Saturday, 18 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 18.11.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 18 November 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : १८ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाची मान्यता

·      मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये-ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेची मागणी

·      विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत-केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

·      यंदाचा पद्‌मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर

आणि

·      जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचा आंदोलनाचा इशारा

 

सविस्तर बातम्या

राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली. आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं काल राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलं. राज्याला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने या अहवालातून ३४१ शिफारशी केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्यण मंत्रिमंडळाने घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर इथल्या सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे एक हजार ३४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विमा अग्रीम संदर्भात आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांसाठी एक हजार ९५४ कोटी रुपये वाटपाला मंजुरी मिळाली आहे, यापैकी आतापर्यंत ९६५ कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. उर्वरित रक्कम वितरणाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसंच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणबाबत स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

****

मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; मात्र हे आरक्षण ओबीसीतून देऊ नये, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. काल जालना जिल्ह्यात अंबड इथं भटके, विमुक्त, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांच्यासह, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केलं. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन संबंधितांना दाखले द्यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल कोल्हापूर इथं सभा घेतली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहे, सर्वांनी एकजुटीने शांततेने आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते. सांगली, विटा तसंच इस्लामपूर इथंही जरांगे पाटील यांच्या काल जाहीर सभा झाल्या.

****

दरम्यान, मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी संसदेत विधेयक संमत होण्याची गरज मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं बोलत होते.

****

विकसित भारत संकल्प यात्रा लवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरू होईल, या यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. कृषी, ग्रामविकास, अदिवासी विकास विभाग, शिक्षण, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करुन घेण्यात यावी. आशा, अंगणवाडी सेविकानागरी सुविधा केंद्र यांची मदत घेऊन नोंदणीचं उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.कराड यांनी या बैठकीत दिले. योजनांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात सात प्रचार रथ येणार असून, ग्रामपंचायतस्तरावर सुकाणू अधिकारी नेमले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****


दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या मांडवी आणि जवरला या गावात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाकडून नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाबासह सिकलसेल संदर्भातील तपासणीही यावेळी करण्यात आली.

****

मध्यप्रदेश विधानसभेच्या सर्व २३० विधानसभा जागांसाठी तर छत्तीसगडमधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या ७० जागांसाठी काल मतदान झालं. मध्यप्रदेशात ७६ पूर्णांक २२ टक्के, तर छत्तीसगढमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचं वृत्त आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. २१ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं अमर हबीब यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

****

ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ. शरद हेबाळकर यांना श्रीराधादामोदर प्रतिष्ठानचा श्रीदासगणू पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सव्वा लाख रुपये असं आहे. दासगणू महाराजांच्या पुण्यतिथीला येत्या १२ डिसेंबर रोजी पंढरपूर इथं हा पुरस्कार हेबाळकर यांना प्रदान केला जाईल.

****

धाराशिव इथं ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल ६५ किलो वजनाच्या गादी गटात कोल्हापूरच्या सोनबा इंगळे याने पहिला, सोलापूरच्या अनिकेत मगर याने दुसरा तर वर्ध्याच्या विनायक मोळे याने तिसरा क्रमांक पटकावला. माती गटाच्या काही कुस्त्या आजच्या सत्रात होणार आहेत.

****


नांदेड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी आणि एकूण ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या २५ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्याच्या ११ तालुक्यातली साडे नऊशेहून अधिक गावंही टंचाईग्रस्त जाहीर झाली आहेत.

****

जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगर इथं न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव नागरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील २०२० पासूनची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. आमदार कैलास पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबर रोजी ही दिंडी निघणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्या होणार आहे. या मोहिमेत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचं निदान झाल्यास नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात यावेतअसं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान येत्या १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्हयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्‍वच्‍छता उपक्रम राबवावा, असं आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन कक्षाने केलं आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज छत्रपती संभाजीनगर इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग पदासाठी पूर्व परीक्षा होत आहे. जिल्ह्यात नऊ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९६ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३८८अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.

****

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीदर-पंढरपूर-बीदर, आदिलाबाद- पंढरपूर-आदिलाबाद, नांदेड-पंढरपूर-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा लालगढ काचीगुडा ही विशेष रेल्वे चालवणार आहे. ही गाडी काचीगुडा इथून आज आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणार असून निजामाबाद, नांदेड, पूर्णा, अकोला, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे सोमवारी दुपारी ही गाडी लालगढला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार दिनांक २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी लालगढ इथून रात्री पावणेआठ वाजता निघणार असून याच मार्गाने गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास काचीगुडा इथं पोहोचेल.

****

No comments: