवळून जात असताना काल पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर पोलिस पळून जायच्या प्रयत्नात असताना दहिसर स्थानकातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.

दरम्यान, या गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त प्रवीण सिन्हा यांनी सांगितलं आहे.

****

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून विविध अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये या समिती सदस्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. सुकाणू समिती सदस्यांची पहिली बैठक काल मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

****

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आय टी आय मध्ये, बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. कौशल्य विकास आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन कार्यरत आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन लोढा यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पंतसंस्थेतल्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, असे निर्देश, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. होत असलेल्या वसुलीची तसंच ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेची ठेवीदारांनाही वेळोवेळी माहिती द्यावी, अनियमिततेबाबत सहकार आयुक्तांच्या स्तरावरुन समिती नेमून चौकशी व्हावी, अशी सूचनाही भुमरे यांनी केली.

****

चीनमधे चेंगडू इथं सुरु असलेल्या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये नेमबाजीत दहा मीटर एअर रायफल पुरूषांच्या सांघिक प्रकारात, एश्वर्य तोमर, दिव्यांशसिंह पवार आणि अर्जून बबूता यांच्या चमूने सुवर्ण पदक पटकावलं. ऐश्वर्यनं काल पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक देखील जिंकलं आहे. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात विजयवीर सिधू, उदयवीर सिधू आणि आदर्श सिंग यांनी रौप्यपदक जिंकलं.

तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अमन सैनी आणि प्रगती यांच्या मिश्र गट संघानेही काल सुवर्ण पदक पटकावलं. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत नऊ सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह एकूण १७ पदकांची कमाई केली असून, पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज त्रिनिदाद इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.

****

चित्रकूट भारत गौरव यात्रा काल हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं पोहोचली. त्या निमित्तानं नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरात संत मुरारी बापू यांचं रामकथा वाचन झालं. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, देशभरात महाराष्ट्राचं मोठं महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं. केदारनाथ इथून या यात्रेला सुरुवात झाली असून, बारा ज्योतिर्लंग ठिकाणी भक्तांच्या वतीने राम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेमध्ये मुरारी बापू यांच्या सोबत एक हजार आठशे भाविक असून, १८० देशातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. 

****

भंडारदारा आणि मुळा धरणातून गोदावरी लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचं आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी काल जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून भंडादारा, निळवंडे आणि मुळा धरणातल्या पाण्याची सद्य:स्थिती जाणून घेतली. पावसाचं प्रमाण अजूनही अत्यल्प असल्यानं अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. बहुतांश भागातल्या पाण्याची मागणी वाढत असल्याचं विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत, पाण्याचं आवर्तन सोडण्याचं नियोजन तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

जालना जिल्ह्यात, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकास कामं करण्याबरोबरच, निधी वेळेत खर्च होईल याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी दिले आहेत. जालना जिल्हा वार्षिक योजनेच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. २०२३-२४ या चालू वर्षातला निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभाग प्रमुखांनी प्रस्तावास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कामांची प्रक्रिया सुरु करावी, प्रलंबित कामांचा आणि खर्चाचा नियमितपणे आढावा घ्यावा असंही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं.

****

पावसाळ्यात पसरणाऱ्या डोळ्यांच्या आजाराबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन, लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केलं आहे. या आजारात डोळ्यांना खाज सुटते, सूज येऊन डोळे लालसर होतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळे आलेल्या व्यक्तीने विलगीकरणात राहावं, तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावा, असं वडगावे यांनी सांगितलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात देवगाव रंगारी इथं गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल सापळा रचून अटक केली. सुरेश शिंदे असं या पोलिसाचं नाव आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेनं अवैध नळ जोडण्या खंडीत करण्याची मोहीम सुरू केली आहे. कालही मुख्य जलवाहिनीवरच्या २४ जोडण्या खंडीत करण्यात आल्या. ही कारवाई या पुढेही सुरू राहणार असल्याचं, महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

****

आज एक ऑगस्ट या महसूल दिनापासून सर्वत्र महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहांतर्गत दोन ऑगस्ट रोजी युवा संवाद, तीन ऑगस्टला एक हात मदतीचा, चार ऑगस्ट रोजी जनसंवाद, पाच ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, तर सहा ऑगस्ट रोजी महसुली अधिकारी कर्मचारी संवाद हा कार्यक्रम होणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हा सप्ताह राबवला जातो.

****

मणिपूर हिंसाचाराचा निषेध तसंच संभाजी भिडे यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी काल आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी मूक मोर्चा तसंच निदर्शनं करण्यात आली. महिलांची या निदर्शनात लक्षणीय उपस्थिती होती.

****

No comments: