Thursday, 2 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 02.11.2023, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2023

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      इतर समाजांवर अन्याय न होऊ देता मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास प्रारंभ

·      सरसकट आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्ट

·      आरक्षणाच्या मागणीसाठी कालही ठिकठिकाणी निदर्शनं, बीड आणि जालन्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात इंटरनेट सेवा बंद

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - श्रीलंका लढत

****

इतर समाजांवर अन्याय न होऊ देता मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण देण्यासाठी, सगळ्याच पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यावर या बैठकीत एकमत झालं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असं आवाहनही सर्वपक्षीय नेत्यांनी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार दोन पातळ्यांवर काम करत असून, या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ देण्याचं तसंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं...

‘‘सर्व पक्षाच्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलेलं आहे की आपण देखील या प्रक्रियेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि आपलं जे काही आंदोलन आहे, आपलं उपोषण जे आहे, ते मागे घ्यावं. माझी मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की आमचा प्रामाणिकपणा आणि सरकार करत असलेले प्रामाणिक प्रयत्न यावर आपण विश्वास ठेवावा. आणि हे जे आरक्षण आहे, ते मिळवून देण्यासाठी ज्या ज्या बाबी करायच्या आहेत ते करायला सरकार तयार आहे.’’

कुणबी नोंदी असलेल्या सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्रं देण्याचे निर्देश सगळ्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

दरम्यान, पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास कालपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते यांच्या हस्ते, चौघांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पैठण तसंच फुलंब्री उपविभागीय अधिकारी कार्यालयातही काल तीन जणांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आलं. १९५१ च्या खासरा पाहणी पत्रकात नमूद असलेल्या, मराठा -कुणबी जातीच्या नोंदी आधारे ही प्रमाणपत्र देण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं,

धाराशिव इथंही कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

‘‘न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून देण्याची जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते सुमीत माने या युवकाला निजामकालीन नोंदीच्या पुराव्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलं.’’

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव

****

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र, आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. आंतरवली सराटी इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारला किती वेळ पाहिजे आणि वेळ दिला तर सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. सरसकट आरक्षणाच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

****

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात कालही ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात कान्हेगाव इथल्या ग्रामस्थांनी कयाधू नदी पात्रात उतरून आंदोलन केलं. कळमनुरी तालुक्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणून ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं.

लातूर जिल्ह्यात औसा मार्गावर पेठ इथं आंदोलकांनी लातूर-तुळजापूर-सोलापूर तसंच लातूर-हैद्राबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं.

छत्रपती संभाजीनगर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात उद्या शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सगळ्या प्रकारची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काल हा आदेश जारी केला. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत्या पंधरा तारखेपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातली संचारबंदी शिथिल झाली आहे, मात्र जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश लागू आहे.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन प्रकरणी राज्यात १४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६८ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. शीघ्र कृती दलाचं एक पथक बीड जिल्ह्यात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आर्थिक गुन्ह्याप्रकरणी जेट एअरवेजच्या ५३८ कोटी रुपयांच्या मालमत्ता, सक्तवसूली संचालनालयानं जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमध्ये १७ निवासी सदनिका आणि विविध व्यक्ती आणि संस्थांच्या नावावर देशातल्या अनेक राज्यांमधल्या तसचं लंडन, दुबई इथल्याही मालमत्तांचा समावेश आहे. कॅनरा बॅंकेनं केलेल्या तक्रारीवरुन सीबीआयनं जेट एअरवेजच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. जेट एअरवेजनं भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज बुडवल्याचाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

****

आशा स्वयंसेविकांना सात हजार रुपये मानधन वाढ, तीन हजार सहाशे चौसष्ट गट प्रवर्तकांना प्रत्येकी सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ, तसंच आशा आणि गट प्रवर्तकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते काल मुंबईत आशा स्वयंसेविकासोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. या घोषणेनंतर आशा सेविकांना आता पंधरा हजार रुपये, तर गट प्रवर्तकांना एकवीस हजार एकशे पंचाहत्तर रुपये इतकं एकत्रित मानधन मिळणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत येत्या पाच तारखेपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. लोकसेवकांकडून आपलं काम करून घेताना लाचेची मागणी होत असल्यास, नागरिकांनी निर्भयपणे, १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन या विभागानं केलं आहे.

****

नांदेड इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना सहा लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं राजपूत यांच्या घरातून आणि कार्यालयातून सुमारे ७३ लाख रुपये जप्त केले आहेत.

****

मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या २२ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण झालं. यावेळी सचिन तेंडूलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे दिवंगत गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार मारला, तो क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

दरम्यान, या स्पर्धेत काल पुण्यात झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दक्षिण अफ्रिका संघानं निर्धारित षटकांत चार बाद ३५७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ १६७ धावांवर सर्वबाद झाला.

****

गोव्यात सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे जलतरणपटू दांपत्य वीरधवल खाडे आणि ऋतुजा खाडे यांनी सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा विक्रम नोंदवला आहे. वीरधवलनं पन्नास मीटर पोहोण्याच्या स्पर्धेत बावीस पूर्णांक ब्याऐंशी सेकंद, अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. महिला विभागात पन्नास मीटर पोहोण्याच्या स्पर्धेत ऋतुजा खाडेनं सव्वीस पूर्णांक बेचाळीस सेकंदाची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत ५५ सुवर्णपदकांसह १३३ पदकांची कमाई करत, पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

****

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयामार्फत बारामती इथं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत धाराशिवच्या पोर्णिमा खरमाटे हिनं ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या विजयामुळे तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात बाळापूर-वारंगा रस्त्यावरच्या दाती फाटा इथं काल मध्यरात्री अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

****

No comments: