Monday, 25 March 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 March 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी, तर काँग्रेसची तीन उमेदवारांची यादी जाहीर

·      राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच-महादेव जानकर यांच्याकडून स्पष्ट र विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम

·      मराठा आरक्षण हे ५० टक्के मर्यादेत असल्यास स्वीकारणार-मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

      आणि  

·     होलिकादहनानंतर आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह

****

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी, तर काँग्रेसनं तीन उमेदवारांची यादी काल जाहीर केली.

भाजपनं देशभरातल्या १११ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, यात महाराष्ट्रातल्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, भंडारा - गोंदिया सुनिल मेंढे आणि गडचिरोली - चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथून अभिनेत्री कंगना रनौत, तर उत्तर प्रदेशात मेरठ इथून अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसनंही काल तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात उमरेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिला. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.

****

राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच राहणार असल्याचं, पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ते काल पुरंदर इथं कार्यकर्त्यांसोबत बैठकीनंतर बोलत होते. ग्रामीण भागात पवार कुटुंबाची दहशत मोडून काढण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसची प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रजनी पाटील, अमित देशमुख, प्रज्ञा सातव यांच्यासह ५८ सदस्यांचा या समितीत समावेश आहे.

****

लोकसभा निवडणुकीसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं रुपिंदरसिंग यांनी यावेळी नमूद केलं.

****

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण ५० टक्के आरक्षण मर्यादेत असेल, तरच स्वीकारणार असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं, काल मराठा संघटनांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. सगोसोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन लेखी हमीपत्राद्वारे देणाऱ्या उमेदवारालाच लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असं आवाहन जरांगे यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन त्यांनी केलं. कोणत्या गावातून कोणता उमेदवार द्यायचा हे येत्या ३० तारखेपर्यंत निश्चित करावं, असं ते म्हणाले. आपण स्वतः मात्र निवडणूक लढवणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

****

रंगांची उधळण करत, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा धुलिवंदनाचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे.

राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण लोकांच्या जीवनात सकारात्मक उत्साह निर्माण करत असल्याचं, त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत, हा रंगांचा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी उर्जा आणि उत्साह आणणारा असल्याचं म्हटलं आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलिवंदनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांच्या या सणानं, सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरावेत, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करावी, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

हुताशनी फाल्गुनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. काल सायंकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं.

शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं श्री गुरुस्थान मंदिरासमोर काल होलिका दहन करण्यात आलं. शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात माहरि गडावर देखील काल पारंपारिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी इथं कानिफनाथाच्या यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांसह विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा कालही पाळण्यात आली.

नांदेड इथल्या तख्त सचखंड श्री हुजुर साहिब गुरुद्वारा इथं धुलिवंदनानिमित्त विविध कार्यक्रमांना काल सुरुवात झाली. प्रवचन, होला मोहल्ला, हल्लाबोल आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात पारंपारिक होलिकोत्सव साजरा करतानाच, जनजागृतीचे उपक्रम अनेक ठिकाणी राबवण्यात आले. आखाडा बाळापूर इथं होळीत कोणकोणते षडविकार जाळले पाहिजेत याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. हिंगोली इथं एका युवक मंडळाने कचऱ्याची होळी पेटवून कचरा मुक्तीचा संकल्प केला.

****

ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र आठवड्याला काल पाम संडेनं प्रारंभ झाला. ईस्टर संडे आणि गुड फ्रायडे आधीचा रविवार हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या सप्ताहादरम्यान आज अंजिराचा सोमवार साजरा करण्यात येतो. काल ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थना घेण्यात आली, तसंच ख्रिस्ती बांधवांनी नारळाच्या झावळ्या घेत शांतता फेरी काढली.

****

जागतिक क्षयरोग दिन काल धाराशिव इथं साजरा झाला. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली. पाच नि:क्षय मित्र तयार करून फूड बास्केट वाटप करण्यात आलं. सास्तुर ग्रामीण रुग्णालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. पोषण आहारासाठी नि:क्षयमित्र योजनेच्या प्रतिसादाबद्दल प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे प्रतिनिधी सुहास फाटक यांनी क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी जनजागृती करून ४५ हजार रुपये देणगी रुग्ण कल्याण समितीला सुपूर्द केली, त्यामुळे उमरगा-लोहारा तालुक्यात जवळपास ६२ रुग्णांना पोषण आहार किट देता आल्या, या रुग्णांच्या तब्येतीत यामुळे सुधारणा होत असल्याचं, रमाकांत जोशी यांनी सांगितलं.

****

सांगली इथं काल सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. पठ्ठे बापूराव यांच्या ढोलकीच्या तमाशातील गण, गवळण, लावण्या, छक्कड आणि वगनाट्य यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचं 'उत्तरदायित्व' हे नाटक प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलं आहे. नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे. या स्पर्धेचा काल छत्रपती संभाजीनगर इथं समारोप झाला. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्यासह परिमंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांना राज्य शासनाचा बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्या निमित्तानं ज्येष्ठ लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते काल नांदेड इथं फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. नांदेडच्या ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी ईबितदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानिमित्त महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे सदाशिव बेडगे आणि पदाधिकाऱ्यांनी काल त्यांचा सत्कार केला.

****

परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसी- प्रवर्गात समाविष्ट करून `सगे सोयरे` या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषणं करण्यात आलं. सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहिरे आहेत असं सांगत आपली मागणी `सगे सोयरे` अशी भित्तीपत्रकं घरा-घरांवर लावून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात येत आहे.

****

लातूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या मुसळधार अवकाळी पावसामुळे लातूर शहरातलया अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं. लातूर शहरात सुरु असलेल्या सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेतही वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे यात्रेकरूंसह व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे सिद्धेश्वर यात्रेत काल होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धा आज होणार असल्याचं मंदिर प्रशासनानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहरातल्या तीन मालमत्तांवर काल मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाई केली. मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

****

इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा सहा धावांनी तर राजस्थान रॉयल्स संघाने लखनऊ सुपर जायंटस् संघाचा २१ धावांनी पराभव केला.

****

No comments: