Monday, 20 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 20.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २० नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार, जायकवाडी धरणात, नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याबाबत दिलेल्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीतर्फे सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. दरम्यान, जायकवाडीत पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक रस्त्यावर उतरले असून रास्ता रोकोही सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींसह नागरिक सहभागी झाले आहेत. मराठवाड्याला न्याय हक्काचं पाणी मिळावं. मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा आदी मागण्याही केल्या जात आहेत.

****

मराठा समाजानं आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली असल्याचं मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे इथं खराडी भागात झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते आज बोलत होते. मराठा समाज सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहीला असं ते यावेळी म्हणाले. सभास्थळी आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत धडक देण्याचा इशारा जरांगे यांनी यापूर्वीच दिला आहे.

****

५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचं आज गोव्यात पणजी इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये चार पडद्यांवर यंदा २७० पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये भारतातील २५ फिचर फिल्म आणि २० बिगर फिचर फिल्म्सचा समावेश आहे. हॉलीवूड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना यंदाचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊनं गौरवण्यात येणार आहे.

दरम्यान, मंत्री ठाकूर यांच्या हस्ते फिल्म बाजारचंही उद्‌घाटन होणार आहे. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा जागतिक चित्रपट बाजार आहे. या अंतर्गत, दक्षिण आशियातील चित्रपट-आशय आणि प्रतिभांना पाठबळ देत चित्रपट निर्मिती आणि वितरणात मदत केली जाते आहे.

****

राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांनी १७ नोव्हेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देणं तसंच वीस हजार रुपये मासिक मानधन देणं आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. हे प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं संघटनेचे राज्य अध्यक्ष सिध्देश्वर मुंडे यांनी सांगितलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेली 'युवा संघर्ष यात्रा' आज बीड शहरात पोहचली आहे. बीड तालुक्यातील नवगण राजुरीतल्या मंगलमुर्ती देवस्थान इथं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झाली. आमदार पवार या यात्रेदरम्यान युवक, शेतकरी आणि जनतेचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या समस्या नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडणार आहेत. ही युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातून बुधवारी जालना जिल्ह्यात जाणार आहे. 

या युवा संघर्ष यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं तसंच आपल्या समस्यांबाबत संवाद साधावा असं आवाहन बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात आजपासून ते येत्या २० डिसेंबर पर्यंत महा रेशीम अभियान २०२४ राबवलं जाणार आहे. जिल्ह्यात क्लस्टर स्वरुपात रेशीम शेतीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी कार्यक्रमाच्या रथाच्या उध्दाटनप्रसंगी त्या आज बोलत होत्या. कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीसाठी शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुमारे तीन लाख ९७ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  

****

पालघर जिल्ह्यात बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या अंगदपाल या कपड्याच्या कंपनीला काल संध्याकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****

नंदुरबार पंचायत समिती परिसरात गटविकास अधिकारी यांच्या शासकीय वाहनाला रात्री अचानक आग लागली. या घटनेत शासकीय वाहनाचं पूर्णतः नुकसान झालं. वाहनाला लागलेल्या आगीचं कारण कळू शकलं नसून या घटनेमागे घातपाताची शक्यताही वर्तवली जात आहे. 

****

मध्य महाराष्ट्रासह राज्यात इतर भागात गारवा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भातही तापमानात घट झाली आहे. येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments: