Monday, 4 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 04.12.2023, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 04 December 2023

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      नौदल दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या दौऱ्यावर

·      विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला तर तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत;मिझोराममध्ये आज मतमोजणी

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात

आणि

·      आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन काल विविध कार्यक्रमांनी साजरा

****

५२ वा नौदल दिन सोहळा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी मालवण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २८ फुटी पुतळ्याचं अनावरण होणार असून, त्यानंतर सायंकाळी नौदल दिनाचे मुख्य कार्यक्रम होणार आहेत. विक्रमादित्य विमानवाहू नौका तसंच पाणबुड्यांसह २० जहाजं आणि ४० लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती, या सोहळ्यात पाहता येणार आहेत. या कसरतींची रंगीत तालीम काल झाली. ती पाहायलासुद्धा शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

****

चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षाला तर तेलंगणात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं आहे.

मध्यप्रदेशात सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळालं. विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपने १६३, काँग्रेसनं ६६, तर अपक्ष उमेदवारानं एक जागा जिंकली.

छत्तीसगडमध्ये सत्तांतर झालं असून, ९० जागांपैकी भाजपनं ५४, काँग्रेसनं ३५ तर अपक्ष उमेदवारानं एका जागेवर विजय मिळवला.

राजस्थानातही सत्तांतर झालं असून, भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधानसभेच्या एकूण १९९ जागांपैकी भाजपनं ११५, काँग्रेसनं ६९, अन्य पक्षांनी सात तर आठ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

तेलंगणात काँग्रेसने सत्ताधारी भारत राष्ट्रीय समितीचा पराभव केला. विधानसभेच्या ११९ जागांपैकी काँग्रेस पक्षाने ६४, भारत राष्ट्रीय समितीने ३८ जागांवर विजय मिळवला. भाजपनं आठ तर एमआयएमने सात जागा जिंकल्या.

दरम्यान मिझोराम विधानसभेची मतमोजणी आज होणार आहे.

****

चार राज्यात जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तेलंगणात बीआरएसची वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले, असं मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, या निकालावर मंथन करण्यासाठी उद्या दिल्ली इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. खासदार शरद पवार यांनी सातारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

दरम्यान, तीन राज्यात भाजपला मिळालेला हा विजय निर्णायक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधकांच्या इंडिया आघाडीला जनतेने साफ नाकारल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****

या विजयाबद्दल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला.

छत्रपती संभाजीनगर इथं पक्ष कार्यालयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. आज सकाळी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष करण्यात येणार आहे.

नांदेड इथं महात्मा फुले पुतळ्याजवळ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात धाराशिवसह तुळजापूर, उमरगा, परंडा, इथं पेढे वाटप तसंच आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. येत्या २२ तारखेपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात १५ बैठका होतील. एकूण २१ विधेयकं या काळात चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी घेतली जाणार आहेत. 

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिव्यांग सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. यंदाच्या पुरस्कार मानकऱ्यांमध्ये राज्यातले सत्यप्रकाश तिवारी, वैभव सांगळे, जिया राय, या व्यक्ती, तसंच जळगाव जिल्ह्यात कुसुंबा इथली दीपस्तंभ संस्था, मुंबईची इंडिया सायनिंग हॅन्ड्स, आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचा दिव्यांगता सहाय्य कार्यक्रम यांचा समावेश आहे. दरम्यान, दिव्यांग दिनाचं औचित्य साधून केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं विशेष प्रश्नमंजुषेचं आयोजन केलं आहे. ही प्रश्नमंजुषा माय जीओव्ही पोर्टलवर महिनाभर थेट उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सामान्य नागरिकांसाठी ही प्रश्नमंजुषा खुली असून यात सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे.

****

नांदेड इथं काल जागतिक दिव्यांग दिन सोहळा आणि दिव्यांग मतदार नोंदणी उपक्रम राबवण्यात आला. दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या हक्काच्या योजनांसाठी आत्मविश्वासाने पुढे यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केलं.

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित दिव्यांग खेळाडू गौरव सोहळ्यात ४० दिव्यांग खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठामार्फत यापुढे दिव्यांग खेळाडुंसाठी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल, असं कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी सांगितलं.

बीड इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात काल विविध कार्यक्रम घेण्यात आले. सामाजिक न्याय भवनातून दिव्यांग जनजागृती फेरीही काढण्यात आली.

****

लातूर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने काल प्रभात फेरी काढण्यात आली. शहरातल्या १५ विद्यालयांमधले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प काल टेंभापुरी, दहेगाव, चापानेर, शिरसगाव, वरूड, पिंप्री, भालगाव या गावांमध्ये दाखल झाली. नागरिकांनी यात्रेचं स्वागत करून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली.

वाशिम जिल्ह्यात पारडी ताड इथल्या लाभार्थी मंदा पानभरे यांनी विकसित संकल्प भारत यात्रेत आपलं मनोगत व्यक्त केलं...

****

धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अर्थात उमेद अभियानाच्या ५०१ महिला बचत गटांना भारतीय स्टेट बँकेकडून दहा कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेच वाटप नुकतंच करण्यात आलं. महिला बचत गटांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जास्तीत जास्त निधी घ्यावा आणि व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव आणि मराठवाडा पाणी प्रश्न या विषयावर चर्चासत्रं घेण्यात आली. मराठवाड्यातून कामगार, विद्यार्थी आणि बुद्धीजीवी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. अशी खंत निवृत्त प्राध्यापक जयदेव डोळे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, मराठवाड्यातला रेल्वे मार्ग दुहेरी करावा, समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार मराटवाड्याला पाणी देण्यात यावं, आदी दहा ठराव या संमेलनाच्या समारोप सत्रात संमत करण्यात आले.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांनी मालिका भारतानं चार - एकनं जिंकली आहे. काल बंगळुरु इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेलं १६१ धावांचं लक्ष्य गाठताना, ऑस्ट्रेलियाचा संघ आठ बाद १५४ धावाच करु शकला.

****

सय्यद मोदी भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनाप्पा या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना जपानच्या जोडीकडून १४ -२१, २१ - १७, १५ - २१ असा पराभव पत्करावा लागला.

****

उदगीर इथं राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं काल उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, क्रीडा प्रबोधिनी आणि कोल्हापूर या नऊ विभागातून संघ सहभागी झाले आहेत.

****

शिर्डीहून आळंदीला निघालेल्या काशिकानंद महाराज यांच्या पायी दिंडीतल्या वारकऱ्यांना पुणे-नाशिक महामार्गावर एका कंटेनरने चिरडले, यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी वारकऱ्यांना आळेफाटा इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...