Monday, 1 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.04.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०१ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. रिझर्व्ह बँकेला ९० ‍‍‍वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते थोड्याच वेळात संबोधित करतील.

****

आजपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या दरात वाढ झालेली नाही.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखपदाचा सदानंद दाते यांनी काल पदभार स्विकारला. दाते यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

****

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अकरा उमेदवारांची दुसरी यादी काल रात्री जाहीर केली. त्यामुळं वंचित आघाडीच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या १९ वर पोहचली आहे.

****

राज्यात नंदुरबारसह ज्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या असतील, त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती, राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

****

एकनाथषष्ठी निमित्त शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराजांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार, यंदा राज्यातल्या विविध सहा मान्यवरांना आज प्रदान करण्यात येणार आहेत. नाथगल्ली पैठण इथल्या श्रीसंत नरहरी सोनार महाराज संस्थान इथं हे पुरस्कार थोड्याच वेळात मान्यवरांना वितरीत केले जातील.

****

नांदेड जिल्ह्यात भविष्यवेधी शिक्षण आवाहनाला दोन हजार ५३१ शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी, भविष्यवेधी शिक्षण उपक्रमात सहभाग घेण्याचं आवाहन शिक्षकांना केलं होतं. या शिक्षकांचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार असल्याचं करनवाल यांनी सांगितलं आहे.

****

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून रात्री उष्मा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments: