Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 03 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· बदलत्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असावं-राष्ट्रपतींचं आवाहन
· मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाला परवा पाच डिसेंबरपासून प्रारंभ
· प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागासाठी उद्या आणि परवा दोन दिवस मुदतवाढ
· गंगापूर इथं आयोजित त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप
आणि
· सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारतीय जोडी अंतिम फेरीत दाखल
****
औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदलत्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ काल राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती आपला महाराष्ट्र दौरा पूर्ण करून दिल्लीला रवाना झाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. नौदल दिन कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. या अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून विरोधकांनी सकारात्मक चर्चेवर भर द्यावा, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. हे अधिवेशन उद्या चार डिसेंबरपासून २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सात ते २० डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार आहे.
या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची काल विधीमंडळात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या प्रश्नांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा परवा पाच डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या अभियानात महानगरपालिका क्षेत्रात विभाग तसंच राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढवणं, शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणं, आदी या अभियानाचे उद्देश आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना पोहोचवण्याचं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात इटावा इथं विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कराड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं. ड्रोन उडवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील संदलापूर इथले शेतकरी विठ्ठल काकडे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. काल संदलपूर इथं विकसित भारत संकल्प यात्रा आली असता, त्यांनी याबाबत माहिती दिली...
****
कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबत कागदपत्रांच्या छाननीसोबतच पुरोहित संघासारख्या संस्थांची तसेच भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना, यासंदर्भात स्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिले आहेत. ते काल नाशिक इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, निकालही जाहीर होणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी होणार आहे.
****
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा उद्या आणि परवा दोन दिवस भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपली होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हे पोर्टल दोन दिवस सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती.
****
राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही मुदत ३० नोव्हेंबरला संपली होती.
****
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथल्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात काल या संमेलनाचा प्रारंभ झाला. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष जगदीश कदम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मराठवाडा साहित्य परिषदेनं खेड्यातून आलेल्या लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसंच समाजातला वैचारिक संभ्रम साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून दूर केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन आदी कार्यक्रमांना साहित्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
धाराशिव तालुक्यातल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणी जिल्हा न्यायालयानं तत्कालीन संचालक स्वर्गीय पवन राजेनिंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. २००१ मध्ये चुकीच्या पद्धतीनं साखर विक्रीचा आरोप करत या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. २००२ साली गुन्हे अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता.
****
लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रेस्टो ही जोडी अंतिम फेरीत दाखल झाली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना जपानच्या रिन इवानागा आणि काई नाकानिशी यांच्याशी होणार आहे.
****
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-ट्वेंटी क्रिकेटच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला पाचवा सामना आज खेळला जाणार आहे. बंगळुरु इथं आज संध्याकळी सात वाजता सामना सुरु होईल. भारतानं मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
३७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत केनियाच्या धावपटूनं पहिला क्रमांक पटकावला आहे. थोड्यावेळापूर्वीच ही स्पर्धा पूर्ण झाली. पर्यावरण संवर्धनासाठी धाव असं यंदाच्या या स्पर्धेचं घोषवाक्य होतं. इथिओपियाच्या धावपटूंनी या स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. १०, पाच आणि तीन किलोमीटर अशा विविध अंतरासाठी झालेल्या या स्पर्धेत शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला.
दरम्यान, लातूर इथं सध्या मॅराथॉन स्पर्धा घेण्यात येत आहे. एक धाव व्यसनमुक्तीसाठी या संकल्पनेतून लातूरच्या पोलिस दलातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलावरून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
****
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे तर उपाध्यक्षपदी भाजपचे भीमराव जावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान निवडणुकीनंतर आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
****
No comments:
Post a Comment