Thursday, 23 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.11.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 November 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्यातल्या सर्व जनतेला सुखी आणि समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर - उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचं विठुरायाकडे साकडं, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

·      प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      प्रस्तावित नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांसाठी लाभदायक-कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

आणि

·      धाराशिव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

सविस्तर बातम्या

राज्यातल्या सर्व जनतेला सुखी आणि समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याचं साकडं विठुरायाकडे घातलं असल्याचं, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. प्रबोधिनी कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यांनतर ते बोलत होते. समाजातली तेढ आपल्याला दूर करायची असेल, तर वारकरी संप्रदायाचं अनुकरण करावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं. एका समाजाचे प्रश्न मांडत असताना, दुसर्या समाजाबद्दल अपशब्द न काढता आपलं म्हणणं अधिक चांगल्या पद्धतीने मांडणं योग्य राहील, दोन समाजांनी एकमेकांसमोर येणं, हे महाराष्ट्रात घडू नये, असं फडणवीस म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातले बबन घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसह महापूजेचा मान मिळाला. वारकरी संप्रदायातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठल मंदीर संवर्धनाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरु झालं असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले,

Byte…

पंढरपूरचा विकास आराखडा तर आपण केलाच आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू झालं पाहिजे. आणि त्यासंदर्भात आपण जवळपास ७५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते, आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम याठिकाणी सुरू झालं आहे. दुसरा टप्पा देखील आपण लवकरच सुरू करू. पंढरपूर विकास आराखडाच्या संदर्भातही सर्वांना सोबत घेऊन हा आराखडा आपल्याला करायचा आहे.

 

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे यावेळी उपस्थित होते.

कार्तिकी वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी, या उपक्रमाचं देखील फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

कार्तिकी वारीसाठी राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक-आंध्रप्रदेशातूनही अनेक भाविक पंढरपुरात दाखल होतात, या सर्व वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंदिर व्यवस्थापन तसंच जिल्हा प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं तीन दिवसीय महाआरोग्य शिबीराचं आयोजनही करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यातल्या प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. बसस्थानकावरचे १० टक्के स्टॉल सैनिकांच्या विधवा पत्नींना तसंच दिव्यांगांना देण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. महामंडळात नवीन वर्षात सुमारे साडे तीन हजार बसेस सेवेत दाखल करण्यासाठी काल मंजुरी देण्यात आली. येत्या दोन वर्षांत पाच हजारावर ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा तसंच तालुका मार्गावर चालणाऱ्या या बससेवेचं तिकीट सामान्यांना परवडेल असंच ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

****

प्रस्तावित नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसह प्रामाणिक कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी लाभदायक असल्याची ग्वाही, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. काल मंत्रालयात कृषीविषयक प्रस्तावित कायद्यासंदर्भात कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. नवीन कायद्यानुसार विक्रेत्यांना साक्षीदार म्हणून घेण्यात येणार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या सर्व उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी, ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा, अशी सूचना, राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकांचा निकाल सहा नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला, त्यामुळे नियमानुसार सर्व उमेदवारांना एका महिन्याच्या मुदतीत, म्हणजेच सहा डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणं आवश्यक आहे. पोटनिवडणुकीतल्या सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार आहे.

****

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेला शब्द २४ डिसेंबरपूर्वी पाळल्यास कुठल्याही आंदोलनाची गरज भासणार नाही, असं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या शेणी इथं जाहीर सभेत बोलत होते. सकल मराठा समाजाला आपण मुंबईतही आणू शकतो, परंतू तशी वेळ येऊ देऊ नका, असं आवाहन जरांगे यांनी केलं.

****

उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना आज सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे. कामगारांपर्यंत पोहचण्यासाठी आता केवळ दहा मीटर खोदकाम बाकी असून, कामगारांच्या सुटकेसाठी आठशे मिलीमीटर व्यासाचा पाईप बोगद्यात टाकण्यात आला आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांसोबत कॅमेऱ्याद्वारे थेट संवाद होत असल्याने, त्यांना मानसिक आधार मिळत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धाराशिव इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते एल.ई.डी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं. जिल्ह्यात १२ एलईडी व्हॅन दररोज २ गावात योजनांचा प्रचार, प्रसिद्धी, शासकीय योजना आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...

Byte…

धाराशिव जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागाला कव्हर करण्यासाठी जवळजवळ बारा चित्ररथ ज्याला व्हॅन म्हणुया उपलब्ध झालेले आहेत. यामध्ये मेरी कहानी, मेरी जुबानी, हे जे लाभार्थी आहेत विशेषत: आवास योजना असेल, जलजीवन मिशन असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, यामध्ये ज्या लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे.त्याचे अनुभव कथन करणार आहे. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आपल्या मार्फत या विशेष कॅम्पेन आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो

****

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपासून विकसित भारत संकल्प यात्रेत विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आदिवासी बहुल किनवट तालुक्यात योजनांची माहिती दिली जात आहे. आता ग्रामीण भागातही हा संकल्प रथ पोहोचणार आहे. काल इस्लापूर आणि इरेगाव इथं संकल्प रथाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

परभणी जिल्ह्यात उद्यापासून, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ होणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचं नववं मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं घेण्यात येणार आहे. २० आणि २१ जानेवारी रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या पुरोगामी विचारवंत ज्येष्ठ कथालेखिका विधिज्ज्ञ उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धान्य बाजार समितीत चाळीस दिवसांत ६२ कोटी तीन लाख रुपयांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना न विकता तो माजलगाव बाजार समितीत आणून विक्री करावा असं, आवाहन सभापती जयदत्त नरवडे यांनी केलं आहे.

****

धाराशिव इथं महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. जिल्ह्याचं पर्जन्यमान लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम अभियान कालावधीत तुती लागवडीकरता नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला काल आग लागली. या घटनेत अभ्यागत कक्ष तसंच दूरदृष्य यंत्रणा कक्ष खाक झाला. सुदैवानं या आगीत कोणीही कर्मचारी जखमी झाला नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामन दलाच्या पथकाने अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, वसमत तालुक्यातल्या लोहगाव शिवारात काल सकाळी शॉर्टसर्किटमुळे शेतात उभ्या उसाला आग लागली. या आगीत सुमारे पाच एकरांवरील उसाचं नुकसान झालं.

वसमत तालुक्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

****

मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर काल मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महामंडळाच्या नामफलकावर यावेळी काळं फासण्यात आलं.

****

No comments: