Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
· धनगर आरक्षणासाठी जालना इथं हिंसक मोर्चा प्रकरणी गुन्हे दाखल;१५ मोर्चेकरी ताब्यात
· विकसित भारत संकल्प यात्रेत काल पाच जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबीरांत नागरिकांची तपासणी
आणि
· ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान
सविस्तर बातम्या
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे, त्यामुळे आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी साडे आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून या निर्णयाच्या विरोधात आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारीही सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत, सरकारने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याच्या आश्वासनाचं पालन करावं, असं आवाहन केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढची सुनावणी १२ डिसेंबरला होणार आहे.
****
जालना इथं धनगर समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या तोडफोड प्रकरणी अज्ञात १०० ते १५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तातडीनं जालना इथं जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दगडफेक करणाऱ्यांसह आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं डॉ. चव्हाण यांनी सांगितलं. नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. काल या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या काही शासकीय आणि खाजगी वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्यानं, तणाव निर्माण झाला होता.
****
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी काल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी आजपासून परवा २४ नोव्हेंबर पर्यंत सुनावणी होणार असून, ३ दिवसांच्या सुट्टीनंतर २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत पुन्हा सलग सात दिवस सुनावणी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन सकारात्मक असल्याचं, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. दुधाला अधिक दर देण्यासाठी प्रमुख सहकारी तसंच खासगी दूध संघांनी पुढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
****
येत्या कार्तिकी एकादशीला पंढरपूर इथं विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आहे. आशीर्वाद यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी काल यासंदर्भात चर्चा केल्यानंतर, ही माहिती दिली.
****
उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या मोहिमेसाठी व्हर्टिकल ड्रिलिंग मशीन घटनास्थळी पोहचलं आहे. दरम्यान, दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या बचाव मोहिमेचं वृत्तांकन करताना संयम ठेवावा असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केले.
****
गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फी मध्ये काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते इंडियन पॅनोरमाचं उद्धघाटन करण्यात आलं. या श्रेणीत द वॅक्सीन वॉर, द केरला स्टोरी हे हिंदी चित्रपट तसंच ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कंतारा हा कन्नड चित्रपट दाखवला जाणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल राज्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये छत्तीस ठिकाणी आरोग्य शिबीरं घेण्यात आली. नाशिक, नंदुरबार, पालघर, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या ही यात्रा सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या जलधारा इथे या यात्रेचं नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या वेळी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ३५३ नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला. यावेळी १५० ग्रामस्थांची आयुष्यमान कार्ड नोंदणी करण्यात आली तर ८० ग्रामस्थांना आयुष्यमान कार्डचं वाटप करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केल्या आहेत. काल लातूर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना काल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
****
हिंगोली इथं विकसित भारत संकल्प यात्रेच्या पूर्वतयारीबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना यावेळी दिले.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना काल प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं संस्थेच्या सभागृहात झालेल्या समारंभात संस्थेचे अध्यक्ष एस बी वराडे यांच्याहस्ते २१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह या स्वरुपाचा हा पुरस्कार देऊन हबीब यांना सन्मानित करण्यात आलं. या सत्काराच्या उत्तरात केलेल्या भाषणात हबीब यांनी, व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम चळवळीतला कार्यकर्ताच करू शकतो, असं मत व्यक्त केलं.
****
लातूर इथं काल रस्त्यावरच्या वायू प्रदूषण तसंच धूळ कमी करणाऱ्या यंत्राचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम विभागाकडून लातूर शहरासाठी निधी उपलब्ध झाला आहे, यातून महानगरपालिकेकडून विविध उपयोजना राबवण्यात येत आहेत.
****
नांदेड जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे काल महा-रेशीम अभियान २०२४ चा शुभारंभ करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी रेशीम विभागाच्या फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची सुरुवात केली. नांदेड जिल्ह्यात हे अभियान येत्या वीस डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातही काल महारेशीम अभियान २०२४ चा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
****
धाराशीव जिल्ह्यातल्या संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका देवस्थान आणि परिसर विकासाची कामं लवकरच सुरू होणार असून या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी आजपर्यंत एकूण तेरा कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जगात शांती आणि परिवर्तन घडवण्याची क्षमता भारतात असल्याचं, सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं श्री संत एकनाथ महाराज समाधीचा चारशे पंचवीसाव्या वर्षानिमित्तानं आणि एकनाथी भागवताच्या साडे चारशेव्या वर्षनिमित्तानं आयोजित एकनाथी भागवत पारायण सोहळ्यात ते काल बोलत होते. येत्या २७ तारखेला या सोहळ्याची सांगता होणार आहे.
****
जागतिक बिलियर्डस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा पंकज अडवाणी अजिंक्य ठरला आहे. कतारच्या दोहा इथं काल झालेल्या अंतिम फेरीत पंकजने भारताच्या सौरव कोठारीचा पराभव केला, पंकजचं हे २६ वं विजेतेपद आहे.
****
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला नांदेड इथं प्रारंभ झाला आहे. येत्या दोन डिसेंबरपर्यंत कुसुम सभागृहात चालणाऱ्या या स्पर्धेत १२ नाटकं सादर होणार आहेत. दररोज सायंकाळी सात वाजता या सादरीकरणाला सुरुवात होणार असल्याचं, स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुका न्यायालयांमध्ये येत्या ९ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment