Tuesday, 21 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 21.11.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 November 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं गोव्यात दिमाखदार सोहळ्यात उद्‌घाटन;अभिनेत्री माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्कारानं गौरव 

·      राज्यातली आठ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न-मुख्यमंत्री

·      जायकवाडी पाणी प्रश्नी छत्रपती संभाजीनगर इथं सर्वपक्षीय आंदोलन

आणि

·      ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे याला विजेतेपद

 

सविस्तर बातम्या

५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचं काल गोव्यात पणजी इथं दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्‌घाटन झालं. भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांसाठी प्रोत्साहनपर निधीत वाढ करण्याची घोषणा ठाकूर यांनी यावेळी केली. या उद्‌घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सनी देओल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

या महोत्सवामध्ये चार पडद्यांवर यंदा २७० पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये भारतातील २५ फीचर फिल्म आणि २० बिगर फीचर फिल्म्सचा समावेश आहे. 'कॅचिंग डस्ट या ब्रिटिश चित्रपटाने या प्रदर्शनाला प्रारंभ झाला.

दरम्यान, ठाकूर यांच्या हस्ते फिल्म बाजारचंही उद्‌घाटन झालं. या संदर्भात बोलताना ते म्हणाले....

Byte…

फिल्म बाजार साऊथ ईस्ट एशिया का ही नही अब दुनिया के बडे बाजारों मे से एक है। और ये फिल्म बाजार के बढते हुये कदम मेडिया अँड एंटरटेनमेंट के लिये अच्छे कदम भी है। मुझे पूर्ण आशा है, जिस तरह से हजारो पिक्चरों का इस बार सबमिशन हुआ है इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल के लिये, ये लगातार इफ्फि के बढते कदम को दिखाता है।

****

भंडारा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. राज्यातली आठ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणुक आयोगासमोर पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत अजित पवार यांच्या गटानं सादर केलेली प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा दावा शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधान सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणी आज पुन्हा सुरू होणार आहे. नार्वेकर यांनी गेल्या दोन तारखेला या प्रकरणी शिवसेनेच्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेत, निकाल राखून ठेवला होता.

****

धनगर आरक्षणासाठी राज्यसरकारकडून अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची ही समिती येत्या तीन महिन्यात आपला अहवाल सरकारकडे सादर करेल.

****

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पहिल्या टप्प्यात सोळा गावांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. सोमवारी बोधडी आणि थारा इथं ही यात्रा पोहोचली. संकल्प रथाच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. या संकल्प रथाचे अंगणवाडी बालक, शालेय विद्यार्थी तसंच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या योजनांच्या लाभार्थ्यांनी नागरिकांना योजनांचं लाभ घेण्याचं आवाहन केलं. पृथ्वी पडियार तसंच अशोक गाडेकर यांनी आपलं मनोगत या शब्दांत कथन केलं...

 

बाईट - पृथ्वी पडियार आणि अशोक गाडेकर

 

यावेळी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव वैद्यकीय अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड, विस्तार अधिकारी एन. एम. मुकणार यांनी गावकऱ्यांना योजनांची माहिती दिली. दरम्यान ही संकल्प यात्रा आज मंगळवारी जलधारा आणि नंदगाव तांडा इथं पोहोचणार आहे.

****

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार, जायकवाडी धरणात, अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याबाबत दिलेल्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर काल मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीतर्फे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दाखल अर्जांवर आज सुनावणी होणार आहे.

****


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहेत.

****

राज्य परिवहन महामंडळाने बस चालकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यास मनाई केली आहे. या नियमाचा भंग केल्यास कडक कारवाईचे निर्देश एसटी महामंडळानं दिले आहेत.

****

भारताच्या सहा खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल प्रसिद्ध केलेल्या संघात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विराट कोहली, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या भारतीय क्रिकेटपटूंसह दक्षिण आफ्रिकेचा गेलार्ड कोएत्जी आणि क्विंटन डिकॉक, न्यूझीलंडचा डेरेल मिशेल, श्रीलंकेचा दिलशान मधुशंका, ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झाम्पा यांचा  समावेश आहे.

****

नांदेडचा शिवराज राक्षे हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. धाराशिव इथं झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल गादी गटातून झालेल्या लढतीत शिवराज राक्षे तर माती गटातून नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विजयी झाले. या दोघांमध्ये झालेल्या केसरी किताबाच्या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षे ६-० गुणांनी विजयी झाला. स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील आणि मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील यांच्या हस्ते राक्षे याला महाराष्ट्र केसरी किताब आणि महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी तसंच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. उपविजेता ठरलेला हर्षवर्धन सदगीर याला महिंद्रा ट्रॅक्टर आणि लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षी पासून देण्यात येणारी चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं.

****


डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. २३९ केंद्रांवर या परीक्षा होणार असून, संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी ३२ भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करून, रेशीम शेती परिसरात क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. काल लातूर इथं महा रेशीम अभियान २०२४ अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्ह्यात २० डिसेंबर पर्यंत महा रेशीम अभियान राबवलं जात आहे.

****

वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी परभणी इथले प्राथमिक शिक्षक विनोद शेंडगे यांनी सायकलने परभणी ते नागपूर प्रवास केला. काल सायंकाळी नागपूर इथं पोहाचल्यावर त्यांचा शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक शाळा, ग्रंथालय आणि खेड्यातील कुटुबांना भेटी देऊन वाचनाचं महत्त्व पटवून दिलं.

****

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अती उच्चदाब वाहिनीच्या कामामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक आज आणि उद्या दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी ही माहिती दिली. उर्वरित वेळी वाहतुक सुरळीत सुरु राहणार असून बंद काळात पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळवली असल्याचंही संचालकांनी कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कालपासून कुष्ठरोग आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरूवात झाली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ.एस.एन.हालकुंडे यांनी ही माहिती दिली. या मोहिमेत जिल्ह्यातल्या २९ लाख ४१ हजार ५५० नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असून ही मोहीम सहा डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. 

****

No comments: