आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मध्ये आजपासून स्टार्टअप महाकुंभ सुरु होत आहे. स्टार्टअप्स आणि गुंतवणुकदार कंपन्या यांना एकत्र आणण्याचं या उपक्रमाचं उद्दीष्ट आहे. हवामान, कृषी, क्रीडा, गेमींग्स, फिनटेक अशा विविध क्षेत्रांच्या पॅवेलियनमध्ये त्या क्षेत्राशी संबधित स्टार्टअप्सची माहिती मिळेल. दहा देशांमधले दोन हजारहून जास्त स्टार्टअप्स, ३० हजार भावी नवव्यावसायिक, ५० हजार व्यापाराशी संबधित तर दहा देशांमधली अनेक शिष्टमंडळं यात सहभागी होत आहेत.
****
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत निवडणूक आयोगानं बदल केला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेसाठीची मतमोजणी चार जून ऐवजी दोन जूनला होईल, असं निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
भारतीय निवडणूक आयोगानं अर्जुन पुरस्कार विजेती दिव्यांग तिरंदाज शीतल देवी हिला 'दिव्यांग श्रेणीतील राष्ट्रीय आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून घोषित केलं आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत नोंदणी करून घेऊन सहभागी होण्याची स्फूर्ती, दिव्यांग मतदार बंधुभगिनींना मिळू शकेल, असं आयोगानं म्हटलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार जवळ टॅम्पो आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ कामगार गंभीर जखमी झाले. काल रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकनं कामगारांच्या टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातलं वालदेवी धरण बघण्यासाठी गेलेली महिला पाण्यात बुडाल्याची घटना काल घडली. सदर महिला पात घसरुन पाण्यात पडली, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे जण धरणात बुडाले होते, मात्र, स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवलं. महिलेचा शोध अद्याप लागला नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रिमियर लीग - डब्ल्यू पी एल क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघाचं ११४ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९ षटक आणि ३ चेंडूत पूर्ण केलं.
****
No comments:
Post a Comment