Monday, 20 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 20.11.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचं आज गोव्यात पणजी इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. या महोत्सवामध्ये चार पडद्यांवर यंदा २७० पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत.

दरम्यान, या महोत्सवा अंतर्गत ठाकूर यांच्या हस्ते फिल्म बाजारचंही उद्‌घाटन होणार आहे. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा जागतिक चित्रपट बाजार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील २५ ते ३० गावांना आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीन पूर्णांक पाच एवढी असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीनं सांगण्यात आलं. या भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. 

****

लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाला दोन हजार ६५० रुपये पहिला हप्ता देण्याची घोषणा कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. ते काल या कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात बोलत होते. यंदाच्या हंगामात या कारखान्यात दोन लाख टनावर ऊसाचं गाळप करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

बीडहून लिंबागणेश मार्गावर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करुन नेकनूर पोलिसांनी १ लाख ६३ हजार २०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणातील कारचालकानं पलायन केलं असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत, दहा लाख रुपयांची खंडणी घेतांना महिला कृषी अधिकारी आणि तिच्या मुलाला काल नाशिक पोलिसांनी अटक केली. सारिका सोनवणे आणि मोहित सोनवणे अशी या दोघांची नावं आहेत.

****

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्यासह तिघे जण काल वर्धा नदीपात्रात वाहून गेले. पोडे कुटुंबीय काल वर्धा ईरई नदी संगमावर अस्थी विसर्जनासाठी गेले असता ही घटना घडली. या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

****

No comments: