Wednesday, 20 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:20.03.2024रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 March 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार;विदर्भातल्या पाच मतदारसंघांचा समावेश

·      नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·      इतर पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयची चौकशी लावणं म्हणजेच हुकूमशाही-उद्धव ठाकरे यांची टीका

·      बनावट चकमक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप

आणि

·      वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ११ हजार स्नातकांना पदवी प्रदान

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला १७ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या १०२ जागांसाठी मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. या जागांसाठी उमेदवारांना येत्या २७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

****

सीएए अर्थात, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. हा कायदा लागू करण्याची अधिसूचना गेल्या आठवड्यात जारी झाल्यानंतर, याला आव्हान देणाऱ्या २३७ याचिका न्यायालयात दाखल झाल्या. या याचिकांवर तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या ९ एप्रिलला होणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी सुरू झाली. शरद पवार गटाच्या वतीनं विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडताना, घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांच्याकडे गेल्या पंचवीस वर्षांपासून असल्याचं नमूद करत, आता हे चिन्ह दुसरीकडे गेल्यास विशेषत: ग्रामीण भागातल्या मतदारांचा गोंधळ होऊन मतदानावर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला. यावर न्यायालयानं, मतदार परिपक्व असल्याचं मत नोंदवत, शरद पवार गटानं तुतारी हे चिन्ह वापरावं, आयोगानं इतर कोणालाही तुतारी हे चिन्ह देऊ नये, असे आदेश दिले. तसंच अजित पवार गटाला घड्याळ हे पक्षचिन्ह वापरताना सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं प्रत्येकवेळी स्पष्ट करण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.

****

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका तसंच नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, पुढच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर होईल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

****

शिवसेनेच्या खासदारांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. पक्षाच्या वतीनं निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असून, एक-दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय जाहीर होईल, अशी माहिती पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी काल भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यत: माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

काँग्रेस पक्षाला राज्यात सात लोकसभा मतदारसंघामधे पाठिंबा देणार असल्याचं, वंचित बहुजन आघाडीनं म्हटलं आहे. विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून ही भूमिका मांडली. काँग्रेस लढवणार असणाऱ्या सात मतदार संघांची नावं आपल्याला कळवावीत, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

इतर पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयची चौकशी लावणं म्हणजेच हुकूमशाही असल्याची टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथं जनसंवाद मेळाव्यात ते काल बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, मराठा आंदोलन, आदी मुद्यांवरूनही भाजपवर टीका केली. नांदेड इथंही ठाकरे यांनी काल संवाद मेळाव्याला संबोधित केलं. भाजपाला आता सत्तेचा हव्यास लागला असल्याची टीका त्यांनी केली.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारनं १६ महानगरपालिकांमधल्या ३४ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. अतिरीक्त आयुक्त आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्यास सांगण्यात आलं असून, त्यांना नव्या पदस्थापनेचे आदेश नंतर दिले जाणार आहेत.

दरम्यान, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि राज्याचे साखर आयुक्त अनिल कवडे यांची, राज्य सहकारी निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दोन मे २०२४ पासून पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल.

****

बहुचर्चित लखनभैया कथित बनावट चकमक प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची सत्र न्यायालयानं केलेली निर्दोष सुटका मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अठरा वर्षापूर्वीच्या या प्रकरणात सत्र न्यायालयानं २०१३ मध्ये बावीसपैकी एकवीस आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती तर शर्मा यांची निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणातल्या इतर आरोपींची जन्मठेपही उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या रेपनपल्ली नजीकच्या कोलामार्का जंगलात काल पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. या चौघांवर एकूण ३६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. पोलिसांनी घटनास्थळाहून एक एके 47, एक कार्बाइन, देशी बनावटीची दोन पिस्तुलं, तसंच इतर साहित्य ताब्यात घेतलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारे पैशांचा किंवा बळाचा दुरुपयोग होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ई एस एम एस ॲपसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी काल निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय तयारीचा आढावा घेत, यंत्रणेला आवश्यक सूचना केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात धार्मिक स्थळं, रुग्णालयं, किंवा शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालयं स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले.

निवडणूक आचारसंहितेचं पालन करण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्ह्यातही प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत. जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे आदेश जारी केले.

निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सी-व्हिजील मोबाईल ॲपची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या कक्षाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.

****

मतदानाची कमी होणारी टक्केवारी ही चिंतेची बाब असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी घेतलेली ही मुलाखत आज सकाळी साडेदहा वाजता आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवरही श्रोत्यांना ही मुलाखत ऐकता येईल.

****

राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे, दुष्काळग्रस्त भागातला एकही विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना विद्यापीठाने शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ काल राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ११ हजार दोन स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. कृषी विद्यापीठाने हवामान बदलास अनुरूप पीक पद्धती विकसित करण्याचं आवाहन, राज्यपालांनी यावेळी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये दस्तऐवजांचं बनावटीकरण करून अकृषक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही तातडीनं करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले आहेत.

****

राज्यातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला काल ३८ वर्षे झाली. या घटनेबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी यवतमाळ इथं आझाद मैदान तसंच जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. लातूर बाजार समितीत शेतकरी संघटनेनं काल एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात काल आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीवरील एका मुलासह दोन जण ठार झाले. कळमनुरी तालुक्यात पोतरा ते आखाडा-बाळापूर रस्त्यावर हा अपघात झाला. रंगराव मस्के हे दुचाकी चालक जागीच ठार झाले, तर मागे बसलेला नागेश लेकुळे या पंधरा वर्षीय मुलाचा नांदेड इथं उपचारासाठी नेताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या तब्बल ६१ दुचाकी स्थानिक गुन्हा शाखेने किनवट येथून जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...