Thursday, 24 August 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 24.08.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

चांद्रयान-तीन मोहिमेतला पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. विक्रम या लँडरमधून प्रज्ञान रोव्हर नुकताच बाहेर पडला आहे आणि त्यानं चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास सुरू केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोनं सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा आज तिसरा आणि अंतिम दिवस आहे. ते आज इराण, मोझांबिक आणि इथोपियाच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 

****

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या.

****

वर्ष २०२८ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्व विभागातल्या जिल्ह्यांचा सर्वसमावेशक विकास करावा लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक झाली, त्यावेळी पवार बोलत होते. 

****

पत्रकारांवरचे हल्ले निंदनीय असून हल्ले करणाऱ्यांवर योग्य कारवाई झाली पाहिजे तसंच माध्यमांनी प्रासंगिकता आणि निष्पक्षता टिकवून ठेवणं आव्हानात्मक असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते काल मुंबईत, मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

****

कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं जालना जिल्ह्यात अंबड पोलीस स्थानकात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला तीस हजार रुपयांची लाच घेताना काल अटक केली. योगेश हरी चव्हाण असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.

****

बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठी भारताचा आर प्रज्ञानानंद आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन दरम्यानचा टायब्रेकर सामना आज खेळवण्यात येणार आहे. अझरबैजानमध्ये बाकू इथं या स्पर्धेत काल प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातला दुसरा सामना अनिर्णित संपला.   

****

No comments: