Saturday, 18 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 18.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 18 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : १८ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आज पुणे इथं होत आहे. या बैठकीत आयोगाच्या कामकाजामध्ये वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास प्रवर्गातील जातींच्या हक्कांवर होणारे परिणाम यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, विधिज्ज्ञ बालाजी किल्लारीकर, प्राध्यापक संजीव सोनवणे आदी सदस्य यावेळी उपस्थित असल्याचं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

****

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून पैठणच्या जायकवाडी धरणात ८ पुर्णांक ६० टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर परवा २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महामंडळाच्या निर्णयाविरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयातल्या मूळ याचिकेत अंतरिम अर्ज दाखल करून आव्हान दिलं होतं.

****

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या घोटी इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली तसंच शासनाच्या विविध योजनांचा माहिती चित्रफितींच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रालवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होते. या यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही कराड यांनी केलं.

****

गुजरातच्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्कल्स हे उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्याच्या सामन्यापूर्वी सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनाचा सर्वंकष आढावा घेतला आहे.

****

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं कळवलं आहे.

****

समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचं कार्य अविरत सुरू आहे. अशाप्रकारे निस्वार्थ सेवा पुरवणाऱ्या संस्थांना आवश्यक ती मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरच्या खापरी इथल्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल हृदयरोग चिकित्सा सेवा कक्षाचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथं तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी दोन दिवसीय 'विचार शिबीर' घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल मुंबई इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

छत्तीसगडमधील ७० विधानसभा जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात ७५ पूर्णांक ८ टक्के मतदान झालं. दमदात्री जिल्ह्यात सर्वाधिक ८४ टक्के आणि रायपूर जिल्ह्यात सर्वात कमी ६५ पूर्णांक ४ टक्के मतदान झालं. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागांवर सुमारे ७६ टक्के मतदान झालं. सिवानी इथं सर्वात जास्त ८५ पूर्णांक ६ टक्के मतदान झालं तर अलीराजपूर जिल्ह्यात सर्वात कमी ६० पूर्णांक ६ टक्के मतदान झालं. 

****

नंदुरबारमध्ये झालेल्या तीन दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात यवतमाळ जिल्ह्यातल्या लोहारा इथल्या आदिवासी ढेमसा नृत्य पथकानं प्रथम क्रमांक मिळवला. दुसरं पारीतोषिक यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या घुसाडीच्या वीर बाबूराव शेडमाके यांच्या ढेमसा नृत्य संघानं तर तिसरं पारीतोषिक गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी इथल्या रेला नृत्य पथकानं मिळवलं. या महोत्सवात बत्तीस कलापथकांच्या आठशेहून अधिक कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला.

****

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी आज इटलीतील टुरिन इथं एटीपी फायनल्स पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी नेदरलँड्सच्या वेस्ली कुलहॉफ आणि ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की यांचा रेड ग्रुप पात्रता निर्णायक सामन्यात सरळ सेटमध्ये पराभव केला. ४३ वर्षीय रोहन बोपण्णा एटीपी फायनलच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

****

 

No comments: