Thursday, 29 February 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.02.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 February 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ परिसरात विरोधकांनी कापसाची माळ घालून राज्य सरकार विरोधात निदर्शनं तसंच घोषणाबाजी केली. कापसाला हमीभाव, कांद्याबाबतचं धोरण, तसंच विकासाच्या नावाखाली सरकारनं राज्यातल्या जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध व्यक्त केला.  

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सही, शिक्क्याप्रकरणी राज्य शासनानं गंभीर  दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत म्हटलं आहे.

****

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा या बैठकीचे अध्यक्ष असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर अनेक नेते या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश उमेदवारांची नावं जाहीर केली जातील.

****

माजी पंतप्रधान तथा स्वातंत्र्यसैनिक दिवंगत मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिवंगत मोरारजी देसाई भारतीय राजकारणातील प्रमुख नेते होते आणि एकता तसंच साधेपणाचे ते प्रकाशस्तंभ होते. त्यांनी राष्ट्राची अत्यंत समर्पित भावनेनं सेवा केली, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर सामाईक केलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

निवडणुकीत युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी देशभरातल्या विविध उच्चशिक्षण संस्थांमध्ये 'मेरा पहेला वोट देश के लिये' हे मतदार जागरुकता अभियान राबवण्यास प्रारंभ झाला आहे. मतदान करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणं तसंच मतदानाचं महत्व युवकांना पटवून देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. येत्या ६ मार्चपर्यंत चालणारं हे अभियान प्रत्येक विद्यापीठात घेण्यात यावं, असं देशभरातल्या सर्व विद्यापीठांना पत्राद्वारे सांगण्यात आल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी आकाशवाणीला दिली आहे. युवकांमध्ये मतदानासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी वेबिनार आणि सेमिनार आयोजित करावेत, असं ही विद्यापिठांना सूचित करण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मिती, परसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, पुणे आणि नाशिक विभागांसाठी विठ्ठल कामत यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती आणि नागपूर विभागासाठी पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या कार्य करतील. नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्मिती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करणं तसंच भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये समावेश करणं आणि शिल्लक राहणाऱ्या आहाराबाबत उपाययोजना आदींबाबत या समित्या मार्गदर्शन करणार आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यात लग्नघरी हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली असून यात  सात बालकांचाही समावेश आहे. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा इथं काल ही घटना घडली. विषबाधेनंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, विषबाधा झालेल्या सर्व लोकांवर उपचार करण्यात येत आहेत.

****

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताची प्रमुख नेमबाज आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात नवीन जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तिनं आधीच्या विक्रमापेक्षा एका अंकानं वाढ नोंदवत ५९७ अंकांसह हा नवा विक्रम केला आणि भोपाळ इथं मध्यप्रदेश राज्य शुटींग अकादमी रेंजमध्ये आशी चौकसेनं ४६१ पूर्णांक ८ गुणांनी ही स्पर्धा जिंकली आहे. आशी सध्या महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेत राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, या स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल स्पर्धेत अर्जून बाबुतानं २५२ पूर्णांक ५ गुण मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...