Wednesday, 22 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      प्रस्तावित नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांसाठी लाभदायक-कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही.

·      उद्या प्रबोधिनी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं भाविकांची गर्दी.

·      धाराशिव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ.

आणि

·      हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला लागलेल्या आगीत अभ्यागत कक्षाचं नुकसान. 

****

प्रस्तावित नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसह प्रामाणिक कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी लाभदायक असल्याची ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आज मंत्रालयात कृषीविषयक प्रस्तावित कायद्यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. नविन कायद्यानुसार बोगस खते आणि बियाणे प्रकरणी उत्पादक कंपन्यांवर कारवाईची तरतूद असणार आहे. यामध्ये विक्रेत्यांना साक्षीदार म्हणून घेण्यात येणार असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही, असं मुंडे यांनी सांगितलं.  या बैठकीला उपस्थित असलेले सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी राज्यात खतांचे आणि बियाणांचे कोणतेही लिंकिंग होता कामा नये, तसंच या कायद्याबाबत कंपनीच्या प्रमुखांशीही बैठक घेण्यात यावी अशी सूचना केली.

****

राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं बाल स्नेहीपुरस्कार वितरण सोहळ्यात तटकरे बोलत होत्या. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

****

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी निधीसाठी बँकांवर अवलंबून न राहता नवीन स्रोत शोधावेत, असं आवाहन रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे. ते आज मुंबईत फिक्की आणि भारतीय बँकिंग संघटना यांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. नव्या जोखमींबरोबरच नव्या संधी आपल्यासमोर असून त्याचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

****

विकास योजना राबवताना त्या ठिकाणची परिस्थिती आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आठव्या जल प्रभाव संमेलनात बोलत होते. जलसंसाधनांच्या संबंधित नवीन योजना राबवताना नवीन तंत्रज्ञान राबवण्याच्या गरजेवरही त्यांनी यावेळी भर दिला.

****

नव्यानं विकसित केलेल्या देशी बनावटीच्या इंफाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून नौदलानं आज पहिल्यांदाच ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच एखाद्या नौकेवरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना सोडवण्यासाठी बचाव कार्याला आणखी वेग देण्यात आला आहे. या बोगद्यात नव्याने टाकण्यात आलेल्या सहा इंची व्यासाच्या नळीतून भाजी पोळीसह शिजवलेलं ताजं अन्न, फळं आणि औषधं पुरवण्यात येत आहेत. या कर्मचाऱ्यांसोबत कॅमेऱ्याद्वारे थेट संवाद होत असल्याने, त्यांना मानसिक आधार मिळत असल्याचं. याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या विविध कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.

****

प्रबोधिनी कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या पहाटे विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंदिर व्यवस्थापन तसंच जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं आजपासून तीन दिवस महाआरोग्य शिबीरं घेण्यात येत आहे.

****

जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं ७२ वर्षांनंतर होत असलेलं ९७ वा वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. हे संमेलन दोन,तीन आणि चार फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं घेण्यात येणार आहे. २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या पुरोगामी विचारवंत ज्येष्ठ कथालेखिका विधिज्ज्ञ उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली.  

****

धाराशिव इथं आज " विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते एल.ई.डी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं. जिल्ह्यात १२ एलईडी व्हॅन दररोज २ गावात योजनांचा प्रचार, प्रसिद्धी, शासकीय योजना आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...

धाराशिव जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागाला कव्हर करण्यासाठी जवळजवळ बारा चित्ररथ ज्याला व्हॅन म्हणुया उपलब्ध झालेलेआहेत. यामध्ये मेरी कहानी, मेरी जुबानी, हे जे लाभार्थी आहेत विशेषत: आवास योजना असेल, जलजीवन मिशन असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, यामध्ये ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे.त्याचे अनुभव कथन करणार आहे. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आपल्या मार्फत या विशेष कॅम्पेन आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.

****

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्या २३ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेत विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आदिवासी भागातील किनवट तालुक्यात योजनांची माहिती दिली जात आहे. आता ग्रामीण भागातही हा संकल्प रथ उद्यापासून पोहोचणार आहे. दरम्यान आज किनवट तालुक्यातील इस्लापूर आणि इरेगाव इथं संकल्प रथाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ नोव्हेंबरपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांनी ही माहिती दिली...

या मोहिमेची सुरुवात २८ नोव्हेंबरपासून होणार आहे. आणि येत्या २६ जानेवारी २०२३ पर्यंत ही मोहिम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील ७८० ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या सर्व ग्रामीण भागात, महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रामध्ये ही यात्रा संपूर्ण प्रवास करणार आहे.

****

हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला आज आग लागली. यामुळं जिल्हा परिषदेचा अभ्यागत कक्ष पेटला. यात फर्निचरचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग दुपारी आटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील लोहगाव शिवारात आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचा ५ एकरांवरील ऊस जळाला. सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. कुलदीप टाक असं ऊस जळालेल्या शेतकऱ्याचं नांव आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धान्य बाजार समितीत चाळीस दिवसांत ६२ कोटी तीन लाख रूपयांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना न विकता तो माजलगाव बाजार समितीत आणून विक्री करावा असं, आवाहन सभापती जयदत्त नरवडे आणि सचिव हरिभाऊ सवणे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

****

मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महामंडळाच्या नामफलकावर यावेळी काळं फासण्यात आलं.

****

धाराशिव इथं महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून महारेशीम अभियानाचा शुभारंभ केला.

****

No comments: