Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 November
2023
Time : 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ नोव्हेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
·
विकसित
भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
·
मराठा आरक्षणासाठी संसदेचं विशेष सत्र घ्यावं-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
·
जायकवाडी
पाणी प्रश्नी मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीकडून आंदोलनाचा इशारा
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात अंतिम सामना
****
विकसित भारत
संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सध्या नाशिक, नांदेड तसंच गडचिरोली जिल्ह्यात या यात्रेची माहिती देणारे चित्ररथ फिरवण्यात
येत आहे. काल नाशिक - हरसूल मार्गावर धोंडे गाव इथं या रथाचं स्वागत करण्यात आलं.
शासकीय योजनांचा यापूर्वी लाभ घेतलेल्या नागरिकांनी आपलं मनोगत व्यक्त करत,
संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी कशा प्रकारे संपर्क साधावा याविषयी
माहिती दिली. अशाच एक लाभार्थी उज्ज्वला दाते यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला...
उज्ज्वला दाते बाईट
****
नांदेड जिल्ह्याच्या
किनवट तालुक्यातही या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या तिसऱ्या
दिवशी किनवट तालुक्यातील घोटी आणि कमठाळा इथं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या
योजनांची माहिती संकल्प रथाच्या माध्यमातून देण्यात आली. आयुष्यमान भव
योजनेअंतर्गत जवळपास ४०० लाभार्थ्यांची यावेळी नोंदणी करण्यात आली तर शंभर जणांना
आयुष्यमान भव कार्डचें वाटप करण्यात आलं.
गडचिरोली जिल्ह्यातही
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान
प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील केंद्रीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत
पोहोचवावा यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी
कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. ते काल सोलापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या
आढावा बैठकीत बोलत होते.
****
बुलडाणा जिल्हाधिकारी
कार्यालयातही ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात काल आढावा बैठक घेण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून
शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना बुलडाणा जिल्हा
यंत्रणेच्या विभाग प्रमुखांना मोहिमेचे प्रमुख रोशन थॉमस यांनी दिल्या आहे.
****
मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करण्याकरता
संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं
करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन करण्यात आलं आहे.
या शिष्टमंडळात विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे,
खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय जाधव यांच्यासह
शिवसेनेच्या खासदार तसंच आमदारांचा समावेश होता.
****
जायकवाडी धरणात
पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी २० तारखेला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे
विकास महामंडळ कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मराठवाडा पाणी जन आंदोलन
समितीने दिला आहे. समितीचे समन्वयक
तथा माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार
परिषदेमध्ये हा इशारा दिला. या आंदोलनामध्ये उद्योजक, विविध सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्था देखील सहभागी
होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्यात यावं यासाठी न्यायालयात दाद
मागणार असल्याचंही पटेल यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -'इफ्फी'ला उद्यापासून गोव्यात
प्रारंभ होत आहे. या महोत्सवामध्ये चार पडद्यांवर यंदा २७० पेक्षा
जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये भारतातील २५ फीचर फिल्म
आणि २० बिगर फीचर फिल्म्सचा समावेश आहे. या महोत्सवात हॉलीवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना यंदाचा
सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊनं गौरवण्यात येणार आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी
क्रीडा संकुलावर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुपारी दोन वाजेपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठीची
सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे
उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासह अनेक मान्यवर या सामन्यासाठी उपस्थित
राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या
सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांचं राष्ट्रगीत होताच, हवाई
दलातील सूर्यकिरण विमानांचा ताफा आकर्षक सादरीकरण करणार आहे.
****
दरम्यान, या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सट्टेबाजांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस विभागाच्या स्थानिक
गुन्हे शाखेने
चार विशेष पथकांची स्थापना केली आहे. आवश्यता भासल्यास, शहरातील काही हॉटेल तसंच संशयित ठिकाणावर छापेमारी करण्याचा
इशारा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिला.
****
धाराशिव इथं सुरु असलेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी
स्पर्धेतल्या अटीतटीच्या लढतीला कुस्ती शौकीनांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काल शिवराज राक्षे विरुद्ध सुबोध पाटील
यांची चुरशीची कुस्ती झाली. या लढतीत शिवराज राक्षेनं सुबोध पाटील याला पराभूत केलं. ६५ किलो माती विभागात पुण्याचा सुरज कोकाटे आणि सोलापूरच्या तुषार
देशमुखने अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. ५७ किलो गादी विभागात
कोल्हापूरचा अमोल बोगार्डे आणि पुण्याचा दीपक पवार, ५७ किलो
माती गटात सोलापूरचा सौरभ इगवे आणि कोल्हापूरचा अतुल चेचार, ७४
किलो गादी गटात सोलापूरचा अक्षय हिसगडे आणि पुण्याचा अक्षय चव्हाण तर ६१ किलो माती
गटात पुण्याचा अमोल वालगुडे आणि सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने अनुक्रमे पहिला आणि
दुसरा क्रमांक पटकावला.
****
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने काँग्रेसच्या नेत्या प्रियांका
गांधी यांचं आज सकाळी
विशेष विमानाने नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर त्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह हेलिकॉप्टरने तेलंगणातील
खानापूरकडे प्रयाण करणार आहेत.
****
प्रबोधिनी कार्तिकी एकादशीचा सोहळा येत्या गुरुवारी साजरा होत आहे. या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची
पंढरपुरात मोठी गर्दी होत असते. या काळात जास्तीत जास्त
वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी
विठुरायाचे २४ तास दर्शन सुरु करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत भाविकांना
दर्शनासाठी मंदिर अहोरात्र सुरू राहणार आहे.
****
राज्यभरात उद्यापासून सहा डिसेंबरपर्यंत कुष्ठरूग्ण आणि सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत लातूर शहरातील निवडक परिसरात सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या
भागात ही शोध मोहीम राबवण्यात
येणार आहे. यासाठी एकूण ७२ पथकं गठीत करण्यात आली असून, या मोहिमेच्या पर्यवेक्षणासाठी १५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मनपाच्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.
****
रेल्वेमध्ये तसंच रेल्वे स्थानक
परिसरात ज्वलनशील पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी नांदेड रेल्वे विभागानं दिवाळी आणि
त्यापूर्वी सुमारे महिनाभराच्या कालावधीत तपासणी मोहीम राबवली. या दरम्यान, रेल्वेच्या आवारात धूम्रपान करणाऱ्या शंभर जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. रेल्वे तसंच रेल्वे स्थानकांवर कोणत्याही
ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू बाळगू नयेत, धूम्रपान करू नये असं आवाहन विभागीय
रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी केलं आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर
इथं उद्या सोमवारपासून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची
प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. जालना, वाळूज आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या नऊ नाट्य संस्था यात सादरीकरण करणार आहेत.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वे नांदेड-पनवेल-नांदेड या गाडीच्या
दोन फेऱ्या चालवणार आहे. नांदेड - पनवेल
गाडी परवा सोमवारी रात्री अकरा वाजता नांदेड इथून सुटणार असून परतीच्या प्रवासात ही
गाडी मंगळवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी पनवेल इथून सुटणार आहे.
उत्तरप्रदेशात
मथुरा इथं सुरु असलेल्या कामामुळे नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेसच्या मार्गात २६ आणि
२७ रोजी तर अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात २७ आणि २८ रोजी तात्पुरता
बदल करण्यात आला आहे. या काळात ही गाडी मथुरेऐवजी गाजियाबादमार्गे धावणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेनं
काही गाड्या पुढील आठवड्यात अंशत: रद्द केल्या आहेत. दौंड ते निझामाबाद एक्स्प्रेस
मुदखेड ते निझामाबाद दरम्यान, निझामाबाद ते पंढरपूर
एक्स्प्रेस निझामाबाद ते मुदखेड दरम्यान, आदिलाबाद-परळी गाडी
परभणी ते परळी दरम्यान, तर परळी-अकोला गाडी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वेच्या जनसंपर्क
कार्यालयानं केलं आहे.
No comments:
Post a Comment