Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना ४९
कोटी रुपये अनुदान मंजूर.
· भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
भूमीपूजन.
· जागतिक वारसा सप्ताहाला आजपासून सुरूवात.
· कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाआरोग्य
शिबीर.
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचं
ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान.
****
राज्यातल्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शाळांना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वेतनेतर खर्च भागवण्यासाठी
४९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. हे अनुदान वितरित करण्यासंबंधीचा
शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार
४९ कोटी १७ लाख ७८ हजार ५०७ रूपये इतका निधी वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात आला
आहे. गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या शाळांना
प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करण्यात यावं, असं शासन निर्णयातील
आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
ठाणे इथं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर
संगीत विद्यालयाचा भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार
पडला. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त
अभिजीत बांगर,
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, यांच्यासह इतर
मान्यवर उपस्थित होते. या विद्यालयाच्या उभारणीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील
मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजने अंतर्गत राज्य शासनानं २५ कोटी रुपयांचा निधी
दिला आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छठ
पूजेसाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण पर्यावरण संवर्धनासाठी
प्रत्येकाला काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सूर्यदेवाची
उपासना ही प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह आणू शकेल, असं
म्हटलं आहे. छठ पूजेदरम्यान नद्या, तलाव आणि जलाशयांच्या
काठावरच्या वेगवेगळ्या घाटांवर सूर्यदेवाला हे अर्घ्य अर्पण केलं जातं. उद्या या
पूजा सोहळ्यातलं सांगतेचं अर्घ्य दिलं जाणार आहे.
****
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या
जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. ब्रिटीश
राजवटीच्या अत्याचाराविरुद्ध राणी लक्ष्मीबाईंचं धैर्य, संघर्ष
आणि बलिदानाची गाथा देशातल्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन
केलं आहे. कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि
राहुल गांधी यांनीही आज दिल्लीत शक्ति स्थल इथं जाऊन इंदिरा गांधी यांच्या
समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरा
गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज वर्षा या शासकीय
निवासस्थानी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं आणि
उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मंत्रालयात सामान्य प्रशासन
विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपस्थित अधिकारी, सौनिक
यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.
****
वीर जवान विनोद शिंदे - पाटील यांच्या
पार्थिव देहावर आज जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातल्या रोटवद इथं शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाटील यांना पुष्पचक्र
अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. भारतीय सैन्य दलात अहमदाबाद इथं कर्तव्य बजावत असताना
जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील यांचा काल आकस्मिक मृत्यू झाला, ते
३९ वर्षांचे होते.
****
जागतिक वारसा सप्ताहाला आजपासून सुरूवात
झाली आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेच्यावतीनं दरवर्षी १९ नोव्हेंबर ते २५
नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात येतो. देशातल्या ३७ जागतिक वारसा
स्थळांना नागरिकांनी भेटी द्याव्या यासाठी शासनातर्फे याकाळात सवलती देण्यात
येतात. यात देशातल्या २९ सांस्कृतिक आणि ७ नैसर्गिक ठिकाणांचा समावेश आहे. यानिमित्त
आज छत्रपती संभाजीनगर इथल्या बिबी का मकबरा सह इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना
मोफत प्रवेश देण्यात आला.
****
कार्तिक एकादशी निमित्त उजनी धरणातून
चंद्रभागा नदीत चार हजार घनफूट प्रति सेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूर इथं यात्रेनिमित्त
येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी तसंच चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी हे पाणी
सोडण्यात येत आहे. नदीत सोडलेले पाणी पंढरपूर इथं वेळेत पोहोचावं, यासाठी
नदी काठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणी सोडण्यापूर्वी धरणात ४४ टक्के
पाणी साठा होता,
अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता
धिरज साळे यांनी दिली.
दरम्यान, कार्तिकी
एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं २२ ते २४
नोव्हेंबर या तीन दिवसांत महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीराचा
जास्तीत-जास्त नगरिकांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक
डॉ.राधाकिशन पवार यांनी केलं आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्ताच्या
मोफत चाचण्या,
डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत
तपासणी, औषध वितरण,
कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग
तपासणी, चष्यांचे वाटप, इसीजी तपासणी मोफत केली
जाणार आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरू असलेला अंतिम सामना रोमांचक
स्थितीत पोहोचला आहे. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी
२४१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून
क्षेत्ररक्षण स्वीकारत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं, मात्र
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत.
कर्णधार रोहित शर्मा ४७, विराट कोहली ५४,
तर के एल राहुलने ६६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव
१८, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघेही प्रत्येकी चार,
रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा तर जसप्रीत
बुमराह एक धाव काढून बाद झाला. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज
यांनी भारताचा डाव शेवटच्या षटकापर्यंत खेचून नेला, पन्नासाव्या
षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कुलदीप १० धावांवर धावचित झाला, तर
सिराज ९ धावांवर नाबाद राहिला.
****
महाराष्ट्र वेस्टर्न नेव्हल कमांडच्या
वतीनं आज नौदल दिनानिमित्त मुंबईतील आझाद मैदानावर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन
करण्यात आलं. या स्पर्धेत सर्व वयोगटातले सोळा हजार नागरिक सहभागी झाले होते.
मुंबई वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या शर्यतीला
हिरवा झेंडा दाखवला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या संत एकनाथ रंग
मंदिर इथं राज्यस्तरीय मराठी बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. अखिल भारतीय
मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंग भूमी परिषदेच्यावतीनं आज या
महोत्सवामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा नाटकांचे सादरीकरण झालं. या महोत्सवात
बीड तसंच कोल्हापूर इथल्या चाळीस बाल नाट्यकर्मींनी सहभाग घेतला.
दरम्यान, राज्य शासनाच्या
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर इथं उद्या सोमवारपासून
६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात
आली आहे. जालना,
वाळूज आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या नऊ नाट्य संस्था यात
नाट्य सादरीकरण करणार आहेत. उद्यापासून ते २८ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील
तापडिया नाट्यमंदिर इथं सायंकाळी सात वाजता दररोज एक नाटक सादर होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील मलकापूर खेर्डा आणि मारेगाव इथं आदिवासी
बांधवांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
गावकऱ्यांनी मलकापूर आणि मारेगाव इथं संकल्प रथाचे आदिवासी संस्कृतीच्या
माध्यमातून उत्साहात स्वागत केलं. यावेळी नागरिकांना उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री
मातृवंदना योजना,
यासह बचत गटांसाठी बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या
कर्जाबाबतची माहिती देण्यात आली.
****
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेच्या माध्यमातून शासकीय योजनांचे
लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीसंदर्भात
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचवण्यासाठी २२
नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
****
मराठा समाजाला इतर मागास वर्ग
-ओबीसीमधून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अन्यथा
ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश
अण्णा शेंडगे यांनी धाराशिव इथं पत्रकार परिषदेत दिला.
****
No comments:
Post a Comment