आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ ऑगस्ट २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी
दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर रवाना झाले. जोहान्सबर्गमध्ये आजपासून सुरू
होणाऱ्या १५ व्या ब्रिक्स परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेच्या
माध्यमातून भविष्यातल्या सहकार्याची क्षेत्र ओळखण्याची आणि संस्थात्मक विकासाचा आढावा
घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचं पंतप्रधानांनी, या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं
आहे
दक्षिण आफ्रिकेनंतर २५ ऑगस्टला पंतप्रधान
ग्रीसला रवाना होतील. ग्रीसमधल्या प्रमुख उद्योजक आणि तिथल्या भारतीय समुदायाशी ते
संवाद साधणार आहेत.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन
गडकरी यांच्या हस्ते आज भारत नवीन कार चाचणी उपक्रमाचं लोकार्पण होत आहे. यामुळे देशातल्या
ग्राहकांना लवकरच वाहन खरेदी करताना सुरक्षेचे स्टार मानांकन तपासून खरेदी करता येईल.
या माध्यमातून ग्राहकांना अपघातातून सुरक्षा देण्याची वाहनाची क्षमता लक्षात येणार
आहे. हे मानांकन पाहून खरेदीदार त्यांचा वाहन खरेदीचा निर्णय घेऊ शकतील.
****
जी-20
च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची चौथी आणि अंतिम बैठक कालपासून जयपूरमध्ये सुरु
झाली. या बैठकी दरम्यान वाढ आणि समृद्धीसाठी व्यापार, गतिशील
व्यापार आणि जागतिक मूल्य साखळी, जागतिक व्यापारातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं एकत्रीकरण, व्यापारासाठी लॉजिस्टिक आणि जागतिक व्यापार संघटनेतल्या
सुधारणा यावर चर्चा केली जाईल.
****
उस्मानामाद जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे
झालेल्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाच्यावतीने काल करण्यात
आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे पावसातील खंडामुळे उत्पादनात
५० टक्क्याहून अधिक घट दिसून येत असल्यास, २५
टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, त्यानुसार
ही भरपाई दिली जावी असं निवेदन पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.
****
जर्मनीत सुरू असलेल्या चार राष्ट्रांच्या
कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या
सामन्यात भारतानं इंग्लंडचा चार - शून्य असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment