Wednesday, 1 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 01.11.2023, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2023

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या अहवालानुसार नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय;अर्धवट आरक्षण स्वीकारणार नाही-मनोज जरांगे यांची स्पष्टोक्ती

·      बीड इथं संचारबंदी शिथील मात्र प्रतिबंधात्मक आदेश लागू;प्रशासनाकडून शांततेचं आवाहन

·      राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर;मराठवाड्यातल्या १४ तालुक्यांचा समावेश  

आणि

·      मेरी माटी-मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेची नवी दिल्लीत कर्तव्य पथावर सांगता

****

मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारत कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. शिंदे समितीने मराठवाड्यातल्या निजामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित केली आहे. मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, मराठा आदोलकांनी संयम बाळगावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं….

‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची जी भूमिका आहे, तशीच सरकारची देखील भूमिका आहे. मी ती भूमिका जाहीरपणे पण मांडलेली आहे. आणि त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे. टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कोणाकडूनही होऊ नये अशा प्रकारची विनंती, आवाहन देखील मी सकल मराठा समाजाला करतोय.’’

****

मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुलभरित्या राबवावी, असे निर्देश महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी, छत्रपती संभाजीनगर विभागातले जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतची आढावा बैठक काल मंत्रालयात झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

****

रम्यान, अर्धवट आरक्षण स्वीकारणार नसल्याचं आंदोनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आज सायंकाळपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा, आपण पाणीही घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला. कुठल्याही प्रकारच्या जाळपोळीला, तोडफोडीला किंवा हिंसेला आपलं समर्थन नाही, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सकाळी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही काल आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विभागात अनेक ठिकाणी काल आंदोलनं करण्यात आली. बीडपाठोपाठ जालना जिल्ह्यातही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात माजलगावसह इतर ठिकाणच्या जाळपोळ प्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८० हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीत आज सकाळपासून शिथिलता देण्यात आली असून, प्रतिबंधात्मक आदेश मात्र लागू राहणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात कालही रास्ता रोको करण्यात आला. घनसावंगी इथं पंचायत समिती कार्यालयात जाळपोळ करण्यात आली, यात कार्यालयातले महत्त्वाचे अभिलेख नष्ट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.रम्यान, जालन्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांनी कायदा-सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे...

‘‘माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे, जालना जिल्ह्याची आपली कायदा सुव्यवस्था आहे, ती व्यवस्थित, अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी पोलीस दलाला सहकार्य करावे.’’

नांदेड इथं काही भागात काल दगडफेक झाल्यानं, बाजारपेठ बंद करावी लागली. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर आंदोलकांनी काल रेल रोको आंदोलनाचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, जिल्ह्याजिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील आदेशापर्यंत उपोषणं, धरणे, रास्ता रोको, संच आंदोलन करण्यास, प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

समाजकंटकाविरूद्ध कठोर कारवाईचा इशारा, नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिला आहे.

****

धाराशिव इथं मराठा आंदोलकानी काल रेल्वे रुळांवर बसून रेल रोको आंदोलन केलं. राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आले. ाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना संचारबंदीचं पालन करण्याचं तसंच आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

**

लातूर जिल्ह्या शांतता कायम राहावी, यासाठी मराठा समाज बांधवांनी सहकार्य करावं, कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असं कृत्य करू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

हिंगोली आणि परभणी  जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्हाभरातल्या आंदोलनावर जिल्हा तसंच पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल नेक मार्गावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. शहरात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून गस्तही वाढवण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं,

‘‘मराठा समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत, त्या भावना विचारात घेऊन मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला ज्यांनी ज्यांनी निवडून आणलंय त्या सगळ्या समाजातल्या दोन- तीन प्रतिनिधींना मी बोलावून घेतलं, त्यांना समन्वय साधून राजीनामा देण्याचा मी निर्णय घेतला.’’

****

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांतून मराठवाड्याकडे येणाऱ्या एसटी बसच्या सुमारे दीड हजारावर फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली, यामुळे एसटीचं सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

****

राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या दुष्काळी तालुक्यांमध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, वडवणी, धारुर, अंबाजोगाई, रेणापूर, धाराशिव, वाशी आणि लोहारा या १४ तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये कमी पाऊस झालेल्या मंडळात निकष निश्चित करून दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात येईल. यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत देशभरातून जमा झालेली माती विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी प्रेरित करेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मेरी माटी-मेरा देश अभियान आणि अमृत कलश यात्रेची काल नवी दिल्लीत कर्तव्य पथावर सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. देशातल्या युवकांसाठी, युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत'या संघटनेची सुरुवातही पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आली.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका, धाराशिव, परभणी इथलं जिल्हाधिकारी कार्यालय इथंही सरदार पटेल तसंच इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय एकता दिनाची शपथही काल घेण्यात आली. लातूर इथं राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली, नागरिकांचा या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल पाकिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर २०५ धावांचं आव्हान ठेवलं, पाकिस्ताननं ते ३३ व्या षटकांत तीन गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं. आज या स्पर्धेत पुणे इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे.

****

गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघानं सुवर्ण पदक तर पुरूष संघानं काल कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्रानं आतापर्यंत ५२ सुवर्णपदकांसह १२३ पदकं मिळवत पदक तालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. नऊ नोव्हेंबरला या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

****

धाराशिव इथं तालुकास्तरीय बाल संरक्षण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बाल हक्कांबाबत आणि बालविवाहाबाबत समितीकडे १०--८ या क्रमांकावर तक्रारी दाखल कराव्यात, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्यानं या प्रकल्पासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातून साडे आठ हजार दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे. या संदर्भातला आदेश नाशिकचे अधीक्षक अभियंता आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासकांनी दिले आहेत.

****

No comments: